Wednesday, 25 December 2013

Sankalp


वर्षाच्या सुरुवातीला अनेक मंडळी नवे संकल्प करतात. जसं की, यंदा मी डायरी लिहिणार किंवा मी यंदा वजन कमी करणार, किंवा डाएटींग करणार वगैरे वगैरे ……. 

ह्यावर्षीच्या मुंबई ट्रीपमध्ये आल्येला वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारावर बोलायचं झालं तर, माझ्या मते, काही अपवाद वगळता बऱ्याच मंडळीनी, "भारतीय संस्कृतीत शिकवल्या प्रमाणे, मी एक चांगला माणूस बनेन", असा संकल्प करायला हवा आहे"

गेली अनेक वर्ष जगभरात भारत हा देश त्याच्या संस्कृती मुळे प्रसिद्ध असल्याचे आपण सर्वच जाणतो. आता त्यातलं खरंच काही उरलंय का?, असा प्रश्न मला अनेक ठिकाणी पडला. पूर्वी बऱ्याच चांगल्या गोष्टींकरता, "It happens only in India", असं म्हंटलं जायचं, ते आता उपहासाने वाईट गोष्टींकरता म्हंटलं जातंय, ह्या बद्दल अत्यंत खेद वाटतो. 

खंर बोलणे, दिलेला शब्द पाळणे, दुसऱ्याची फसवणूक न करणे, दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीचा विचार करणे, आपले काम सचोटीने करणे, पैश्यापेक्षा लहानपणापासून शिकलेल्या तत्वांना महत्व देणे, हे पूर्वी आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे असे असलेले गुण बऱ्याच ठिकाणी माणसांनी ओला फडका घेऊन पुसून टाकलेत असं वाटलं.

इतर सर्व गोष्टींच्या तुलनेत फक्त आणि फक्त पैसा श्रेष्ठ ठरतोय, असं अनेक ठिकाणी दिसून आलं.

मी व माझे मिस्टर, कुठल्याही कामासाठी गेल्यावर, आम्ही सिंगापूरला राहतो, हे सांगणं, टाळण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मते, कुठल्याही सेवेचा लाभ प्रत्येक माणसाला समान रीतीने मिळायला हवा. पण तसं होताना दिसत नाही. काही ठिकाणी वेळाच्या असलेल्या बंधनामुळे, आम्ही परदेशात राहतो, ह्याचा उल्लेख केला, कि समोरच्या माणसाच्या वागण्यात, अमुलाग्र बदल झालेला दिसतो. 

आमच्या बरोबर त्या माणसाचे वागणे, त्याच्या समोर असलेल्या दुसऱ्या गिऱ्हाइकाच्या तुलनेत खूप वेगळे आहे असे प्रकर्षाने जाणवते. 
असं काही घरी सांगितलं कि, माझी आई गमतीने नेहमी, "अगं असंच असतं, “थोर कुले त्याला जग भुले", असं म्हणते. 

मला ते का कोण जाणे, खूप टोचतं, म्हणून, ह्याच्या मागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही गोष्टी निरीक्षणात आल्या. पहिले म्हणजे लोकांची जीवन जगण्याची पद्धत खूप बदलल्याचं जाणवलं. ‘स्वार्थ', ह्या अवगुणाने परमोच्च उंची गाठल्याचं दिसलं. लोकांना, मी आणि माझं ह्याच्या पुढे काही दिसत नाही असं निरीक्षणात आलं.

पूर्वी आपण ‘ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता कशाला विचारायचा’ असं म्हणत असू. त्याप्रमाणे जर विचार करायचा म्हंटलं, तर, जेव्हा आपल्याला कपडे घ्यायचे नाहीयेत, तर ते उगीच घालून का बघायचे असा विचार करणे बरोबर. पण हल्ली तसे होत नाही. हल्ली बरीच मंडळी शनिवार रविवार mall मधे गम्मत करायला जातात. वेगवेगळ्या दुकानात जाऊन तिथले कपडे घालून बघतात, नंतर काहीच खरेदी न करता निघून जातात. 

एक गम्मत तर अगदी सांगण्यासारखी आहे. आम्ही ठाण्याला नवीनच सुरु झालेल्या "व्हिव्हीयाना" ह्या mall मधे असलेल्या shoppers stop ह्या दुकानात, मिताली करता, कपडे घ्यायला गेलो होतो. काही आवडलेले कपडे निवडून आम्ही trial रूम च्या ठिकाणी गेलो. तिथे, मितालीच्या शेजारचा रूम मधे, दुसरी एक मुलगी पण काही कपडे घालून बघत होती. अगदी tip top तयार होऊन ती दुकानात आली होती. मी मितालीचे कपडे कसे दिसतात हे पाहण्याकरता तिथेच उभी होते. 

शेजारच्या रूम मधली ती मुलगी, एक ड्रेस घालून बाहेर आली, तिच्या बरोबर असलेला एक मुलगा पटकन पुढे आला, ती मुलगी एक छान पोझ मधे उभी राहिली व मुलाने mobileफोन वापरून पटकन तिचा एक फोटो काढला. इतक्यात, सिक्युरिटीवाली बाई पुढे आली व तिने फोटो काढायला मनाई केली. तो मुलगा "ओके, ओके" असं म्हणून मागे गेला. काढलेला फोटो तसाच राहिला. ती मुलगीही तिचे स्वतःचे कपडे घालून बाहेर आली. दोघे निघून गेले. 

जरावेळाने दुकानाच्या बाहेर मी स्वतः त्या दोघांचे बोलणे ऐकले, त्यावरून, ड्रेस खरेदी करणे शक्य नाही, पण फेसबुक वर तश्या कपड्यात फोटो पोस्ट करायचाय, ह्या कारणासाठी त्यांनी तो पर्याय निवडला होता, आणि निवडलेल्या पर्यायाबद्दल कुठलाही खेद तर सोडाच, 'कसं फसवलं’? ह्याचा आनंद दिसत होता. 

माझ्या अखंड आयुष्यात जे आपले नाही, ते उचलून वापरणे म्हणजे चोरी, असं मला शिकवलं गेलं.

तेच मी माझ्या मुलांना शिकवलं.

आम्ही वसईला राहत असताना मी नेहमी स्कूटर वर जाऊन ‘पाटील पवार कंपनी’ ह्या दुकानातून पाच पाच किलो कांदे बटाटे आणत असे. मिताली बरेच वेळा स्कूटर वर पुढे उभी राहून माझ्या बरोबर येत असे. त्यावेळेस ती अडीच तीन वर्षाची असेल. अशीच एकदा मी कांदे बटाटे आणायला गेले, निवडून कांदे बटाटे घेतले, पैसे दिले, मितालीला स्कूटरवर पुढे उभं केलं व निघाले. पुढे येऊन सिग्नल साठी थांबले तेव्हा मितालीच्या हातात मला एक बटाटा दिसला. मी कांदे बटाटे निवडत असताना ती बटाटे घेऊन खेळत होती व मी निघाल्यावर हातात एक बटाटा तसाच ठेऊन निघाली होती. 

तिच्या शब्दकोशात तेव्हा, ‘चोरी’ हा शब्द अस्तित्वात सुद्धा नव्हता, पण मी त्या शब्दाची तिला ओळख करून दिली, व आपण ती कधीही करायची नाही हे हि शिकवलं. 

मी तिला, मिताली आपण हा बटाटा परत देऊन येऊया, आपण त्या बटाट्याचे पैसे दिले नाहीत म्हणजे आपण तो चोरी केला असं होईल, तेव्हा तू, तो मी चुकून घेतला असं सांगून दुकानवाल्या काकांना SORRY म्हणून परत दे, असं सांगून परत दुकानात नेलं होतं. 

दुकानदार मला खूप छान ओळखत होता, तो मला म्हणाला, डॉक्टर, "तुमच्या सारख्या चांगल्या माणसांमुळे जग चालू आहे हो, एक बटाट्याचं काय नाय, पण त्या छोट्या पोरीला किती मोठी गोष्ट शिकवलीत”. 

हे, ह्या मुलांना कोणी शिकवत नाही का?????

आणि मग कदाचित अश्या मंडळींचे अनुभव आल्यामुळेच विक्रेत्यांच्या वागण्यातही बदल झाला असावा का? तेही असा विचार करत असतील, कि "ह्या फुकट्याना कशाला द्यायचा मान, त्यापेक्षा ही परदेशातील मंडळी नक्की खरेदी करतील, आपण त्यांच्याकडे पाहूया". असं तर त्यांना वाटत नसेल?

दुसरी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, हल्ली बाह्य देखावा छान करण्याचा अट्टाहास. सगळीकडे चढाओढ, मी तुझ्या पेक्षा सरस आहे हे दाखवण्याची…. 
पूर्वी कितीही असलं तरी ते दाखवण्याची काय गरज आहे असा विचार रूढ होता, आता मुळात काही नसले तरी चालेल पण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा विचार जास्त पाहायला मिळतो. आम्ही आठवड्यातून एकदा तरी हॉटेलात जेवायला जातो, आम्ही परदेशात ट्रीप केल्येय, आम्ही branded कपडे वापरतो, हे सांगता येणे गरजेचं आहे असं अनेकांना वाटतं. पाश्चात्य गोष्टींचं अंध अनुकरण करणे हे तर जिथे तिथे पाहायला मिळतंय. 


'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हा विचार बाजूला सारत 'उच्च राहणी आणि अति सामान्य, किंबहुना नीच विचारसरणी' हा विचार अंगीकारताना अनेक दिसतायत.बाह्य रूप चकाचक असणे महत्वाचे. मित्र मैत्रिणी आले असताना वृद्धांनी बाहेरच्या खोलीत आलेलं बऱ्याच लोकांना आवडत नाही असं पाहायला मिळालं. का वाटत असेल असं त्यांना? लहानपणी आपलं गळणारं नाक घेऊन, किंवा ओली चड्डी घेऊन, आपण त्यांच्या मित्र मैत्रिणींसमोर जात होतो तेव्हा लाज वाटून, त्यांनी आपल्याला आतल्या खोलीत ठेवलं असतं तर? ह्याचा विचार कोणी का करत नाही?


Strength Of Character ज्याला म्हणतो ना आपण, त्याचा आभाव सगळीकडे दिसतोय. जो तो Principle Of Convinience वापरताना दिसतोय. 
“का होतंय हे असं”? 
“कोण आणि कसं बदलणार”? 
“केव्हा बदलणार”? 
“बदल आणखी वाईट तर होणार नाही ना”?

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न… मध माश्यांसारखे घोंगावणारे……. हे सगळं पाहून भारताला कोणाची तरी दृष्ट लागली असं फीलिंग मला येतं.

उत्तर सध्या एकच मिळतंय… सर्व काही आपणच बदलायला हवय, आपण, प्रत्येकाने.

प्रत्येक माणसाने 'जुने ते सोने', ह्या म्हणीची आठवण काढून आत्मपरीक्षणाने चुका दुरुस्त करण्याचा जर नवीन वर्षी संकल्प केला तर बरेच सकारात्मक बदल समाजात होऊ शकतील असा माझा विश्वास आहे. 

'कालाय तस्मै नमः', हे जरी खरं असलं, तरी वाईट गोष्टी अंगीकारण्याची सक्ती करण्याचा अधिकार दुसऱ्याला कोणाला देण्याची मला गरज वाटत नाही.


माझ्यासारखी मतं असणारेही अनेक आहेत हे हि मला पक्कं ठाऊक आहे, आपण सर्व मिळून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्याला तरी, असा विचार करायला लावायचा, नव्या वर्षात संकल्प करूया. 
शेवटी म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे' अगदी तसंच.


"अस्सल भारतीय संस्कृती" हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, आज त्याच्या विषयीच्या विचारांचा 'सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये' समावेश……… 

कसा वाटतोय विचार???? नक्की कळवा…..