Friday, 15 November 2013

Diabetes Diet...

काल सकाळी एका साईट वर विनोद वाचत होते. बहुतेकसे माहित असलेलेच होते. काही वाचून हसू आलं. त्यातलेच, चार पाच विनोद, फेसबुक वर पोस्ट केले. लाईक आणि कॉमेंट वरून बहुतेक इतरानाही मजा आली असे दिसले. काल थोडी गम्मत झाली, आज थोडसं गंभीर विषयावर. 

आज मी तुम्हाला मधुमेह आणि आहार ह्यांच्यातल्या नात्याबद्दल सांगणार आहे.

मी सिंगापूरला न्युट्रीशन मधे स्पेशलिस्ट डिप्लोमा केला. तो करत असताना शेवटच्या टर्म मधे, आम्हाला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा असतो. मी त्याकरता डायबीटीस(मधुमेह) हा विषय निवडला होता. डायबीटीस झालेल्या भारतीय लोकांमध्ये, औषधांमधे कुठलाही बदल न करता, म्हणजे औषधे जशी आहेत तशीच सुरु ठेऊन, आहारामध्ये बदल केला असता, त्यांच्या रक्तशर्करेच्या मूल्यांमध्ये काय बदल होतो? ह्यावर तो अभ्यास होता.

हा अभ्यास करताना जी माहिती मिळाली त्याबद्दलच मी सांगणार आहे. पण आजचा लेख लिहिताना मला आपल्याकडून थोड्याश्या सहकार्याची अपेक्षा आहे. मी लेख मराठीत लिहिणार असले तरी काही शब्द जसेच्या तसे इंग्लिश मधलेच वापरणार आहे. त्यामुळे मला लिहिण्यात सहजता ठेवता येईल.

साधं उदाहरण द्यायचं म्हंटलं तर, Diabetes is a metabolic disorder,असं मी शिकताना शिकल्येय. ह्याचं मराठी मध्ये रुपांतर करताना, ‘मधुमेह, हा चयापचयन क्रियेतील अड़थळ्यांमुळे निर्माण होणारा विकार आहे’,असं रुपांतर करावं लागलं. 

ह्या वाक्याची रचना करताना, मला कितीतरी विचार करावा लागला. योग्य मराठी शब्द शोधायला dictionary वापरावी लागली. थोडक्यात त्या पद्धतीने लिहायचं म्हंटलं तर, carbohydrates, म्हणजे कार्बोदकं, आणि proteins म्हणजे प्रथिनं हे शोधत बसण्यात खूप वेळ जाऊन जे सांगायचंय, ते राहून जाईल. म्हणून मी Pancreas, liver, insulin असेच शब्द मराठीत लिहिताना सुद्धा वापरणार आहे. आपल्यापैकी कोणाला एखाद्या वाक्याविषयी एखादी शंका निर्माण झाल्यास आपण मला त्याबद्दल कॉमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता.

तर आज, मधुमेह व आहाराच्या मदतीने त्याच्या नियंत्रणाबद्दल………

‘Although diabetes is said to be the most rapidly increasing of all degenerative disease, it would probably be rare if our foods were unrefined’, असे अर्थपूर्ण उद्गार आहार शास्त्रातल्या एका तज्ञ व्यक्तीने सांगितलेत. इथे unrefined ह्या शब्दात बराच अर्थ एकवटलेला आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. त्याबद्दल आहारा विषयी बोलताना सविस्तर माहिती देईन. 

आहारातील पिष्टमय पदार्थांचे पोषण व पचन करण्याचे महत्वाचे कार्य insulin ह्या hormone चं असतं. Glucose हे पिष्टमय पदार्थांच्या पूर्णपचनाचे शेवटचे स्वरूप. हे Glucose म्हणजेच शर्करा. ह्या glucose चे पेशीत प्रवेश करणे, तिथे त्याचे शक्तीत रुपांतर होणे, हि शक्ती शरीरासाठी वापरली जाणे, ती वापरासाठी लगेच नको असेल तर, साठवणीच्या रुपात, म्हणजेच glycogen मधे रुपांतरीत करून, लिवर मध्ये प्रवेश करणे, किंवा त्याहून अधिक झाल्यावर चरबीच्या रुपात शरीरात साठून राहणे, पुन्हा जरुरीच्या वेळेस ह्या साठवलेल्या रूपातून शक्तीची निर्मिती होणे, ह्या सर्व घडामोडींसाठी insulin ची व्यवस्थित निर्मिती व सहाय्य अतिशय आवश्यक असते. 

थोडक्यात म्हणजे पेशींच्या दारावर असलेले कुलूप उघडून आत जाण्यासाठी शर्करेकडे ‘इन्सुलिन’ नामक चावी नसेल तर तिला रक्तातच उभं राहावं लागतं. ह्या ‘इन्सुलिन’ ची निर्मिती, diabetes झालेल्या व्यक्तींमध्ये नीटपणाने होत नसल्यामुळे, त्यांच्या रक्तातले शर्करेचे प्रमाण वाढते. शर्करा पेशींमध्ये शिरू शकत नसल्यामुळे, पेशीना योग्य ते इंधन मिळत नाही व मग ह्या व्यक्तींना विविध कामे करण्यासाठी लागणाऱ्या शक्तीचा, अभाव जाणवायला लागतो.

इन्सुलिन निर्मिती किंवा कार्यात बिघाड होणे, ह्याकरता, स्वादुपिंडामधे (म्हणजेच Pancreas मधे) बिघाड हे महत्वाचे कारण असले तरी इतरही कारणे, जसं कि अनुवांशिकता, अतिरिक्त वजनवाढ, मनावर पडणारा ताण, औषधांचा परिणाम, ह्यांचाही सहभाग असू शकतो.

Diabetes हा विकार एकदा जडल्यावर तो नियंत्रणात ठेवणे, इतकाच उपाय आपल्या हातात असतो. Diabetes डीटेक्ट झाल्यानंतर आपण साहजिकच diabetes स्पेशालीस्टकडे उपचारासाठी जातो. मधुमेहावरील औषध उपाययोजना हा भाग, diabetes specialist च्या अखत्यारीत येतो. गोळ्या औषधे किंवा इन्सुलिन injections ह्याचा वापर, प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गर्जे नुसार ठरवला जातो.वरचेवर तपासणी करत राहण्याचा सल्ला दिला जातो. वर्षानुवर्ष ह्याच उपायांची कास अनेक लोक धरताना दिसतात. "आता वय झालं, असं व्हायचंच" किंवा diabetes आमच्या घराण्यात आहे असं म्हणून निमुटपणे हा रोग स्वीकारणारे ही आहेत. त्यांचं सगळंच म्हणणं खोटं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण ह्याच्यात सुधारणा करायची म्हंटली तर, आपण करू शकतो, एवढं मी निश्चित सांगू शकते. 

आहार नियंत्रण कसे करावे असा प्रश्न बरेच लोक त्याच स्पेशालीस्टला विचारताना दिसतात. आहाराच्या बाबतीत मात्र diabetes स्पेशालीस्ट, calorie मोजून जेवण घ्यायला सांगणे, ह्यापेक्षा जास्त काही करताना दिसत नाहीत. खरं सांगायचं, तर, तो त्यांचा विषयच नाही. त्याकरता आहार तज्ञाची मदत घेणे हा उत्तम मार्ग. 

भारतात सहज म्हणून गप्पा मारताना मधुमेहावर अधिकारवाणीने अनेकजण बोलताना आपल्याला दिसतात. प्रत्येकजण आम्ही diabetes नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा योग्य आहार घेतो, हे दुसऱ्याला हिरीरीने पटवून देत असतो. ह्यात अनेकांची अनेक वेगवेगळी मतं जरी असली तरी एका गोष्टीत एकवाक्यता दिसते. ती म्हणजे कारले व मेथी ह्यांचा वापर! "कारल्याचा रस प्या, कारल्याची भाजी खा, मेथी चे दाणे खा", अशी वाक्य बहुतेक तुमच्याही परिचयाची असतीलच. 

म्हणजे, गोड खाल्ल्यामुळे मधुमेह होतो, म्हणून कडू खाल्ल्यावर तो बरा होईल, असं समीकरण बरेच लोकं मांडताना आपल्याला दिसतात. ह्या समजूतींमध्ये थोडासा बदल करावा असा माझा विचार आहे. 
त्याकरता मधुमेह झालेल्या रोग्यांवर मी जो प्रयोग केला होता त्याचा वापर, मी करणार आहे. 


नियंत्रित व आरोग्यपूर्ण आहार घेतल्यामुळे मेधुमेहाने पिडीत रोग्यांच्या रक्तशर्करेच्या मूल्यांमध्ये सकारात्मक बदल होतो. 

ह्या निष्कर्षा पर्यंत मी एका प्रयोगद्वारे पोहोचले. मधुमेह झालेल्या २० व्यक्तींची निवड करून, त्यांच्या आहारात मी बदल केला.एका महिन्याच्या अंतराने रक्तशर्करेचे मूल्यमापन केले असता औषधांमध्ये कुठलाही बदल न करता, सकारात्मक बदल दिसून आला. म्हणजेच एका महिन्यात ह्या व्यक्तींची blood sugar level कमी झालेली दिसून आली.

ह्या मधे सहभागी होण्याकरता मी भारतीय लोकांची निवड केली होती. त्याकरता मुख्य कारणं सांगायची म्हंटली, तर पहिले कारण म्हणजे मी स्वतः एक भारतीय आहे व आमच्या घराण्यात अनेक मंडळीना मधुमेह झालेला आहे. दुसरे कारण असे कि, भारतीतातील मधुमेह झालेल्या व्यक्तींचे प्रमाण अतिशय जास्त आहे. तिसरे कारण, माझ्या न्युट्रिशन बद्दलच्या ज्ञानाचा माझ्या देशातल्या लोकांना उपयोग व्हावा, आणि शेवटचे म्हणजे, एकूणच आहाराच्या मदतीने आरोग्या प्राप्त कसे करावे ह्याची माहिती समाजातील लोकांना व्हावी, म्हणून.


निवडलेल्या व्यक्तींनी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे होते. जसे कि,
१. निवडलेल्या व्यक्तीचे वय ४० ते ७० ह्या वयोगटात असणे गरजेचे.
२. सर्व मंडळी प्रयोगात सहभागी होण्या आधी कमीतकमी सहा महिने तरी, मधुमेहासाठी नियमितपणे औषधांवर असणे आवश्यक.
३. प्रयोग सुरु होण्या आधीच्या सहा महिन्यांपर्यंतच्या कालावधीत, त्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी.
४. ह्या व्यक्तीची मानसिक स्थिती stable असावी.
५. त्या व्यक्तीची प्रयोगात सहभागी होण्याची इच्छा असावी.

ह्यानंतर ह्या मंडळींची मुलभूत माहिती मिळवण्याकरता मी Pre Study Survey केला;
त्यामुळे मला,
१. त्यांचे profile माझ्या निवड गटाशी जुळवून पाहायला मदत झाली.
२. प्रयोग सुरु होण्या आधी असणाऱ्या त्यांच्या आहाराची माहिती मिळाली.
३. त्यांचे वजन, उंची,त्यांची energy requirement ह्याचे ज्ञान मिळाले.
४. त्यांचे diabetes बद्दल चे विचार, त्याबद्दलची त्यांना असणारी माहिती, व आहाराबद्दल त्यांच्या असलेल्या समजुती ह्याची माहिती मिळाली.

हि सर्व माहिती जमा केल्या नंतर, मी प्रत्येकासाठी आवश्यकते नुसार त्यांच्या आहारात बदल केले.

आहारात बदल करताना, Health Promotion Board Singapore, ह्यांनी दिलेल्या guidelines वापरल्या.
ह्यामध्ये आरोग्यपूर्ण ठरेल असा, आणि मधुमेहा करता आहार ठरवताना ज्या गोष्टींचा विचार व्हायला हवा, त्या विचारात घेऊन आहाराची रचना केली.


विचारात घेतलेल्या गोष्टी खालील प्रमाणे;
१. आहारात Healthy Diet Pyramid(photo included) नमूद केलेल्या प्रमाणात वेगवेगळे अन्न घटक असावेत.
२. प्रत्येक सहभागी झालेल्या व्यक्तीचे Calorie intake, Estimated Energy Requirement च्या अधिक उणे, २०० पेक्षा जास्त कमी होऊ नये. म्हणजेच, रक्त शर्करेतला बदल हा अत्यंत कमी खाण्यामुळे झालेला नाही ह्याचे प्रमाण देणे शक्य व्हावे.
३. आहारामध्ये Whole grains(गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी) पुरेश्या प्रमाणात असणे आवश्यक.तसेच डाळी व कडधान्याचा वापर आवश्यक. ह्यांच्या ऐवजी मांसाहारी मंडळींकरता मांसाहाराचा समावेश शक्य.
४. आहारामध्ये फळं आणि भाज्या ह्यांचा योग्य प्रमाणात समावेश.
५. आहारात जास्तीच्या मिठाचा सहभाग नसणे.
६. आहार स्निग्ध पदार्थांचा वापर प्रमाणशीर असावा. स्निग्ध पदार्थांकडून मिळणारे इंधन २५% पेक्षा जास्त नसावे.
७. सरबत, carbonated ड्रिंक्स ह्यांचा वापर आहारात नसणे.
८. आहारात समाविष्ट केलेल्या गोष्टी हलके हलके साखर वाढवणाऱ्या असाव्यात, ह्याला आम्ही low glycemic index food असं म्हणतो.
९. प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तीने रोज २ लिटर पाणी पिणे आवश्यक होते.


प्रत्येक व्यक्तीची Estimated Energy Requirement, bodyweight method वापरून निशित केले होते. १ किलो वजना करता एका दिवसासाठी २७ Kilo Calorie अश्या प्रमाणात जेवण ठरवण्यात आले.
त्या करताही HPB Singapore ह्यांचा Energy Calculator वापरला होता.
प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रयोगाच्या काळात काय करावे आणि काय करू नये हे समजावून देण्यात आले.

ह्यानानातर १६०० ते २००० अश्या किलो calorie ची गरज असणार्या व्यक्तींसाठी एक आणि २००० ते २४०० किलो calorie ची गरज असणार्या व्यक्तींसाठी एक अश्या दोन diet प्लान ची रचना केली.



Diet plan बनवताना मी मुख्यतः सर्व अन्न घटक त्यामध्ये कसे मिळतील ह्याचा विचार केला. सर्व जीवनसत्व, खनिजे मिळू शकतील असे पदार्थ त्यात समाविष्ट केले.
सुरुवातीला म्हंटलेले Unrefined म्हणजेच साल युक्त असलेल्या पदार्थांचा वापर केला. बरेच लोकं, फळं आणि भाज्या कमी खातात असे लक्षात आले, त्यांच्या आहारात त्यांचा समावेश केला.



ह्यानंतर प्रयोगाच्या पहिल्या दिवशी सहभागी व्यक्तींचे, वजन, उंची व रक्त शर्करेचे मूल्यमापन करून, एका महिन्याकरता
त्यांच्या आहारात मी बदल केला. एक महिन्यानंतर त्या सर्व व्यक्तीच्या परत एकदा आधी केल्येल्या चाचण्या करण्यात आल्या.

त्यावरून मिळालेली माहिती खालील प्रमाणे,
१. वीस पैकी एकोणीस व्यक्तींच्या रक्त शर्करेची पातळी कमी झाली.
२. वीस पैका अठरा व्यक्तींचे (आहार वाढवून सुद्धा) वजन कमी झाले.
३. उरलेल्या दोन व्यक्तींचे वजन जितके आधी होते तितकेच राहिले.
४. सर्व व्यक्तींचा थकवा कमी होवून त्यांच्या रोजच्या जीवनात उत्साहात वाढ झाली.
५. वीस पैकी अठरा जणांना हा बदल पुढेही सुरु ठेवावा असे वाटत असल्याचे समजले.
६. दोन व्यक्तींना खूप प्रवास करावा लागत असल्यामुळे आहारातील बदल चालू ठेवणे कष्टप्रद वाटत होते.

Diet विषयी काही महत्वाच्या टिप्स:

शरीराला मिळणारे मुख्य इंधन हे carbohydrates कडूनच यावे. म्हणून पोळी, भाकरी, भात, नुडल्स, पास्ता ह्या गोष्टी आहारात समाविष्ट असव्यात.

Proteins योग्य प्रमाणात मिळत नसतील तर आवश्यक amino acids ची शरीरात कमतरता भासते. त्यामुळे complete प्रोटीन आहारात असणे खूप गरजेचे असते. डाळी, शेंगदाणे, कडधान्य ह्यांच्या वापरातून आपण प्रोटीन्स मिळवू शकतो.

थोडेसे साजूक तूप जेवणात समाविष्ट केले असता, जमलेल्या चरबीचा निचरा होण्यास मदत होते. किंबहुना आहारात जर अजिबात स्निग्ध पदार्थ नसतील तर fat soluble vitamins शरीर मिळवू शकत नाही.

पांढरी साखर, बाजारात मिळणारे बाकरवड्या, चकल्या, वेफर्स ह्यासारखे पदार्थ आपल्याला अनावश्यक असलेल्या खूप साऱ्या empty calories देतात. त्यांचे सेवन टाळणे उत्तम. fat free दुध वगैरे पिण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे शरीराच्या चरबीत फारसा काही फरक पडत नाही.

खरं म्हणजे आपले भारतीय जेवण समतोल आहारचे उत्तम उदाहरण आहे. त्यामध्ये भात पोळी हे carbohydrates, आमटी उसळी ह्यामध्ये प्रोटिन्स, भाजी व कोशिंबिरी मुळे जीवनसत्व आणि fibre, हे सगळे शिजवताना वापर केलेल्या तेला तूपा मुळे थोडेसे fats, हे सर्व आपल्या जेवणात सहजच मिळून जातं.

रोजच्या आहारामध्ये २-३ बदाम व एखादे अक्रोड ह्याचा समावेश कुणीही करावा त्यामुळे HDL म्हणजेच high density lipoproteins किंवा ज्याला आपण गुड cholestrol म्हणतो ते आपल्याला मिळतं. ह्याचा उपयोग high blood pressure आणि heart trouble असणार्यांना होतो.

मधुमेह झालेल्या व्यक्तीने थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडे थोडे अन्न खाल्ल्यास, pancreas वरचा ताण हलका होऊन रक्त शर्करा नियंत्रित राहायला मदत होते.


काल मी diabetes बद्दल जेव्हा लेख पोस्ट केला तेव्हा मला, काल ‘World Diabetes Day’आहे हे अजिबात लक्षात नव्हतं.
What an apt time for this post.

ह्या प्रयोगामध्ये मला असाधारण यश मिळालं. मी केलेल्या diet प्लान च्या वापरामुळे सहभागी मंडळीना मिळालेल्या उत्तम यशामुळे, सुरेख project report सादर केल्यामुळे आणि त्याचे उत्तम Presentation केल्यामुळे मला प्रोजेक्ट मध्ये पैकीच्यापैकी गुण मिळाले. त्यावर्षी इतरही विषयात चांगले गुण मिळाल्यामुळे मी त्यावर्षी वर्गात पहिली आले.

माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा असा तो क्षण होता, म्हणूनच ह्या प्रोजेक्टचा माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश……

No comments:

Post a Comment