Wednesday, 25 December 2013

Sankalp


वर्षाच्या सुरुवातीला अनेक मंडळी नवे संकल्प करतात. जसं की, यंदा मी डायरी लिहिणार किंवा मी यंदा वजन कमी करणार, किंवा डाएटींग करणार वगैरे वगैरे ……. 

ह्यावर्षीच्या मुंबई ट्रीपमध्ये आल्येला वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारावर बोलायचं झालं तर, माझ्या मते, काही अपवाद वगळता बऱ्याच मंडळीनी, "भारतीय संस्कृतीत शिकवल्या प्रमाणे, मी एक चांगला माणूस बनेन", असा संकल्प करायला हवा आहे"

गेली अनेक वर्ष जगभरात भारत हा देश त्याच्या संस्कृती मुळे प्रसिद्ध असल्याचे आपण सर्वच जाणतो. आता त्यातलं खरंच काही उरलंय का?, असा प्रश्न मला अनेक ठिकाणी पडला. पूर्वी बऱ्याच चांगल्या गोष्टींकरता, "It happens only in India", असं म्हंटलं जायचं, ते आता उपहासाने वाईट गोष्टींकरता म्हंटलं जातंय, ह्या बद्दल अत्यंत खेद वाटतो. 

खंर बोलणे, दिलेला शब्द पाळणे, दुसऱ्याची फसवणूक न करणे, दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीचा विचार करणे, आपले काम सचोटीने करणे, पैश्यापेक्षा लहानपणापासून शिकलेल्या तत्वांना महत्व देणे, हे पूर्वी आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे असे असलेले गुण बऱ्याच ठिकाणी माणसांनी ओला फडका घेऊन पुसून टाकलेत असं वाटलं.

इतर सर्व गोष्टींच्या तुलनेत फक्त आणि फक्त पैसा श्रेष्ठ ठरतोय, असं अनेक ठिकाणी दिसून आलं.

मी व माझे मिस्टर, कुठल्याही कामासाठी गेल्यावर, आम्ही सिंगापूरला राहतो, हे सांगणं, टाळण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मते, कुठल्याही सेवेचा लाभ प्रत्येक माणसाला समान रीतीने मिळायला हवा. पण तसं होताना दिसत नाही. काही ठिकाणी वेळाच्या असलेल्या बंधनामुळे, आम्ही परदेशात राहतो, ह्याचा उल्लेख केला, कि समोरच्या माणसाच्या वागण्यात, अमुलाग्र बदल झालेला दिसतो. 

आमच्या बरोबर त्या माणसाचे वागणे, त्याच्या समोर असलेल्या दुसऱ्या गिऱ्हाइकाच्या तुलनेत खूप वेगळे आहे असे प्रकर्षाने जाणवते. 
असं काही घरी सांगितलं कि, माझी आई गमतीने नेहमी, "अगं असंच असतं, “थोर कुले त्याला जग भुले", असं म्हणते. 

मला ते का कोण जाणे, खूप टोचतं, म्हणून, ह्याच्या मागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही गोष्टी निरीक्षणात आल्या. पहिले म्हणजे लोकांची जीवन जगण्याची पद्धत खूप बदलल्याचं जाणवलं. ‘स्वार्थ', ह्या अवगुणाने परमोच्च उंची गाठल्याचं दिसलं. लोकांना, मी आणि माझं ह्याच्या पुढे काही दिसत नाही असं निरीक्षणात आलं.

पूर्वी आपण ‘ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता कशाला विचारायचा’ असं म्हणत असू. त्याप्रमाणे जर विचार करायचा म्हंटलं, तर, जेव्हा आपल्याला कपडे घ्यायचे नाहीयेत, तर ते उगीच घालून का बघायचे असा विचार करणे बरोबर. पण हल्ली तसे होत नाही. हल्ली बरीच मंडळी शनिवार रविवार mall मधे गम्मत करायला जातात. वेगवेगळ्या दुकानात जाऊन तिथले कपडे घालून बघतात, नंतर काहीच खरेदी न करता निघून जातात. 

एक गम्मत तर अगदी सांगण्यासारखी आहे. आम्ही ठाण्याला नवीनच सुरु झालेल्या "व्हिव्हीयाना" ह्या mall मधे असलेल्या shoppers stop ह्या दुकानात, मिताली करता, कपडे घ्यायला गेलो होतो. काही आवडलेले कपडे निवडून आम्ही trial रूम च्या ठिकाणी गेलो. तिथे, मितालीच्या शेजारचा रूम मधे, दुसरी एक मुलगी पण काही कपडे घालून बघत होती. अगदी tip top तयार होऊन ती दुकानात आली होती. मी मितालीचे कपडे कसे दिसतात हे पाहण्याकरता तिथेच उभी होते. 

शेजारच्या रूम मधली ती मुलगी, एक ड्रेस घालून बाहेर आली, तिच्या बरोबर असलेला एक मुलगा पटकन पुढे आला, ती मुलगी एक छान पोझ मधे उभी राहिली व मुलाने mobileफोन वापरून पटकन तिचा एक फोटो काढला. इतक्यात, सिक्युरिटीवाली बाई पुढे आली व तिने फोटो काढायला मनाई केली. तो मुलगा "ओके, ओके" असं म्हणून मागे गेला. काढलेला फोटो तसाच राहिला. ती मुलगीही तिचे स्वतःचे कपडे घालून बाहेर आली. दोघे निघून गेले. 

जरावेळाने दुकानाच्या बाहेर मी स्वतः त्या दोघांचे बोलणे ऐकले, त्यावरून, ड्रेस खरेदी करणे शक्य नाही, पण फेसबुक वर तश्या कपड्यात फोटो पोस्ट करायचाय, ह्या कारणासाठी त्यांनी तो पर्याय निवडला होता, आणि निवडलेल्या पर्यायाबद्दल कुठलाही खेद तर सोडाच, 'कसं फसवलं’? ह्याचा आनंद दिसत होता. 

माझ्या अखंड आयुष्यात जे आपले नाही, ते उचलून वापरणे म्हणजे चोरी, असं मला शिकवलं गेलं.

तेच मी माझ्या मुलांना शिकवलं.

आम्ही वसईला राहत असताना मी नेहमी स्कूटर वर जाऊन ‘पाटील पवार कंपनी’ ह्या दुकानातून पाच पाच किलो कांदे बटाटे आणत असे. मिताली बरेच वेळा स्कूटर वर पुढे उभी राहून माझ्या बरोबर येत असे. त्यावेळेस ती अडीच तीन वर्षाची असेल. अशीच एकदा मी कांदे बटाटे आणायला गेले, निवडून कांदे बटाटे घेतले, पैसे दिले, मितालीला स्कूटरवर पुढे उभं केलं व निघाले. पुढे येऊन सिग्नल साठी थांबले तेव्हा मितालीच्या हातात मला एक बटाटा दिसला. मी कांदे बटाटे निवडत असताना ती बटाटे घेऊन खेळत होती व मी निघाल्यावर हातात एक बटाटा तसाच ठेऊन निघाली होती. 

तिच्या शब्दकोशात तेव्हा, ‘चोरी’ हा शब्द अस्तित्वात सुद्धा नव्हता, पण मी त्या शब्दाची तिला ओळख करून दिली, व आपण ती कधीही करायची नाही हे हि शिकवलं. 

मी तिला, मिताली आपण हा बटाटा परत देऊन येऊया, आपण त्या बटाट्याचे पैसे दिले नाहीत म्हणजे आपण तो चोरी केला असं होईल, तेव्हा तू, तो मी चुकून घेतला असं सांगून दुकानवाल्या काकांना SORRY म्हणून परत दे, असं सांगून परत दुकानात नेलं होतं. 

दुकानदार मला खूप छान ओळखत होता, तो मला म्हणाला, डॉक्टर, "तुमच्या सारख्या चांगल्या माणसांमुळे जग चालू आहे हो, एक बटाट्याचं काय नाय, पण त्या छोट्या पोरीला किती मोठी गोष्ट शिकवलीत”. 

हे, ह्या मुलांना कोणी शिकवत नाही का?????

आणि मग कदाचित अश्या मंडळींचे अनुभव आल्यामुळेच विक्रेत्यांच्या वागण्यातही बदल झाला असावा का? तेही असा विचार करत असतील, कि "ह्या फुकट्याना कशाला द्यायचा मान, त्यापेक्षा ही परदेशातील मंडळी नक्की खरेदी करतील, आपण त्यांच्याकडे पाहूया". असं तर त्यांना वाटत नसेल?

दुसरी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, हल्ली बाह्य देखावा छान करण्याचा अट्टाहास. सगळीकडे चढाओढ, मी तुझ्या पेक्षा सरस आहे हे दाखवण्याची…. 
पूर्वी कितीही असलं तरी ते दाखवण्याची काय गरज आहे असा विचार रूढ होता, आता मुळात काही नसले तरी चालेल पण दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा विचार जास्त पाहायला मिळतो. आम्ही आठवड्यातून एकदा तरी हॉटेलात जेवायला जातो, आम्ही परदेशात ट्रीप केल्येय, आम्ही branded कपडे वापरतो, हे सांगता येणे गरजेचं आहे असं अनेकांना वाटतं. पाश्चात्य गोष्टींचं अंध अनुकरण करणे हे तर जिथे तिथे पाहायला मिळतंय. 


'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हा विचार बाजूला सारत 'उच्च राहणी आणि अति सामान्य, किंबहुना नीच विचारसरणी' हा विचार अंगीकारताना अनेक दिसतायत.बाह्य रूप चकाचक असणे महत्वाचे. मित्र मैत्रिणी आले असताना वृद्धांनी बाहेरच्या खोलीत आलेलं बऱ्याच लोकांना आवडत नाही असं पाहायला मिळालं. का वाटत असेल असं त्यांना? लहानपणी आपलं गळणारं नाक घेऊन, किंवा ओली चड्डी घेऊन, आपण त्यांच्या मित्र मैत्रिणींसमोर जात होतो तेव्हा लाज वाटून, त्यांनी आपल्याला आतल्या खोलीत ठेवलं असतं तर? ह्याचा विचार कोणी का करत नाही?


Strength Of Character ज्याला म्हणतो ना आपण, त्याचा आभाव सगळीकडे दिसतोय. जो तो Principle Of Convinience वापरताना दिसतोय. 
“का होतंय हे असं”? 
“कोण आणि कसं बदलणार”? 
“केव्हा बदलणार”? 
“बदल आणखी वाईट तर होणार नाही ना”?

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न… मध माश्यांसारखे घोंगावणारे……. हे सगळं पाहून भारताला कोणाची तरी दृष्ट लागली असं फीलिंग मला येतं.

उत्तर सध्या एकच मिळतंय… सर्व काही आपणच बदलायला हवय, आपण, प्रत्येकाने.

प्रत्येक माणसाने 'जुने ते सोने', ह्या म्हणीची आठवण काढून आत्मपरीक्षणाने चुका दुरुस्त करण्याचा जर नवीन वर्षी संकल्प केला तर बरेच सकारात्मक बदल समाजात होऊ शकतील असा माझा विश्वास आहे. 

'कालाय तस्मै नमः', हे जरी खरं असलं, तरी वाईट गोष्टी अंगीकारण्याची सक्ती करण्याचा अधिकार दुसऱ्याला कोणाला देण्याची मला गरज वाटत नाही.


माझ्यासारखी मतं असणारेही अनेक आहेत हे हि मला पक्कं ठाऊक आहे, आपण सर्व मिळून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एखाद्याला तरी, असा विचार करायला लावायचा, नव्या वर्षात संकल्प करूया. 
शेवटी म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे' अगदी तसंच.


"अस्सल भारतीय संस्कृती" हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, आज त्याच्या विषयीच्या विचारांचा 'सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये' समावेश……… 

कसा वाटतोय विचार???? नक्की कळवा…..

Thursday, 21 November 2013

Plastic Surgery..

वीस मार्च दोन हजार बारा, त्या दिवशी सकाळी, साधारण सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान मला स्वप्न पडलं. किंबहुना त्या स्वप्नामूळेच मी झोपेतून जागी झाले, असं म्हंटलं तरी चुकीचं ठरणार नाही. स्वप्नात मला कोणाच्या तरी, तळ हातावर, प्लास्टिक सर्जन घालतात तसे अगदी बारीक टाके घातलेले दिसले. थोडी अस्वस्थ अशीच जागी झाले आणि लगेच ह्यांना उठवून त्याबद्दल सांगितलं. 

मन थोडं अस्वस्थच होतं म्हणून, ह्यांना म्हंटलं, “टेनिस वगैरे खेळताना जरा सावध खेळा आज”. तर ते म्हणाले, "आज टेनिस नाही खेळणार आहे मी". मुलांनाही स्वप्नाबद्दल सांगितलं आणि म्हंटलं, “आज मस्ती जरा कमी करा”. त्यावर मिताली मला तिचा "O GOD! Superstition again, वाला चेहरा करून "बरं "असं म्हणाली. आदित्यने तर फारसं लक्षच दिलं नाही. नंतर कामांच्या गडबडीत मीही स्वप्नाबद्दल विसरले. 

त्या दिवशी माझा ब्रेड मेकिंग चा तिसरा क्लास होता. मी व माझी मैत्रीण दोघीजणी मिळून त्या क्लास करता जायचो. क्लास दुपारी एक वाजता असायचा. आम्ही दोघी साधारण बारावाजता जेऊन वगैरे घरातून निघायचो. तश्याच आम्ही त्यादिवशी क्लास करता निघालो. 'OutramPark' नावाच्या स्टेशन वरून चालत जाण्याच्या अंतरावर आमचा क्लास होता. 

सिंगापूरला बहुतेकसे सायकलवाले फूटपाथ वर सायकल चालवतात व चालणाऱ्या मंडळीना बेल वाजवून बाजूला व्हायला लावतात. फूटपाथ वरून चालत असताना असाच एक सायकलवाला आमच्या मागून आला. तेव्हा मी बाहेरच्या बाजूला आणि मैत्रीण आतल्या बाजूला अश्या चालत होतो. सायकलवाला मागून आल्यामुळे, ती चालताना माझ्या बाजूला सरकली व मी फुटपाथ वरून खाली उतरून गवत असतं त्या बाजूला गेले. त्या गवतात एक खड्डा होता. बारीक होता, पण माझा पाय त्यामध्ये मुडपला गेला. पुढे स्वतःला सावरण्याच्या प्रयत्न करत असताना, मैत्रीणही गवताच्या बाजूला उतरली व तिच्या ओढणीत माझा पाय अडकला. 

माझ्या उजव्या पायाचा घोटा आधीही एक दोन वेळा मुरगळल्या मुळे थोडासा कमजोर आहे. त्यामुळे वेडावाकडा जोर पडल्यावर, घोटा खूपच दुखावला जाऊन मी वेडी वाकडी एका लोखंडी गेटवर आदळले, माझ्या कपाळाला मोठी खोक पडली. चष्मा फुटला, पर्स घासली गेली, घड्याळाची काच फुटली. कुठलंही कारण नसताना एक मोठा अपघात झाला. माझ्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. दोघींचे रुमाल रक्ताने गच्च भरून रक्त जमिनीवर टप टप सांडू लागले. पाच एक मिनिटात माझ्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली.



माझी मैत्रीण अतिशय भित्रट. तिला ते रक्त पाहून कसे तरीच व्हायला लागले. ती आपली वेड्यासारखी माझ्याकडे पाहत काही न करता उभी होती. मी तिला Taxi थांबवायला सांगितले. जिथे पडले होते तिथून सिंगापूर जनरल हॉस्पिटल अगदी ५-७ मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच हॉस्पिटल मधली एक इंटर्न तिथून जात होती. तिने तिथे थांबून, "मी काही मदत करू का? असे विचारले. 

मी तिला, मी ही एक डॉक्टर आहे. मला माझी जखम दिसत नाहीये, पण ती खोल आहे एवढ़ निश्चित, तू रुमाल काढून जरा बघून सांगशील का टाके लागतील का?असं विचारलं. तिने रुमाल बाजूला करून, “yes, its quite deep, I can see your temporal bone, please rush to SGH”, असं मला सांगितलं. थोडक्यात Family डॉक्टरच्या आवाक्यातलं हे काम नाही हे माझ्या लक्षात आलं. इतक्यात taxi आली. 

मी हॉस्पिटल मधे जायचा निर्णय घेतला. आम्ही दोघी taxi तून हॉस्पिटलकडे निघालो. रक्त वहातच होतं व थोड्याच वेळात आपल्याला चक्कर येणार असा अंदाज बांधून, मी ‘ह्यांना’ फोन लावून, KBC मधे 'फोन ए फ्रेंड' लाइफ लाईन वापरल्यावर जसे भराभर बोलतात, तसे, भराभर झाला प्रकार सांगितला आणि SGH मधे यायला सांगितले.मी मानाने खंबीर राहायचं असं स्वतःला सांगत राहिले त्यामुळे जरा विक वाटत असलं, तरी चक्कर येउन बेशुद्ध वगैरे पडले नाही. 


इमरजन्सी मेडिसीन डीपार्टमेंट मधे पोहोचल्यावर माझी सगळी माहिती लिहिण्यात पंधरा मिनिटे गेली. तेवढ्या वेळात ‘हे’ ही तिथे आले, मग माझ्या मैत्रिणीला आम्ही थोड्या उशिराने का होईना पण तू क्लास ला जा असे सुचवले.


नंतर, तिथे माझं temporary ड्रेसिंग करून त्यांनी मला एका mobile बेडवर झोपवून आत ward मधे नेलं. मी त्यांना मला थोडी साखर द्यायला सांगितली. कारण खूप जास्त blood loss झाला असता blood sugar level झटकन खाली येउन चक्कर यायला लागते. मलाही तसेच होत होते. पण त्या nurse, तुम्हाला diabetes आहे का तरच आम्हाला साखर द्यायला परवानगी आहे असं अचरटा सारखं बोलतऱ्हायल्या. 

मग मी ‘ह्यांना’ फोन करून, candy म्हणजे आपल्या लिमलेटच्या असतात तश्या गोळ्या आणायला सांगून त्या चघळत राहिले. फोन करण्याचं कारण असं कि, नातेवाईकांना ward च्या आत जायला परवानगी नसते, फक्त patient ला आत नेतात. त्यामुळे मी आत होते व ‘ह्यांना’ बाहेरच थांबावं लागलं होतं.


इमरजन्सी मेडिसीन डीपार्टमेंट मधेही कुठलंही काम इमर्जन्सी असल्यासारखं कुणीही करत नव्हतं. ज्याच्या जीवावर जास्त बेतलंय, त्याचा नंबर पहिले लागत होता. डोक्याच्या जखमेने मी मरणार नसल्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यावं असं कोणालाही वाटत नव्हतं. नातेवाईकांना आत येण्याची परवानगी नसल्यामूळे हे ward च्या बाहेरच उभे होते. मी आपली माझा नंबर लागण्याची वाट पाहत बेड वर चुपचाप पडून होते. मधे मधे फोन करून 'ह्यांच्याशी' बोलत होते. 

मला साधारण एक वाजता ward च्या आत आणलं होतं, त्यानंतर साधारण अडीच तास, पाहिलं ड्रेसिंग सोडलं तर माझ्यावर कुठलेही उपचार झाले नव्हते. साडेतीन वाजता माझ्यातील मराठी बाईच्या सहनशक्तीचा अंत झाला. मी माझ्या बेड वरून खाली उतरून ward च्या बाहेर जाणाऱ्या दाराकडे चालायला लागले. दाराच्या जवळ पोहोचलेच होते इतक्यात एक सिक्युरिटी guard व एक nurse धावत धावत माझ्या पर्यंत आले, आणि मला “तुम्ही कुठे चाललात?” “तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही”, असं सांगू लागले. 

त्यावर मी, "मला इथे येउन जवळ जवळ तीन तास झाले आणि तेवढ्या वेळात मला काही झाले नाही, त्यामुळे इमरजन्सी मेडिसिनची मला आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”. “मी ही एक डॉक्टर आहे. मी taxi ने जाऊन माझ्या जखमेला, माझ्या डॉक्टरकडे, टाके घालून घेईन", असे त्यांना जरा रागातच सांगितले. 

त्यावर त्यांना काय वाटले कोण जाणे, पण “आम्हालाही सगळ्या पेशंटना बघावं लागतं”, “Please Ma'am, do not leave”, असं ती Nurse मला म्हणू लागली. इतक्यात एक Indian lady डॉक्टर तिथे आली आणि “I am your attending Doctor, Please let us go to your bed”.असं म्हणू लागली. त्यानाही माझ्याकडे जरा जास्तच दुर्लक्ष झाले हे लक्षात आले होते होते. माझ्या आविर्भावावरून ही बाई,बहुतेक लवकरच, गोंधळ घालायला सुरुवात करेल, अशी त्यांना शंका आली असावी.

मग त्या डॉक्टरांनी माझी जखम बघितली. ती अत्यंत खोल असल्यामुळे, X-ray, व त्यातही नीट समजत नसल्यास, CT Scanning करावे लागेल असे त्यांचे म्हणणे पडले. मग न्युरोसर्जन येउन मला इंटर्नल bleeding मुळे काही झाले आहे का?, हे तपासण्या करता, विविध प्रश्न विचारून गेले.


मग सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. कुठेही काही abnormal नाही असे कळल्यावर साडेचार वाजता प्लास्टिक सर्जनला पाचारण करण्यात आले. त्याकरता,मला Minor operation theatre मधे नेण्यात आले. त्या ठिकाणी, माझ्या बरोबर आणखी एका म्हाताऱ्या बाईवर पण सर्जरी होणार होती. तिला माझ्या आधीच तिथे आणले होते. तिचा नंबर माझ्या आधी होता. पण ती सुद्धीत नव्हती. 

थोड्यावेळाने एक पोरगेलासा, स्मार्ट, चायनीज, प्लास्टिक सर्जन तिथे आला. दुसरी बाई बेशुद्ध असल्याचा फायदा घेऊन मी त्याला घोळात घेतला. मी पण डॉक्टर आहे. इथली सर्विस किती घाणेरडी आहे, फक्त टाके घालण्याकरता पाच तास हा वेळ खूप जास्त आहे, आता माझ्या कपाळावर, उशीर झाल्यामुळे व्रण राहणार, अशी कटकट सुरु केली. त्या कटकटीमुळे त्याने ताबडतोब, माझ्यावर त्या बाईच्या आधी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. 

जखम उघडून पाहिल्यावर, त्याने, “हि जखम खूप खोल आहे, ह्याला जनरल Anesthesia शिवाय मी ऑपरेट करणार नाही”. “तुम्हाला admit व्हावं लागेल”, असं सांगितलं. मी त्याला “मी admit वगैरे काही होणार नाही, माझी दोन मुलं घरी एकटी आहेत”. “माझी सहनशक्ती भरपूर आहे. मला दुखलं तरी चालेल, तू लोकल anesthesia मधे टाके घाल असं पटवत राह्यले. तो काही तयार होईना, पण मी insist करत राहिले. 

मग त्याने मला, “तुमच्या बरोबर कोणी आहे का?” असा प्रश्न विचारला. मी त्याला, “बाहेर माझे मिस्टर आहेत”, असं सांगितलं. मग ‘ह्यांना’ फोन करून त्याने आत बोलावून घेतले. ‘हे’ आत आल्यावर त्यानी सगळी परिस्थिती ‘ह्यांना’ सांगितली. 
हे हि म्हणू लागले कि "ठीक आहे, हो तू admit! ", पण मी माझा हेका काही सोडला नाही. 

मी डॉक्टरला म्हंटलं, कि “जर मला पेन असह्य होतंय असं वाटलं तर मी लगेच admit व्हायला तयार आहे”. “पण तुम्ही local वर प्रयत्न करा”. शेवटी तो डॉक्टर कसा बसा तयार झाला. त्याने local anesthesia वापरून stich घातले. मी "हुं का चुं" न करता टाके घालून घेतले. त्याला मात्र घाम फुटला होता. 

सगळं झाल्यावर तो मला "I must say, that you are a very brave and tolerant lady”. Nice meeting you Doctor”असं म्हणाला. मग discharge paper घेऊन, फार्मसीतून औषधे घेऊन, आम्ही बिल counter पाशी आलो. 

इतक्या सगळ्या वैतागानंतर, तिथे मात्र आम्हाला, अतिशय सुखद असा धक्का बसला. आम्ही सिंगापूरचे citizen असल्यामुळे सर्व तपासण्या व सर्जरी सकट सगळे मिळून माझे बिल फक्त नव्व्याण्णव Dollar झाले होते. मी तर आनंदाच्याभरात दुखत असलेली जखम सुद्धा विसरले. 

Taxiत बसल्यावर हे मला म्हणाले "किती बारीक, सुरेख टाके घातलेत त्या डॉक्टरने”, आणि “ह्याच्यावर पट्टी का नको म्हणाला तो?" 
त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या ऐवजी मी माझा फोन हातात घेऊन, कसे टाके घातलेत ते बघू लागले, आणि टाके बघताना,मला फाडकन सकाळच्या स्वप्नाची आठवण झाली. अगदी तसेच टाके मला स्वप्नात दिसले होते. मी स्वतःच पडणार असल्याची intution मला मिळाली होती, पण त्याचा अर्थ मी तेव्हा लाऊ शकले नव्हते. असो.



सुरेख टाके घातल्यामुळे माझ्या कपाळावर इतकी मोठ्ठी जखम होऊन सुद्धा, जराही व्रण राहिला नाही, म्हणून त्या मस्त, स्मार्ट, चायनीज डॉक्टरचा आणि माझ्या आयुष्यातल्या प्लास्टिक सर्जरीचा माझ्या मनातल्या गोष्टीत समावेश………

Monday, 18 November 2013

Homeopathy


काल एक मैत्रीण फोन वर म्हणाली "काय, सध्या लेखन जोरदार चाललंय?" डॉक्टरकी बंद काय? होमीयोपॅथी वर लिही कि.................
तर म्हंटलं, करावं तिच्या मनाप्रमाणे. 

मी  Homeopathic Medicine and Surgery ह्या विषयात पदवीधर आहे. म्हणजे B.H.M.S. आहे. ही डीग्री मी पुणे विद्यापीठातून संपादन केली आहे. त्यानंतर मी  सिंगापूर मध्ये 'Specialist Diploma in Nutrition and Health Promotion’हा डिप्लोमा पूर्ण केला आहे. मी सिंगापूरला येण्याआधी वर्ष मुंबई मध्ये होमीयोपॅथीक प्रॅक्टिस करत होते. आताही माझे काही पेशंट इन्टरनेट चा वापर करून, मला संपर्क करतात मी त्यांना इथून औषध सांगते, जे, ते तिथल्या फार्मसी मधून विकत घेतात. मी Nutrition विषयक सल्लाही देते. ह्या दोन्हीचा उपयोग, सध्या मी, अर्थार्जनाकरता मात्र करत नाही. मी सिंगापूर पॉलीटेक्निक मधे पार्टटाइम लेक्चररची नोकरी करते फुल टाइम गृहिणी आईचं काम करते. हल्ली हल्लीच थोडं लेखनही करायला सुरुवात केली आहे.

प्रस्तुत लेखात, होमीयोपॅथी म्हणजे काय? ह्या औषध पद्धती बद्दल असणारे समज गैरसमज, ह्याचा वापर कधी व कसा करावा, कधी करू नये,  ह्याविषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.वाचकांना काही प्रश्न, शंका असतील, तर त्या त्यांनी, मला जरूर विचाराव्या. मी माझ्या कुवतीप्रमाणे त्याना उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.

“मी एक  होमीयोपॅथीक डॉक्टर आहे”. अशी माझी ओळख करून दिल्यावर, अगदी पु. लं. च्या 'म्हैस' मधल्या सारखा "म्हैशिना चालते काय हो तुमची होमेपदी?” असा जरी नाही, तरी काही प्रश्न निश्चित पणे समोरून येतात

पहिला, " होमीयोपॅथी म्हणजे साबुदाणा गोळ्या ना?" 
दुसरा, "मग तुम्ही होमीयोपॅथी प्रॅक्टिस करता का जनरल फीजीशीयन?
तिसरा, “हे औषध खूप दिवस घ्यावं लागतं ना?" 
चौथा "औषध द्यायला तुम्हाला जाम माहिती विचारावी लागते ना पेशंटची? अगदी आजी आजोबांच्या वेळ पासून?", असे.

हे प्रश्न एक वेळ परवडले, पण काही माणसं मलाच होमीयोपॅथीबद्दल माहिती पण देतात, जशी कि, ही औषधं पुस्तक वाचून सहज घेता येतात. गोड असल्यामुळे लहान मुलांना अगदी सहज देता येतातकेस गळण्यावर ह्यांचा खूप उपयोग होतो, वगैरे.

एकदा तर एक बाई माझ्या दवाखान्यात मला म्हणाल्या किहे औषध खरं तर काही आजार नसताना घ्यायचं असतं म्हणजे आजार होण्या करता ते मदत करतं, आणि तरीसुद्धा बरं नाहीसं झालं, तर तेवढ्या पुरतं पटकन allopathic औषध घ्यायचंपरत बरं वाटलं कि होमीयोपॅथी सुरू……असो.

आजचा लेख अश्याच काही समज गैरसमजांचे निवारण करण्यासाठी…….   
होमीयोपॅथी हे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणामध्ये, कॉमप्लीमेनट्री and  ऑलटरनेटिव्ह मेडीसीन ह्या शाखेत येतं. कॉमप्लीमेनट्री म्हणजे कशाच्या तरी बरोबर, ऑलटरनेटिव्ह म्हणजे कशाच्या तरी ऐवजी, हे कशाच्या तरी बरोबर किंवा ऐवजी, असं जेव्हा म्हंटलं जातं, तेव्हा त्याचा अध्याहृत अर्थ Allopathy औषधा बरोबर किंवा ऐवजी असा असतो.

माझ्या अनुभवाप्रमाणे होमीयोपॅथी चा उपयोग, कॉमप्लीमेनट्री मेडिसीन म्हणून जास्त गुणकारक होतो.
होमीयोपॅथी ह्या शाखेची संकल्पना डॉक्टर Samuel Hahnemann ह्यांनी जर्मनी मध्ये १७९६ साली प्रथम अस्तित्वात आणली. ते स्वतः एक Allopathic डॉक्टर होते, पण त्यांना, त्या वेळेस दिली जाणारी उपचार पद्धती तितकीशी पसंत नव्हती. त्यांच्या मते, उपचारांमुळे रुग्णाला बरं वाटण्याच्या ऐवजी, त्रासच अधिक होत असे. त्या काळी, उपचार करताना रुग्णाला जुलाब होणारे औषध देणे, रक्तपात होऊ देणे, रासयनिक पदार्थ वापरून उपचार करणे, अश्या पद्धतींचा वापर होत असे.

ह्या सगळ्या पद्धती डॉक्टर Hahnemann ह्यांना पटत नसल्यामुळे, त्यांनी डॉक्टरकी करायची सोडून दिली आणि ते वैद्यकीय पुस्तकांच्या ट्रान्सलेशनचं काम करू लागले. ‘क्युलेन्स मटेरिया मेडिका’ नावाच्या, अश्याच एका पुस्तकाचं ट्रान्सलेशन करत असताना त्यांना 'सिंकोना ओफिशिनालीस' नावाच्या साउथ आमेरिकन झाडाच्या सालाबद्दलची  माहिती वाचायला मिळाली. ह्याचा उपयोग त्याकाळी मलेरीयाच्या उपचारांकरता केला जात असे. ह्या औषधाबद्दल त्यांच्या मनात खूपच कुतूहल निर्माण झाले, आणि त्यांनी त्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात, त्या सालाचा रस काढून, त्याचे सेवन केले. 


तो रस प्यायल्या नंतर, मलेरीया झालेल्या माणसामध्ये जी लक्षणं दिसून येतात, ती सर्व लक्षणं, स्वतः मध्ये दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ह्यानंतर त्यांना अनेक औषधांच्या बाबतीत हे लक्षात आले कि, एखाद्या रोगाला बरं करण्याकरता जे औषध दिले जाते, तेच औषध एखाद्या निरोगी व्यक्तीला दिले असता, त्याच्यामध्ये त्या रोगाची(ज्या करता ते औषध म्हणून वापरले जाते) लक्षणं दिसून येतात. 

सध्या शब्दात सांगायचे झाले, तर एखादे खोकल्यावर उपाय करणारे होमीयोपॅथीक औषध निरोगी माणसाला दिले तर त्याला खोकला होतो. 

आणखी काही प्रयोग केल्यानंतर त्यांनी होमीयोपॅथी चा सर्वात महत्वाचा सिद्धांत मांडला, ‘Similia Similibus Curenter’, म्हणजे ‘Let Likes be Cured by Likes’हा तो महत्वाचा सिद्धांत. होमीयोपॅथीचे डॉक्टर ह्या महत्वाच्या सिद्धांताचा वापर करूनच आजही औषध देतात. 

ज्या औषधामुळे एखादा आजार बरा होऊ शकतो, त्या औषधा मधे, तोच आजार, निर्माण करण्याची शक्ती असते, ह्याची एकदोन उदाहरणं द्यायची म्हंटली तर, होमीयोपॅथी मधील,  Antimony Tart हे दम्याच्या रुग्णांमध्ये वापरले जाणारे औषध निरोगी व्यक्तीने घेतले असता, त्याच्यात दम्याची लक्षणे दिसून येतात. 

Allium Cepa हे सर्दीकर्ता वापरले जाणारे औषध, कांद्यापासून बनते. आपल्यापैकी सर्वांनीच कांदा चिरताना सर्दी झाल्यावर दिसतात तशी लक्षणे, जसं कि डोळ्यातून नाकातून पाणी येणे, डोळ्यांची आग होणे, नाक चोंदणे ह्याचा अनुभव अनेक वेळा घेतला असेलच.

होमीयोपॅथीक औषध देताना व्यक्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना विचारात न घेता, त्या व्यक्तीच्या शरीतात दिसून येणाऱ्या आणि त्या व्यक्तीला जाणवत असलेल्या सर्व लक्षणांचा विचार करून, मगच औषध उपाय योजना आखली जाते. 

थोडक्यात, डोकेदुखी करता एक , पोटदुखी करता दुसरे, तापाकरता तिसरे, अशी अनेक औषधं न देता, डोकेदुखी, पोटदुखी, व ताप ह्या सर्वांचा एकत्र विचार करून, सर्व लक्षणांचे शमन करणारे एक औषध निवडले जाते. गरजे नुसार हे औषध पुढील उपाय योजना करताना योग्य वेळी बदलण्याचा निर्णय होमीयोपॅथीक डॉक्टर वेळोवेळी घेतात. 

डॉक्टर नेहमीच Totality of Symptoms, म्हणजेच एखाद्या रुग्णाच्या शरीरातील, शारीरिक व मानसिक लक्षणं एकत्रित करूनच औषध योजना करतो. ह्याच कारणामुळे होमीयोपॅथीक डॉक्टरांना रुग्णाची सगळी माहिती खोलात जाऊन विचारावी लागते. 

ह्या माहितीच्या आधारेच अचूक औषध तो शोधू शकतो.म्हणूनच होमीयोपॅथीमधे Case taking, अर्थातच रुग्णाची सर्व माहिती मिळवणे ह्याला अनन्यसाधारण महत्व असते. ह्याचं कारण, कुणाच्याही अगदी सहज लक्षात येईल असं आहे. रुग्णाची माहिती व्यवस्थितपणे न मिळवता औषध उपाय योजना सुरु केली असता, ती संपूर्णतः चुकीची ठरू शकते.

म्हणूनच होमीयोपॅथीक डॉक्टर ह्या Case Taking ला एक कला मानतात. एखादा चित्रकार जसे वेगवेगळे रंग भरत एखादे सुंदर चित्र तयार करतो, तसेच रुग्णाकडून बारीक बारीक माहिती काढून घेत होमीयोपॅथीक डॉक्टर आजाराचे एक पूर्ण चित्र तयार करतो. मग त्या चित्राला वेगवेगळ्या औषधांच्या चित्राबरोबर जुळवून बघतो. दोन्ही मध्ये अचूक समन्वय साधल्या नंतर त्या औषधाची निवड करून, रुग्णाला, रोग पासून मुक्त करतो. 

होमीयोपॅथी बद्दल आणखी माहिती, त्याबद्दलचे समज गैरसमज, ह्याबद्दलची माहिती पुढच्या लेखात नक्की वाचा………


Dr. Samuel Hahnemann  औषधांचे गुणधर्म शोधण्याकरता, औषधे निरोगी माणसाना देऊन त्यांच्यावर प्रयोग करत असत. ह्याला होमीयोपॅथी मधे 'ड्रग पृव्हिंग' असे म्हंटले जाते. 'ड्रग पृव्हिंग' करताना Dr. Hahnemann, औषध घेणाऱ्या माणसावर, त्या औषधाचे विपरीत किंवा जीवघेणे परिणाम होऊ नयेत, ह्यासाठी औषधांना dilute करत असत. हे dilution पाणी किंवा alcohol वापरून केले जात असे. ह्या 'ड्रग पृव्हिंग' मुळे औषधाचे सर्व परिणाम अत्यंत बारकाईने समजून घेणे सोपे होते, आणि म्हणूनच होमीयोपॅथीक औषधे रुग्णा करता अत्यंत सुरक्षित सिद्ध होतात. 

हे 'ड्रग पृव्हिंग' करत असताना होमीयोपॅथी मधील आणखीन एक आश्चर्यजनक शोध Hahnemann ह्यांना लागला. औषध dilute करून, त्या नव्या तयार झालेल्या मिश्रणाला, एखाद्या elastic पृष्ठभागावर नियमितपणे आपटले असता, ते औषध, रोग निवारण करताना जास्त परिणामकारक ठरते, असे त्यांना दिसून आले. ह्या नियमित आघाताना Succussions असे म्हंटले जाते.

अश्या प्रकारे dilution आणि succussion ह्यांचा वापर करून औषधे तयार केली जातात. ह्या प्रक्रियेला Potentisation असे म्हंटले जाते.


औषधांचे Potentisation करताना, अनेक वेगवेगळ्या power ची औषधे होमीयोपॅथी मध्ये तयार केली जातात. ह्या power लाच  'पोटेन्सी' असे म्हंटले जाते. आपण कधी होमीयोपॅथीक औषधांचे prescription पहिले असेल,तर आपल्याला औषधाच्या पुढे 6X, 12X, ३०, किंवा  २०० असे आकडे दिसले असतील. हे आकडे म्हणजेच त्या औषधांची power किंवा 'पोटेन्सी'. रुग्णाच्या गरजेनुसार, होमीयोपॅथीक डॉक्टर योग्य ठरेल अशी पोटेन्सी उपाय योजना करताना निवडतात. 

होमीयोपॅथीक उपाययोजनेत व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा विचार केला जातो. इतकंच नव्हे तर तो रहात असलेल्या सभोवतालच्या परिस्थितीचा ,अनुवंशीकतेचा आणि त्याच्या मुलभूत शारीरिक, मानसिक रचनेचाही(ज्याला आम्ही Constitution असेही म्हणतो) विचार केला जातो. अश्या पद्धतीच्या दृष्टीकोनाला 'Holistic Approach of Treatment' असं म्हंटलं जातं. 

ह्याचा विस्तार करून समजवायचं झालं तर, एका उदाहरणाने ते करता येईल. 

एखाद्या जिवंत व मृत व्यक्ती मधे नक्की काय फरक आहे? असे विचारले असता, मृत व्यक्ती मधे प्राणाची कमतरता आहे, असे उत्तर आपण सहजपणे देऊ शकतो. म्हणजेच, मृत व्यक्ती मध्ये कुठेतरी जीवनदायी शक्तीचा आभाव असल्याचे आपल्याला सर्वांनाच मान्य आहे. होमीयोपॅथी मध्ये ह्या प्राणदायी शक्तीला Vital Force असे म्हंटले जाते. 

होमीयोपॅथी च्या सिद्धान्तांप्रमाणे, जोपर्यंत ही शक्ती व्यवस्थित कार्यरत आहे तोवर मनुष्य आरोग्यपूर्ण आहे असे आपण सहज म्हणू शकतो, ह्या शक्तीला जेव्हा थोडीफार इजा पोहोचते तेव्हा मनुष्य आजारी पडतो, आणि हि शक्ती जेव्हा शरीरातून संपूर्णतः नाहीशी होते तेव्हा मनुष्य मरण पावतो. 

अगदी साध्या शब्दात जर सांगायचं म्हंटलं, तर प्रत्येक होमीयोपॅथीक डॉक्टर, ह्या Vital Force ला healthy बनवायचा प्रयत्न करतो. 

ही प्राणशक्ती आपल्याला दिसत नसली तरी तिचे अस्तित्व आपण जसे नाकारू शकत नाही, तसेच होमीयोपॅथीक औषधाचा असर कसा होतो हे रूप रेषेने दाखवता येत नसले तरी, रुग्ण बरा झालेला आपल्याला दृश्य स्वरुपात पाहायला मिळतो. ह्या गोष्टीवर allopathy आणि होमीयोपॅथी मधे अनेक वेळा वादंग उद्भवतो असे पाहायला मिळाले आहे. Allopathy फक्त शरीरात होणाऱ्या दृश स्वरूपातल्या रासायनिक प्रक्रियांवर विश्वास ठेवते. होमीयोपॅथी अदृश्य स्वरूपातला  vital force  आरोग्यपूर्ण बनवायचा प्रयत्न करते. त्यांच्या मते रुग्णाला जुलाब होत असल्यास, बध्कोष्ट निर्माण करू शकेल असा पदार्थ त्याला औषध म्हणून द्यावा. होमीयोपॅथी मधे त्याच्या अगदी विरुद्ध केले जाते. सामान्य निरोगी माणसामधे जे औषध दिल्यामुळे त्याला जुलाब होऊ शकतील तेच औषध जुलाब बरे करण्याकरता दिले जाते.


Allopathy च्या मते होमीयोपॅथी एक placeboचे काम करते. (Placebo म्हणजे, असा पदार्थ कि जो खरं  तर आपल्या मनाची समजूत घालणे, ह्यापेक्षा जास्त कुठलाही बदल, शरीरात घडवून आणत नाही.) त्यांच्या मते होमीयोपॅथीक औषध अत्यंत dilute केलेली असल्यामुळे त्याच्यात फक्त पाणी किंवा अल्कोहोल असते. त्यात कुठलाही औषधाचा गुण शिल्लक नसतो. 

ह्या समजुतीला, IIT मधील प्रशांत चीक्रमाणे, ह्या Research Studentने  खोटं ठरवलं आहे. Diluted औषधातही मूळ औषधातील कण उपस्थित असलेले त्यांनी दाखवून दिले. ह्या विषयी माहिती इथे वाचू शकता.……. 

किंवा इथेही …. 


होमीयोपॅथी हि एक अत्यंत गुणकारी उपचार पद्धती असल्याचे मी स्वतः, अनुभवांती, खात्रीलायक सांगू शकते.

मुलं, मोठी माणसं, सर्वजण ह्याचा उपयोग करून घेऊ शकतात. अनेक वर्ष होत असलेला त्रास, होमीयोपॅथीक  औषधाने समूळ नष्ट झालेला, मी स्वतः पाहिलेला आहे.

अर्थात, जश्या प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, तश्याच त्या होमीयोपॅथीलाही आहेत. एखाद्या भरपूर भाजलेल्या व्यक्तीला आपण जर हॉस्पिटल मध्ये न नेता त्याच्यावर होमीयोपॅथीक उपचार करत बसलो तर ते निश्चितच चुकीचे ठरेल.

पण होमीयोपॅथी ही  एक अत्यंत स्वस्त, सुरक्षित, सोपी, सर्वांकरता उपयोगी अशी उपचार पद्धती आहे ह्याबद्दल मात्र कुठलीही शंका नाही. 

मला पुढे असंही सांगावसं वाटतं कि, कोणीही पुस्तकं वाचून घ्यावी, अशी ती, औषधं  मुळीच नाहीत. योग्य औषध निवडण्याकरता विशेष अभ्यासाची नक्कीच गरज आहे. 

साबुदाण्या सारख्या दिसणाऱ्या होमीयोपॅथक गोळ्यांमध्ये, वेगवेगळी उपायकारक औषध मिसळली जातात. ह्या गोळ्यांचा वापर औषधाला वाहून नेणाऱ्या एखाद्या वेहीकल सारखा केला जातो. 

मी स्वतः कधीही होमीयोपॅथी सोडून दुसरे कुठलेही औषध माझ्या दवाखान्यात रुग्णांना दिले नाही. त्यामुळे मी जनरल फिजिशिअन नक्कीच नाही.

होमीयोपॅथीचा उपाय फक्त केस गळण्यावर, होत नसून, इतर अनेक समस्या त्याने दूर होऊ शकतात. 

आणि, अतिशय महत्वाचे म्हणजे, काही होत नसताना घेण्याचे औषध  तर ते मुळीच नाही, तसे करण्याने, कदाचित आपण स्वतःवर आजार ओढवून घेऊ शकता. 

अश्या ह्या गुणकारी होमीयोपॅथीचा आपल्यालाही आवश्य उपयोग  करून घेता यावा, म्हणून होमीयोपॅथीबद्दल माहिती देणाऱ्या ह्या लेखाचे प्रयोजन. 

होमीयोपॅथीक डॉक्टर ही  माझी स्वतःची पहिली, स्वतंत्र ओळख, म्हणून, ह्या माझ्या जिवाभावाच्या होमीयोपॅथीचा, माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश …….