काल एक मैत्रीण फोन वर म्हणाली "काय, सध्या लेखन जोरदार चाललंय?" डॉक्टरकी बंद काय? होमीयोपॅथी वर लिही कि.................
तर म्हंटलं, करावं तिच्या मनाप्रमाणे.
मी Homeopathic Medicine and Surgery ह्या विषयात पदवीधर आहे. म्हणजे B.H.M.S. आहे. ही डीग्री मी पुणे विद्यापीठातून संपादन केली आहे. त्यानंतर मी सिंगापूर मध्ये 'Specialist Diploma in Nutrition and Health Promotion’हा डिप्लोमा पूर्ण केला आहे. मी सिंगापूरला येण्याआधी ९ वर्ष मुंबई मध्ये होमीयोपॅथीक प्रॅक्टिस करत होते. आताही माझे काही पेशंट इन्टरनेट चा वापर करून, मला संपर्क करतात व मी त्यांना इथून औषध सांगते, जे, ते तिथल्या फार्मसी मधून विकत घेतात. मी Nutrition विषयक सल्लाही देते. ह्या दोन्हीचा उपयोग, सध्या मी, अर्थार्जनाकरता मात्र करत नाही. मी सिंगापूर पॉलीटेक्निक मधे पार्टटाइम लेक्चररची नोकरी करते व फुल टाइम गृहिणी व आईचं काम करते. हल्ली हल्लीच थोडं लेखनही करायला सुरुवात केली आहे.
प्रस्तुत लेखात, होमीयोपॅथी म्हणजे काय? ह्या औषध पद्धती बद्दल असणारे समज व गैरसमज, ह्याचा वापर कधी व कसा करावा, कधी करू नये, ह्याविषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.वाचकांना काही प्रश्न, शंका असतील, तर त्या त्यांनी, मला जरूर विचाराव्या. मी माझ्या कुवतीप्रमाणे त्याना उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
“मी एक होमीयोपॅथीक डॉक्टर आहे”. अशी माझी ओळख करून दिल्यावर, अगदी पु. लं. च्या 'म्हैस' मधल्या सारखा "म्हैशिना चालते काय हो तुमची होमेपदी?” असा जरी नाही, तरी काही प्रश्न निश्चित पणे समोरून येतात.
पहिला, " होमीयोपॅथी म्हणजे साबुदाणा गोळ्या ना?"
दुसरा, "मग तुम्ही होमीयोपॅथी प्रॅक्टिस करता का जनरल फीजीशीयन?
तिसरा, “हे औषध खूप दिवस घ्यावं लागतं ना?"
चौथा "औषध द्यायला तुम्हाला जाम माहिती विचारावी लागते ना पेशंटची? अगदी आजी आजोबांच्या वेळ पासून?", असे.
हे प्रश्न एक वेळ परवडले, पण काही माणसं मलाच होमीयोपॅथीबद्दल माहिती पण देतात, जशी कि, ही औषधं पुस्तक वाचून सहज घेता येतात. गोड असल्यामुळे लहान मुलांना अगदी सहज देता येतात, केस गळण्यावर ह्यांचा खूप उपयोग होतो, वगैरे.
एकदा तर एक बाई माझ्या दवाखान्यात मला म्हणाल्या कि “हे औषध खरं तर काही आजार नसताना घ्यायचं असतं म्हणजे आजार न होण्या करता ते मदत करतं, आणि तरीसुद्धा बरं नाहीसं झालं, तर तेवढ्या पुरतं पटकन allopathic औषध घ्यायचं. परत बरं वाटलं कि होमीयोपॅथी सुरू……असो.
आजचा लेख अश्याच काही समज गैरसमजांचे निवारण करण्यासाठी…….
होमीयोपॅथी हे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणामध्ये, कॉमप्लीमेनट्री and ऑलटरनेटिव्ह मेडीसीन ह्या शाखेत येतं. कॉमप्लीमेनट्री म्हणजे कशाच्या तरी बरोबर, ऑलटरनेटिव्ह म्हणजे कशाच्या तरी ऐवजी, हे कशाच्या तरी बरोबर किंवा ऐवजी, असं जेव्हा म्हंटलं जातं, तेव्हा त्याचा अध्याहृत अर्थ Allopathy औषधा बरोबर किंवा ऐवजी असा असतो.
माझ्या अनुभवाप्रमाणे होमीयोपॅथी चा उपयोग, कॉमप्लीमेनट्री मेडिसीन म्हणून जास्त गुणकारक होतो.
होमीयोपॅथी ह्या शाखेची संकल्पना डॉक्टर Samuel Hahnemann ह्यांनी जर्मनी मध्ये १७९६ साली प्रथम अस्तित्वात आणली. ते स्वतः एक Allopathic डॉक्टर होते, पण त्यांना, त्या वेळेस दिली जाणारी उपचार पद्धती तितकीशी पसंत नव्हती. त्यांच्या मते, उपचारांमुळे रुग्णाला बरं वाटण्याच्या ऐवजी, त्रासच अधिक होत असे. त्या काळी, उपचार करताना रुग्णाला जुलाब होणारे औषध देणे, रक्तपात होऊ देणे, रासयनिक पदार्थ वापरून उपचार करणे, अश्या पद्धतींचा वापर होत असे.
ह्या सगळ्या पद्धती डॉक्टर Hahnemann ह्यांना पटत नसल्यामुळे, त्यांनी डॉक्टरकी करायची सोडून दिली आणि ते वैद्यकीय पुस्तकांच्या ट्रान्सलेशनचं काम करू लागले. ‘क्युलेन्स मटेरिया मेडिका’ नावाच्या, अश्याच एका पुस्तकाचं ट्रान्सलेशन करत असताना त्यांना 'सिंकोना ओफिशिनालीस' नावाच्या साउथ आमेरिकन झाडाच्या सालाबद्दलची माहिती वाचायला मिळाली. ह्याचा उपयोग त्याकाळी मलेरीयाच्या उपचारांकरता केला जात असे. ह्या औषधाबद्दल त्यांच्या मनात खूपच कुतूहल निर्माण झाले, आणि त्यांनी त्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात, त्या सालाचा रस काढून, त्याचे सेवन केले.
तो रस प्यायल्या नंतर, मलेरीया झालेल्या माणसामध्ये जी लक्षणं दिसून येतात, ती सर्व लक्षणं, स्वतः मध्ये दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ह्यानंतर त्यांना अनेक औषधांच्या बाबतीत हे लक्षात आले कि, एखाद्या रोगाला बरं करण्याकरता जे औषध दिले जाते, तेच औषध एखाद्या निरोगी व्यक्तीला दिले असता, त्याच्यामध्ये त्या रोगाची(ज्या करता ते औषध म्हणून वापरले जाते) लक्षणं दिसून येतात.
सध्या शब्दात सांगायचे झाले, तर एखादे खोकल्यावर उपाय करणारे होमीयोपॅथीक औषध निरोगी माणसाला दिले तर त्याला खोकला होतो.
आणखी काही प्रयोग केल्यानंतर त्यांनी होमीयोपॅथी चा सर्वात महत्वाचा सिद्धांत मांडला, ‘Similia Similibus Curenter’, म्हणजे ‘Let Likes be Cured by Likes’हा तो महत्वाचा सिद्धांत. होमीयोपॅथीचे डॉक्टर ह्या महत्वाच्या सिद्धांताचा वापर करूनच आजही औषध देतात.
ज्या औषधामुळे एखादा आजार बरा होऊ शकतो, त्या औषधा मधे, तोच आजार, निर्माण करण्याची शक्ती असते, ह्याची एकदोन उदाहरणं द्यायची म्हंटली तर, होमीयोपॅथी मधील, Antimony Tart हे दम्याच्या रुग्णांमध्ये वापरले जाणारे औषध निरोगी व्यक्तीने घेतले असता, त्याच्यात दम्याची लक्षणे दिसून येतात.
Allium Cepa हे सर्दीकर्ता वापरले जाणारे औषध, कांद्यापासून बनते. आपल्यापैकी सर्वांनीच कांदा चिरताना सर्दी झाल्यावर दिसतात तशी लक्षणे, जसं कि डोळ्यातून नाकातून पाणी येणे, डोळ्यांची आग होणे, नाक चोंदणे ह्याचा अनुभव अनेक वेळा घेतला असेलच.
होमीयोपॅथीक औषध देताना व्यक्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना विचारात न घेता, त्या व्यक्तीच्या शरीतात दिसून येणाऱ्या आणि त्या व्यक्तीला जाणवत असलेल्या सर्व लक्षणांचा विचार करून, मगच औषध उपाय योजना आखली जाते.
थोडक्यात, डोकेदुखी करता एक , पोटदुखी करता दुसरे, तापाकरता तिसरे, अशी अनेक औषधं न देता, डोकेदुखी, पोटदुखी, व ताप ह्या सर्वांचा एकत्र विचार करून, सर्व लक्षणांचे शमन करणारे एक औषध निवडले जाते. गरजे नुसार हे औषध पुढील उपाय योजना करताना योग्य वेळी बदलण्याचा निर्णय होमीयोपॅथीक डॉक्टर वेळोवेळी घेतात.
डॉक्टर नेहमीच Totality of Symptoms, म्हणजेच एखाद्या रुग्णाच्या शरीरातील, शारीरिक व मानसिक लक्षणं एकत्रित करूनच औषध योजना करतो. ह्याच कारणामुळे होमीयोपॅथीक डॉक्टरांना रुग्णाची सगळी माहिती खोलात जाऊन विचारावी लागते.
ह्या माहितीच्या आधारेच अचूक औषध तो शोधू शकतो.म्हणूनच होमीयोपॅथीमधे Case taking, अर्थातच रुग्णाची सर्व माहिती मिळवणे ह्याला अनन्यसाधारण महत्व असते. ह्याचं कारण, कुणाच्याही अगदी सहज लक्षात येईल असं आहे. रुग्णाची माहिती व्यवस्थितपणे न मिळवता औषध उपाय योजना सुरु केली असता, ती संपूर्णतः चुकीची ठरू शकते.
म्हणूनच होमीयोपॅथीक डॉक्टर ह्या Case Taking ला एक कला मानतात. एखादा चित्रकार जसे वेगवेगळे रंग भरत एखादे सुंदर चित्र तयार करतो, तसेच रुग्णाकडून बारीक बारीक माहिती काढून घेत होमीयोपॅथीक डॉक्टर आजाराचे एक पूर्ण चित्र तयार करतो. मग त्या चित्राला वेगवेगळ्या औषधांच्या चित्राबरोबर जुळवून बघतो. दोन्ही मध्ये अचूक समन्वय साधल्या नंतर त्या औषधाची निवड करून, रुग्णाला, रोग पासून मुक्त करतो.
होमीयोपॅथी बद्दल आणखी माहिती, त्याबद्दलचे समज गैरसमज, ह्याबद्दलची माहिती पुढच्या लेखात नक्की वाचा………
Dr. Samuel Hahnemann औषधांचे गुणधर्म शोधण्याकरता, औषधे निरोगी माणसाना देऊन त्यांच्यावर प्रयोग करत असत. ह्याला होमीयोपॅथी मधे 'ड्रग पृव्हिंग' असे म्हंटले जाते. 'ड्रग पृव्हिंग' करताना Dr. Hahnemann, औषध घेणाऱ्या माणसावर, त्या औषधाचे विपरीत किंवा जीवघेणे परिणाम होऊ नयेत, ह्यासाठी औषधांना dilute करत असत. हे dilution पाणी किंवा alcohol वापरून केले जात असे. ह्या 'ड्रग पृव्हिंग' मुळे औषधाचे सर्व परिणाम अत्यंत बारकाईने समजून घेणे सोपे होते, आणि म्हणूनच होमीयोपॅथीक औषधे रुग्णा करता अत्यंत सुरक्षित सिद्ध होतात.
हे 'ड्रग पृव्हिंग' करत असताना होमीयोपॅथी मधील आणखीन एक आश्चर्यजनक शोध Hahnemann ह्यांना लागला. औषध dilute करून, त्या नव्या तयार झालेल्या मिश्रणाला, एखाद्या elastic पृष्ठभागावर नियमितपणे आपटले असता, ते औषध, रोग निवारण करताना जास्त परिणामकारक ठरते, असे त्यांना दिसून आले. ह्या नियमित आघाताना Succussions असे म्हंटले जाते.
अश्या प्रकारे dilution आणि succussion ह्यांचा वापर करून औषधे तयार केली जातात. ह्या प्रक्रियेला Potentisation असे म्हंटले जाते.
औषधांचे Potentisation करताना, अनेक वेगवेगळ्या power ची औषधे होमीयोपॅथी मध्ये तयार केली जातात. ह्या power लाच 'पोटेन्सी' असे म्हंटले जाते. आपण कधी होमीयोपॅथीक औषधांचे prescription पहिले असेल,तर आपल्याला औषधाच्या पुढे 6X, 12X, ३०, किंवा २०० असे आकडे दिसले असतील. हे आकडे म्हणजेच त्या औषधांची power किंवा 'पोटेन्सी'. रुग्णाच्या गरजेनुसार, होमीयोपॅथीक डॉक्टर योग्य ठरेल अशी पोटेन्सी उपाय योजना करताना निवडतात.
होमीयोपॅथीक उपाययोजनेत व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा विचार केला जातो. इतकंच नव्हे तर तो रहात असलेल्या सभोवतालच्या परिस्थितीचा ,अनुवंशीकतेचा आणि त्याच्या मुलभूत शारीरिक, मानसिक रचनेचाही(ज्याला आम्ही Constitution असेही म्हणतो) विचार केला जातो. अश्या पद्धतीच्या दृष्टीकोनाला 'Holistic Approach of Treatment' असं म्हंटलं जातं.
ह्याचा विस्तार करून समजवायचं झालं तर, एका उदाहरणाने ते करता येईल.
एखाद्या जिवंत व मृत व्यक्ती मधे नक्की काय फरक आहे? असे विचारले असता, मृत व्यक्ती मधे प्राणाची कमतरता आहे, असे उत्तर आपण सहजपणे देऊ शकतो. म्हणजेच, मृत व्यक्ती मध्ये कुठेतरी जीवनदायी शक्तीचा आभाव असल्याचे आपल्याला सर्वांनाच मान्य आहे. होमीयोपॅथी मध्ये ह्या प्राणदायी शक्तीला Vital Force असे म्हंटले जाते.
होमीयोपॅथी च्या सिद्धान्तांप्रमाणे, जोपर्यंत ही शक्ती व्यवस्थित कार्यरत आहे तोवर मनुष्य आरोग्यपूर्ण आहे असे आपण सहज म्हणू शकतो, ह्या शक्तीला जेव्हा थोडीफार इजा पोहोचते तेव्हा मनुष्य आजारी पडतो, आणि हि शक्ती जेव्हा शरीरातून संपूर्णतः नाहीशी होते तेव्हा मनुष्य मरण पावतो.
अगदी साध्या शब्दात जर सांगायचं म्हंटलं, तर प्रत्येक होमीयोपॅथीक डॉक्टर, ह्या Vital Force ला healthy बनवायचा प्रयत्न करतो.
ही प्राणशक्ती आपल्याला दिसत नसली तरी तिचे अस्तित्व आपण जसे नाकारू शकत नाही, तसेच होमीयोपॅथीक औषधाचा असर कसा होतो हे रूप रेषेने दाखवता येत नसले तरी, रुग्ण बरा झालेला आपल्याला दृश्य स्वरुपात पाहायला मिळतो. ह्या गोष्टीवर allopathy आणि होमीयोपॅथी मधे अनेक वेळा वादंग उद्भवतो असे पाहायला मिळाले आहे. Allopathy फक्त शरीरात होणाऱ्या दृश स्वरूपातल्या रासायनिक प्रक्रियांवर विश्वास ठेवते. होमीयोपॅथी अदृश्य स्वरूपातला vital force आरोग्यपूर्ण बनवायचा प्रयत्न करते. त्यांच्या मते रुग्णाला जुलाब होत असल्यास, बध्कोष्ट निर्माण करू शकेल असा पदार्थ त्याला औषध म्हणून द्यावा. होमीयोपॅथी मधे त्याच्या अगदी विरुद्ध केले जाते. सामान्य निरोगी माणसामधे जे औषध दिल्यामुळे त्याला जुलाब होऊ शकतील तेच औषध जुलाब बरे करण्याकरता दिले जाते.
Allopathy च्या मते होमीयोपॅथी एक placeboचे काम करते. (Placebo म्हणजे, असा पदार्थ कि जो खरं तर आपल्या मनाची समजूत घालणे, ह्यापेक्षा जास्त कुठलाही बदल, शरीरात घडवून आणत नाही.) त्यांच्या मते होमीयोपॅथीक औषध अत्यंत dilute केलेली असल्यामुळे त्याच्यात फक्त पाणी किंवा अल्कोहोल असते. त्यात कुठलाही औषधाचा गुण शिल्लक नसतो.
ह्या समजुतीला, IIT मधील प्रशांत चीक्रमाणे, ह्या Research Studentने खोटं ठरवलं आहे. Diluted औषधातही मूळ औषधातील कण उपस्थित असलेले त्यांनी दाखवून दिले. ह्या विषयी माहिती इथे वाचू शकता.…….
किंवा इथेही ….
होमीयोपॅथी हि एक अत्यंत गुणकारी उपचार पद्धती असल्याचे मी स्वतः, अनुभवांती, खात्रीलायक सांगू शकते.
मुलं, मोठी माणसं, सर्वजण ह्याचा उपयोग करून घेऊ शकतात. अनेक वर्ष होत असलेला त्रास, होमीयोपॅथीक औषधाने समूळ नष्ट झालेला, मी स्वतः पाहिलेला आहे.
अर्थात, जश्या प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, तश्याच त्या होमीयोपॅथीलाही आहेत. एखाद्या भरपूर भाजलेल्या व्यक्तीला आपण जर हॉस्पिटल मध्ये न नेता त्याच्यावर होमीयोपॅथीक उपचार करत बसलो तर ते निश्चितच चुकीचे ठरेल.
पण होमीयोपॅथी ही एक अत्यंत स्वस्त, सुरक्षित, सोपी, सर्वांकरता उपयोगी अशी उपचार पद्धती आहे ह्याबद्दल मात्र कुठलीही शंका नाही.
मला पुढे असंही सांगावसं वाटतं कि, कोणीही पुस्तकं वाचून घ्यावी, अशी ती, औषधं मुळीच नाहीत. योग्य औषध निवडण्याकरता विशेष अभ्यासाची नक्कीच गरज आहे.
साबुदाण्या सारख्या दिसणाऱ्या होमीयोपॅथक गोळ्यांमध्ये, वेगवेगळी उपायकारक औषध मिसळली जातात. ह्या गोळ्यांचा वापर औषधाला वाहून नेणाऱ्या एखाद्या वेहीकल सारखा केला जातो.
मी स्वतः कधीही होमीयोपॅथी सोडून दुसरे कुठलेही औषध माझ्या दवाखान्यात रुग्णांना दिले नाही. त्यामुळे मी जनरल फिजिशिअन नक्कीच नाही.
होमीयोपॅथीचा उपाय फक्त केस गळण्यावर, होत नसून, इतर अनेक समस्या त्याने दूर होऊ शकतात.
आणि, अतिशय महत्वाचे म्हणजे, काही होत नसताना घेण्याचे औषध तर ते मुळीच नाही, तसे करण्याने, कदाचित आपण स्वतःवर आजार ओढवून घेऊ शकता.
अश्या ह्या गुणकारी होमीयोपॅथीचा आपल्यालाही आवश्य उपयोग करून घेता यावा, म्हणून होमीयोपॅथीबद्दल माहिती देणाऱ्या ह्या लेखाचे प्रयोजन.
होमीयोपॅथीक डॉक्टर ही माझी स्वतःची पहिली, स्वतंत्र ओळख, म्हणून, ह्या माझ्या जिवाभावाच्या होमीयोपॅथीचा, माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश …….