काल सकाळी एक बातमी वाचली. एका मुलीने फेसबुक वर एका मुलाशी मैत्री केली,नंतर ती त्याच्यावर प्रेम करू लागली. ते एकमेकाना भेटले. त्यांच्यात शरीरसंबंधही प्रस्थापित झाले व नंतर त्या मुलाने लग्नाला नकार दिला. मुलीला हा धक्का सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केली.. वाचून अतिशय वाईट वाटलं. फेसबुक वर प्रथम मैत्री हा भाग नवा आहे हे मान्य, पण प्रेम प्रकरणात फसगत झाल्यामुळे आत्महत्या करणारी, ही काही पहिली मुलगी नाही.
आज थोडसं ह्या प्रेमा बद्दल. प्रेम विवाह ही आता अगदी सर्रास घडणारी गोष्ट असली, तरी त्याबद्दल गोष्टी ऐकायला,बोलायला, चर्चा करायला, आपल्यापैकी बहुतेकांना आवडतं. मी स्वतः प्रेम विवाह केलेला आहे. नुसता नाही, यशस्वी प्रेम विवाह केलेला आहे, म्हणून त्याविषयी बोलण्याचा अधिकार मी स्वतःच, स्वतःला प्रदान करून, थोडं बोलणार आहे.
तुम्हाला लगेच सरसावून बसायची काही गरज नाही. मी माझी प्रेमकहाणी सांगणार नाहीये. ती सिक्रेटच राहणार आहे. मी जनरल प्रेम विवाहाच्या बाबतीतल्या, दोन चार युक्त्या सांगणार आहे. त्या ऐकल्याच पाहिजेत असं मुळीच नाही, पण बघा, कदाचित फायदाही होऊ शकेल. स्वानुभवाचे बोल आहेत. अगदीच वायफळ नक्की ठरणार नाहीत.
मी मुलीच्या किंवा मुलाच्या कोणाही एकाच्या दृष्टीकोनातून बोलणार नाहीये. जे बोलणार आहे, त्याचा उपयोग दोघेही करून घेऊ शकतात.
प्रेम म्हंटलं, कि ते जगापासून लपवून करायचं असतं, अशी एक जनरल समजूत आहे. ती आपण सगळ्यांनी बदलालयला हवी. आपलं एखाद्यावर प्रेम असेल तर ते कोणापासूनही लपवून ठेवण्याची अजिबात गरज नाही. मुळात चांगलं असलेलं काहिही लपवायची गरजच पडत नाही, जिथे लोकांना कळू नये, किंवा वाईट असं काहीतरी असतं तेव्हाच लपवाछपवीचा विचार मनात येतो. मग जी गोष्ट वाईट आहे, जी लोकापासून लपवावी असं आपल्याला वाटतं, ती बऱ्याच वेळेला योग्य असत नाही. मग ती गोष्ट न करणंच ठीक, असं नाही का? म्हणून चार चौघात उघडपणे सांगता येईल अश्याच व्यक्तीवर प्रेम करावं.
सुरुवातीपासून विचार करायचा म्हंटलं, तर सर्वात पहिली गोष्ट जी होते, ती म्हणजे आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं. त्यावेळेस त्या व्यक्तीला, घाई घाईने ते ने सांगायला न जाता, प्रत्येकाने, आपल्याला ती व्यक्ती का आवडते? ह्याचा विचार करायला हवा.
ह्या प्रश्नाचे उत्तर जर, ती व्यक्ती छान द्सिते, किंवा स्मार्ट वाटते, किंवा तिची फिगर छान आहे किंवा रुबाबदार आहे, ह्यापैकी मिळत असेल, तर आपल्याला, आपल्या आवडीचा फेर विचार करण्याची गरज आहे, असे स्वतःला समजावणे योग्य ठरेल. स्पष्ट सांगायचं तर, त्या व्यक्ती, विषयी जोडीदार म्हणून विचार न करणे, फायद्याचं ठरेल. कारण ह्या गोष्टीना, लग्नानंतर विशेष काही महत्व उरत नाही. जर आपल्याला, ह्या प्रश्नाचं उत्तर, सुशीस्क्षित, सुसंस्कृत, जबाबदार, दुसर्याचा विचार करणारी, अशी आहे, म्हणून, असं मिळत असेल तर त्या व्यक्ती बद्दल पुढे विचार करायला अजिबात हरकत नाही.
दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आवडलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदर वाटतो का? हा प्रश्न स्वतःला विचारावा. जर त्याचं उत्तर, नाही, असं मिळत असेल तर, ते नातं कधीही यशस्वी ठरणार नाही.
त्याचं उत्तर हो असं मिळाल्यास, आपल्याला आदर का वाटतो, ह्याचंही उत्तर शोधावं. ते शोधताना बहुतेक वेळा, आपण त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं सखोल विश्लेषण करतो, त्यावरून, आपलं त्या व्यक्ती बरोबर निभेल किंवा नाही, ह्याचा आपल्याला बर्यापैकी अंदाज येतो.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्या व्यक्ती बरोबर एकत्र राहायला लागल्यानंतर आपल्या जीवनात कुठला बदल होऊ शकेल ह्याचा विचार करावा. ते बदल आपल्याला मान्य असतील का, हे हि स्वतःला विचारून पाहावे. ह्याचे सकारात्मक उत्तर मिळाल्यास पुढच्या पायरीवर पाऊल ठेवावे…….
दुसरी पायरी मैत्रीची… आवडलेल्या व्यक्तीची प्रथम पायरीवरची ओळख मनासारखी आहे हे कळल्यावर मैत्रीच्या पायरीवर पाऊल ठेवावे.
आपल्याला आवडलेल्या व्यक्तीची प्राथमिक ओळख, आपल्याला चालेल अशी आहे, असं कळल्यावर, दुसरी मैत्रीची पायरी चढावी. त्या व्यक्तीची आपल्या घरातल्या मंडळींबरोबर ओळख करून द्यावी. त्यांना ती व्यक्ती कशी वाटते, हे अगदी उघड पणे विचारावं. आई वडिलांनी ‘आवडत नाही’, असं म्हंटल्यावर, त्यांच्या नकळत, त्या व्यक्तीला भेटणं सुरु न करता, त्यांना ती व्यक्ती का आवडत नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आईवडील हे नेहमी, फक्त आपल्या चांगल्याचाच विचार करतात, ह्यावर कधीही शंका घेऊ नये.
त्या व्यक्तीच्या घरी अवश्य जावे. म्हणजे लग्नानंतर आपले राहणीमान कसे असेल ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्या व्यक्तीचे नातेवाईक कसे आहेत ते हि समजते. एखाद्या समारंभाच्या वेळेस त्या व्यक्तीला, घरी,जरूर आमंत्रण द्यावे, म्हणजे चार माणसांच्यात ती व्यक्ती कशी वागते ते समजून येते. कधीतरी एखाद्या सुरक्षित जागी त्या व्यक्ती बरोबर एकटेही जावे. तिथे त्या व्यक्तीची वागणूक कशी आहे ते पाहावे.
थोडक्यात म्हणजे त्या व्यक्ती बरोबर सहवास वाढवावा. एखाद्याला व्यक्तीला थोड्याश्या कालावधीत जाणून घेणे कठीण असते. एखादं वर्षभर(ही वेळ उदाहरण म्हणून लिहिल्येय. कधी कधी ती व्यक्ती उत्तम आहे ह्याची खात्री, त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या स्थितीतले वर्तन पाहून, लवकरही पटू शकते) त्याला जरूर पारखावं.
त्याच बरोबर त्या व्यक्तीच्या, जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, हे हि जाणून घेणं महत्वाचं आहे, आपण स्वतः सर्वगुण संपन्न आहोत असं मानण्याचा आगाऊपणा न करणं शहाणपणाचं.
इतकं सगळं होईपर्यंत सुद्धा जर तुमची त्या व्यक्तीशी मैत्री टिकून असेल, तर आपले प्रेम खुशाल व्यक्त करून लग्नाची पायरी चढावी.
प्रेम विवाह जरी असला, तरी शेवटी ते लग्नच!!! तो अनेक वर्ष टिकवावा लागतो, असा व्यवहाराच!!!
मग त्याच्याकडे थोडं डोळसपणे पाहणे हितावहच नाही का?
आणि पुढे जाऊन मी म्हणेन, कि Arranged Marraige पेक्षाही हा पर्याय जास्त योग्य ठरतो .
आपण कोणच्या परिस्थितीला सामोरं जाणार आहोत, ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. हा निर्णय Informed Choice ठरतो.
नाहीतर आईवडिलांनी आपल्यासाठी योग्य,असे निकष लावून स्थळ निवडायचं, आणि मग आपण अर्ध्या तासात चहा पोहे खात,ती व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून चालेल कि नाही हे ठरवायचं, हा ही जुगारच कि…
माझ्या पहिल्या लिहिलेल्या भागावर काहींचा सूर, प्रेम ठरवून करता येत नाही असा दिसला. हे मला फारसं पटत नाही. आपण प्रेम करावं, ह्या लायकीची समोरची व्यक्ती आहे किंवा नाही हे पारखून बघणे आवश्यकच आहे. नाहीतर स्वतःच्या हातानी स्वतःच्या आयुष्याचं आपण नुकसान करून घेण्याची शक्यता असते. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रेम आहे म्हणून एखाद्या दारुड्या माणसाबरोबर जर कोणा मुलीने लग्न केलं तर ते किती योग्य आहे?
माझ्या माहितीत एका post graduate मुलीने,त्यांच्या घरी कचरा उचलायला येणाऱ्या भंग्याशी, विवाह केला. हा विवाह आठ दिवस टिकला. आठव्या दिवशी मुलगी माहेरी परत आली. नंतर घटस्फोट प्रक्रिया पूर्ण व्हायला, एक वर्ष कालावधी लागला. ह्यामध्ये मुलीची व तिच्या घरच्यांची किती मानसिक कुतरओढ झाली असेल हे मी सांगायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही…
प्रेम अवश्य करावं, पण ते डोळस असावं, आंधळं नसावं, मग त्याला कोणी व्यवहार म्हंटलं तरी चालेल.
आपण घालायचे कपडे सुद्धा, दहा मधून एक निवडून घेतो. मग आयुष्यभराचा जोडीदार, Love at first sight.. असं गोंडस विधान करून, क्षणाच्या कालावधीत कसा काय निवडू शकतो?
विचारपूर्वक प्रेम विवाह केल्यावर तो विवाह वर्षानुवर्ष खंबीरपणे टिकून राहतो असा माझा स्वानुभव आहे.
आपण माझे बोल ऐकून, स्वतःसाठी त्यांचा अवश्य उपयोग करून घ्यावा, ह्या करता ह्या लेखाचा प्रपंच.
आणि खरं सांगायचं तर, Do not fall in Love.. Rise… Rise, with your partner..
Love Marraige हा माझ्या अगदी जिवाभावाचा विषय असल्यामुळे त्याविषयी काही गोष्टींचा माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश ……
No comments:
Post a Comment