'जाऊ दे' ह्या दोन शब्दात केवढी ताकद असते ना!!!
अनेकवेळा मी हे दोन शब्द स्वतःला किंवा दुसर्याला सांगून प्रसंगातील तणाव कमी करण्याचं कार्य करते.
भांडण झालं? मी म्हणते 'जाऊ दे', "सोडून द्या".
माझ्याकडून चूक झाली?, मी म्हणते, "ह्या वेळेस 'जाऊ दे', पुढच्या वेळेस असं नाही करायचं".
लहान मुल खेळताना पडून रडायला लागल्यावरही तेच, 'जाऊ दे', "आपण जमिनीला फटका देऊ हं "
म्हणजे थोडक्यात, जे घडून गेले ते विसरून, पाटी कोरी करून, नवीन अक्षरं गिरवावी असा विचार करणे.
जुनं वाईट विसरून, नवीन चांगल्याचा विचार करायची, किंवा घडलेल्या चुकीला माफी देऊन टाकण्याची मनाला आज्ञा देणे, क्षमाशील होणे, असंही म्हणता येईल. आपल्याला एकदा क्षमाशील होता आलं, कि आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या समाप्त होतात, असा माझा अनुभव.
मी तरुण असताना, (म्हणजे, आत्ता मी म्हातारी झाल्येय असं नाही, पण अगदी तरुण) म्हणजे टीनएजर असताना, अतिशय रागीट होते. समोरचा वाईट वागला तर आपण त्याच्याशी वाईटच वागलं पाहिजे अश्या मताची होते. सहनशक्तीच्या बाहेर राग आल्यामूळे एकदा मला epileptic fit आली होती, हे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देण्यासारखं होतं. त्यामुळे, दुसऱ्यांना व्हायचा कि नाही ते माहित नाही, पण मला खूप त्रास व्हायचा.
पुढे माझ्या मिस्टरांचा संयत स्वभाव पाहून म्हणूया किंवा माझेच विचार थोडे प्रगल्भ आणि संयत झाल्यामुळे म्हणूया, मी बरीच शांत झाले, व दुसऱ्याच्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करायला शिकले.
आधी आधी दुर्लक्ष केले तरी विसरणे कठीण होत असे. पुढे आणखी थोडे प्रयत्न केल्यावर, ते विसरून दुसऱ्याला माफ करणे ही जमू लागले. हे जमू लागल्यावर असे लक्षात आले कि, त्यमुळे स्वतःला होणारा त्रास खूपच कमी झाला.
पुढे आणखी खोलवर विचार केल्यावर आणखी काही गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे, प्रत्येक माणसामध्ये गुण दोष दोन्ही असतात. कोणीही पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट नसते.
काही मंडळींच्या बरोबर, काही बाबतीत मतभेद झाले, तरी, इतर अनेक बाबतीत त्यांच्याकडे बरेच काही चांगले असते. त्यांच्या बाबतीत, त्या थोड्याश्या मतभेद होणाऱ्या विषयात ‘जाऊ दे’, अगदी सहजपणे म्हणता येतं, आणि बिनधास्त मैत्री करता येते. ह्या मंडळीना आपण 'reasonable', असंही म्हणू शकतो.
इतर काही माणसांच्या बाबतीत मात्र आपली अवस्था, खालील गोष्टीतल्या राणे वाहिनींप्रमाणे होते;
ऐका हं गोष्ट ….
एका गावात एक राणे नावाचं नवीन कुटुंब राहायला येतं. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या सामंत वाहिनी, त्यांच्याशी सहज बोलायला म्हणून येतात. निघताना त्या म्हणतात, “इथे बाकी सगळं छान आहे, फक्त समोरच्या राधा काकुंपासून जरा लांबच रहा”. “त्यांच्याशी कसं वागावं ते इथल्या लोकांना समजतंच नाही. काहीही करा, भांडण होणार ह्याची खात्री”.
त्यावर राणे वाहिनी म्हणतात, "असं काही नाही हो, आपण चांगलं, कि सगळं चांगलं"
दोनच दिवसात राधा काकू ही त्यांची समजूत चुकीची ठरवतात.
सकाळी अकराच्या सुमारास राधा काकू राणे वहिनींकडे येउन 'विस्तव' मागतात.
राणे वाहिनी विचारतात "कशात देऊ"?
तर , राधा काकू म्हणतात, "घाला माझ्या पदरात”.
राणे वाहिनी गोंधळून म्हणतात "अहो पदरात कसा घालू? पदर जळेल ना”.
राधा काकू रागावून म्हणतात, "तुम्हाला काय करायचंय? तुमचा नवरा घेतोय का माझ्या साड्या विकत”?
तसं तर तसं, राणे वाहिनी राधा काकूंच्या पदरात विस्तव घालतात.
आता राधा काकू भयंकर भडकतात, म्हणतात, " अगं कशी बाई आहेस तू? अक्कल बिक्कल आहे कि नाही? मी घाल म्हंटलं म्हणून खरच घालायचा विस्तव पदरात? कठीण रेs बाबा हेs शेजारी”.
आहे न गम्मत??
ही म्हणजे 'unreasonable', म्हणता येतील अशी माणसं.
मग ह्यांच्या बाबतीत 'जाऊ दे' कसं म्हणायचं?
"सांगते हं, कसं म्हणायचं ते”……
आपण स्वतःला म्हणायचं, " 'जाऊ दे', जगात कितीतरी माणसं राहतात, आपण सगळ्यांशी बोलतो का? नाही ना? मग त्या पैकीच हे”. थोडक्यात स्वतःची मनशांती टिकवायला, मुर्खाशी गाठ पडता, नुसते गप्प न बसता, गपचूप त्याच्यापासून दुरही जावे.
पण अशी माणसं घरातच असतील तर?????
हा 'तर' मात्र खूपच कठीण आहे. मग तर 'जाऊ दे' ह्या मंत्राचा जप करण्याची आपल्यावर वेळ.
त्या वेळी काय करायचं माहित्येय, स्वतःला म्हणायचं, " जिसके खेत में नाला, और घर में साला, उसका खुदा रखवाला”. “तशी आपली अवस्था आहे", 'जाऊss देss’,आणि त्या माणसांकडे चक्क दुर्लक्ष करायचं.
बरं हे 'जाऊ दे' शब्द स्वतःला सांगताना, त्यात दुसऱ्या व्यक्तीच्या सहकार्याची गरज नसल्यामुळे सगळे काम बरेच सोपे होते.
आता, अगदी महत्वाचं असं observation सांगते. आपण ह्या 'जाऊ दे' चा वापर करायला लागलो ना कि, कसे माहित नाही? पण सगळ्यांना आपण खूप आवडायला लागतो, आणि मग ते, आपल्याला कुठेही जाऊ देत नाहीत.
इतकंच नव्हे, तर मला वाटतं, ते ही आपल्या काही वाईट गोष्टींच्या बाबतीत, 'जाऊ दे', असं स्वतःला सांगायला लागतात.
ह्यामुळे बहुतेकांशी असलेले संबंध सलोख्याचे व्हायला मदत होते आणि मग जगात बरंच काही चांगलं ही आहे हे आपल्याला दिसायला लागतं.
आपण मध्यमवर्गीय माणसं असंही कोणाला फारसं काही देऊ शकत नाही, मग छोट्या छोट्या चुका मोठ्या मनाने माफ करून थोडासा आनंद दुसऱ्याला देऊन, स्वतःही आनंदी राहण्याचा प्रयत्न का करू नये?
माझ्या जीवनात असे करण्यामुळे खूप स्वास्थ्य निर्माण झाले. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हीही बघा कुणाच्यातरी चुकीला 'जाऊ दे' असं म्हणून. तसे करून नकारात्मक विचार बाहेर फेकून द्यायला मदत होते हा स्वानुभव.
आज वर्षाच्या पहिल्या दिवशी, जीवनातील "forget and forgive", म्हणजेच विसरून जाऊन माफ करण्याच्या मंत्राला हातभार लावणाऱ्या "जाऊ दे ", ह्या दोन शब्दांचा, "सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये" समावेश.