Monday, 11 November 2013

Phuket tour..

खरं सांगायचं तर ट्रीपला जायला, फिरायला जायला मला विशेष आवडत नाही. सहलीला जाणे म्हणजे 'सुखातला जीव दुखःत घालणे', असं मला वाटतं. प्रवास, बाहेरचं जेवण, हॉटेलात राहणे हे मला तितकंसं मानवत नाही. 

पण आमच्या घरातल्या बाकी मंडळीना मात्र सहलीला जाणे, वेगवेगळी ठिकाणं पाहणे, adventure tour करणे हे सर्व अतिशय आवडतं. मग सगळ्यांनी नेट लावला, कि मीही तयार होते, आणि आम्ही जातो फिरायला कधी कधी. 

भारतात जेव्हा जेव्हा आम्ही सहली करता बाहेर गेलो, तेव्हा तेव्हा आनंदापेक्षा वैताग जास्त झाला, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. बऱ्याच ठिकाणी, अस्वच्छता, फसवायचा प्रयत्न करणारे विक्रेते, अत्यंत गैरसोयीचा प्रवास, घाणेरडे जेवण ह्याचा अनुभव बहुतेक वेळा आला. 

इकडे आल्यावर मात्र ज्या सहलींकरता गेलो त्याच्यात आम्ही खूप मजा केली. आज मी मला खूप खूप आनंद देऊन गलेल्या थायलंड येथील फुकेतच्या सहलीबद्दलचे,माझे अनुभव तुम्हाला सांगणार आहे. 

बहुतेक वेळेला फिरायला जाताना आम्ही दोन मुलं घेऊन जात असल्यामुळे, हॉटेलच्या रूम मध्ये न रहाता, सर्व्हीस्ड अपार्टमेंटमधे राहणं, पसंत करतो. २ बेडरूम चे सर्व्हीस्ड अपार्टमेंट बुक केले, कि आपल्याला घरासारखा आराम सहलीच्या काळात सुद्धा मिळवता येतो. 

ह्या अपार्टमेंटमधे आपल्या घरासारख्या सर्व सोई असतात. सुसज्ज किचन असतं. T.V, फ्रीज, gas stove ह्या सर्व वस्तू असतात.त्यामुळे आपला बराच त्रास वाचतो. 

आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर, दुध, अंडी, ब्रेड, बटर, असं सगळं दोनेक दिवस पुरेल एवढं फ्रीज मध्ये आणून ठेवतो. त्यामुळे बाहेर जेवत असलो, तरी मुलांना आड वेळेला भूक लागल्यास, पटकन काहीतरी देत येतं. छोट्या छोट्या डब्यांमध्ये चहा, साखर, आणि मीठ, मी घरून घेऊन जाते. त्यामुळे आपल्याला, सकाळी सकाळी, चहाच्या शोधात, कडमडत बाहेर पडावं लागत नाही. 

बहुतेक वेळेला मी रेडीमेड उपम्याची, नुडल्सची पाकिटं, आणि दोन तीन मूठी तांदूळही बरोबर ठेवते, कारण दोन तीन वेळेला बाहेर जेवल्यानंतर हमखास कोणाला तरी पोटाचा काही त्रास सुरु होतो व त्यांना मऊ भात हवा लागतो. 

तर अश्याच एका सुरेख समुद्र किनाऱ्यालगतच्या, 'कालीम बे' ह्या सर्व्हीस्ड अपार्टमेंट मध्ये आम्ही राहिलो होतो. सी फेसिंग घरामध्ये आयुष्यात पहिल्यांदा राहिले मी. एक वेगळंच वातावरण अनुभवलं, मन अगदी शांत झालं. लाटांचा आवाज खूप खूप relaxed  फिलिंग देत होता. गेल्या गेल्याच मन अगदी खुश झालं, आणि हि आपली ट्रीप चांगली होणार, असं मनात आलं. 

गम्मत म्हणजे आम्ही तिथे रात्री पोहोचल्यामुळे, समुद्र आम्हाला दिसला नव्हता. फक्त लाटांचा आवाज येत होता. सकाळी साडेसहा वाजता नेहमी प्रमाणे जाग आली, हलकेच उजाडत होतं, hall मधून बाहेर बाल्कनीत गेले आणि समोर तो अथांग समुद्र दिसला. माझ्या मनाची त्यावेळची अवस्था मी खरंच शब्दात सांगू शकणार नाही. तशीच धावत, परत बेडरूम मध्ये जाऊन साधनना उठवून बाल्कनीत ओढून आणलं. एखाद्या लहान मुलासारखी excite झाले होते मी, समुद्र पाहून. दोघेही मग ते सौंदर्य काही वेळ, काही न बोलता अनुभवत राहिलो. मग मुलांना उठवलं, पण त्यांना त्या समुद्राच्या दर्शनाने फार काही फरक पडलेला दिसला नाही. आदित्यनी पहिले रिमोट शोधून T.V. लावला. 

मग सकाळचं सगळं आवरून, रिसेप्शन मधे जाऊन, थोडी माहिती मिळवली. त्यांनी आमच्या करता पूर्ण दिवस आमच्या बरोबर राहील, अशी एक गाडी पंधराशे BAHT मध्ये, ठरवून दिली. त्या गाडीच्या मालकाचं म्हणजे आमच्या DRIVER आणि GUIDE चं नाव नुकुल होतं. ह्या माणसाने आमची ट्रीप मस्त करायला भलताच हाथभार लावला. 

व्यावसायिक guide, ठराविक ठिकाणी कमिशन मिळवण्याकरता, आलेल्या सर्व यात्रिकांना घेऊन जातात. ह्या नुकुल ने मात्र तसं न करता, अनेक छान छान ठीकाणांचं,आम्हाला दर्शन करवलं. त्या दिवशी, आम्ही तिथे लोकल मार्केट, पर्ल factory, वेगवेगळे बीच, handy craft ची दुकानं, उत्तम थाई जेवण मिळणारी restaurant असं सगळं फिरलो.भरपूर खरेदी केली. 

कुठेही फिरायला गेल्यावर, पहिला दिवस, आम्ही खरेदी करता राखून ठेवतो. माझे मिस्टर खरेदीच्या बाबतीत काय म्हणतात ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, "खरीदारी करके मोगाम्बो खुश हो जाता हैं, उसके बाद वोह दुसरोंको परेशान करना बंद करके, आराम से जीने देता है, इसलिये उसे मैं पहले ही दिन खुश कर देता हुं". जाऊदे! काहीका ना असेना, मला खरेदी करायला मिळते. 

पुढच्या दिवसांचा plan, घरून येतानाच fix केलेला होता. एक अक्खा दिवस आम्ही ‘सी कानोयिंग’ करण्यासाठी  जाणार होतो, त्या नंतरच्या दिवशी Elephant tour आणि Thailand Village tour असं करणार होतो. त्या सर्वांचे पैसे आम्ही पहिल्या दिवशी जाऊन भरून आलो.

दुसऱ्या दिवशी आमची टूर सकाळी आठ वाजता सुरु होणार होती. त्या टूर मध्ये, समुद्रात तयार झालेला गुहा बघायला घेऊन जातात. मोठ्याएस्कॉर्ट बोट त्यामध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणून गुहांची ठिकाणी नेउन छोट्या छोट्या inflatable बनाना बोट मधे, दोन दोन माणसाना, त्यांच्यापैकी एक माणूस बसवून घेऊन जातो.


ह्या टूर भरती ओहटीच्या वेळा पाहून ठरवल्या जातात. भरतीच्या वेळेस ह्या गुहांमध्ये पाणी भरलेले असते. फक्त ओहोटीच्या वेळेस त्यांच्या आत शिरता येते. भरती जरा जरा ओसरत असताना आम्हाला त्यांनी गुहेच्या आत नेले. आत शिरायला इतकी कमी जागा असते कि आपल्याला त्या बनाना बोट मध्ये पूर्ण आडवं झोपावं लागतं, तरी सुद्धा दगड डोक्याला लागतो कि काय? अशी भीती वाटत राहते. पण गुहा पार करून आत गेल्यावर ज्या सौंदर्याचे दर्शन होते, तो अनुभव तिथे जाऊन घेणेच योग्य. 

लाजबाब!!! हा एकच शब्द मला त्याचं वर्णन करायला सुचतोय. त्यानंतर मग ते आपल्याला समुद्रातल्या छोट्या छोट्या बेटावर नेतात. तिथे Water स्पोर्ट्सची मजा घेता येते. समुद्रात पोहायला देतात. कुणाला येत असेल तर 'कायाकिंग' करायला देतात. आमच्या बरोबर, अमेरिकन नेव्ही मधले काही लोकं होते. अतिशय फिट असे, त्यांनी 'कायाकिंग' केलं. उत्तम जेवण आपल्यासाठी तिथेच ताजं शिजवलं जातं. अननस,कलिंगड अशी local फळं, भरपूर वेगवेगळ्या थाई जेवणाच्या पदार्थांची भक्कम मेजवानी आपल्या एस्कॉर्ट बोट मधेच तयार केली जाते. समुद्रातल्या गुहा पाहून आल्यावर भरपूर भूक लागलेली असते. सर्व मंडळी ताज्या जेवणावर मस्त ताव मारतात. आम्ही ह्या टूर मधे खूप खूप मजा केली.  

तिसऱ्या दिवशी हत्तीवरून फिरणे, त्यांचे खेळ पाहणे, थाई लोकांच्या खेड्यात जाऊन त्यांचे जेवण बनवायला शिकणे, बैलगाडीतून सफर, अश्या अनेक वेग वेगळ्या गोष्टी मुलांबरोबर करताना खूप छान वाटले. लहानपणाची मजा पुन्हा एकदा अनुभवली.

नंतरच्या दिवशी तृप्त मनाने आणि थकलेल्या शरीराने आम्ही सिंगापूरला परत आलो. पुढील काही दिवस फुकेत सफरीच्या भरपूर गप्पा आमच्या घरी झाल्या. सगळ्यांनाच फुकेत सफर खूप खूप आवडली. ह्या सफरीत आमच्यापैकी  कोणालाही, कसलाही त्रास न झाल्यामुळे ट्रीपचा आनंद पुरेपूर उपभोगता आला.

जी मंडळी फिरायला जाण्याच्या ठिकाणच्या शोधात आहेत त्यांनी फुकेत चा विचार अवश्य करावा. 

ह्या सफरींची माहिती हवी असल्यास, http://www.seacanoe.net आणि http://www.phuket.com/tours/nature/elephant-trekking.htm ह्या website वर पहा. 

राहण्यासाठी बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ते आपापल्या गरजे  नुसार आपण शोधू शकता. 
आम्ही मस्त मजा केली तशीच तुम्हालाही करता येओ, हि इच्छा. 


मला आवडलेल्या आणि कोणालाही कसलाही त्रास न होता पार पडलेल्या, म्हणून, ह्या फुकेत टूरचा,'सोनालीच्या मनातल्या गोष्टींमध्ये' समावेश …………  

No comments:

Post a Comment