Saturday, 2 November 2013

Chakradeo Sir

लिहिल्यात चार ओळी, केवळ तिच्याचसाठी 
रंगावली दिव्यांची, आरास चांदण्यांची, रचिली मनात गीते, केवळ तिच्याचसाठी
sहे चंद्र, सुर्य, तारे, झाडे, फुले नि पाने, सारे प्रसन्न दिसती केवळ तिच्याचसाठी 
मेहफील दीपावलीची मी जी इथे जमवली, 
ती केवळ तिच्याचसाठी, केवळ तिच्याचसाठी 

ह्या ओळी माझे अतिशय प्रिय असे गुरु, चक्रदेव सर ह्यांनी ,दिवाळीची स्पेशलभेट, म्हणून मला पाठवल्या. चक्रदेव सरांना मी माता, पिता, बंधू, सखा ह्या कुठल्याही रुपात पाहू शकते. त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ते आता कुठलेही शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यानकरता करण्याचा विचार सुद्धा करत नसतील. मी दहावीत असताना माझी त्यांची प्रथम ओळख झाली. ते मला गणित शिकवण्याकरता आमच्या घरी यायचे. दुसऱ्या विषयांकरीता मी ST. Josephs Classes नावाच्या कोचिंग क्लास मधे जायची. त्या वर्षी पावसाळ्यात एक मोठे संकट माझ्या कुटुंबापुढे उभे राहिले. आम्ही राहत असलेली इमारत अचानकपणे अगदी कोलमडण्याच्या अवस्थेत आली. इमारत कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे आम्हाला ते घर तडका फडकी सोडून ठाण्याला राहायला जावे लागले. 

परीक्षे करता काहीच महिने उरले होते. अश्या स्थितीत नव्या जागी क्लास लावणे म्हणजे मोठीच समस्या होती. शाळेची आणि क्लासची वेळ अतिशय भिन्न वेळेस असल्यामुळे मला कोचिंग क्लास सोडवा लागला. त्यावेळेस चक्रदेव सरांनी ठाण्याला येउन मला सगळे विषय शिकवले. खरं तर ते त्यांच्या कामामध्ये अत्यंत व्यस्त असायचे, पण तरीही त्यांनी स्वतःला खूप त्रास करून घेऊन माझा त्रास खूप कमी केला.माझ्या अभ्यासात कुठलाही अडसर येऊ न देण्यासाठी त्यांनी त्यांच्या वेळापत्रकात अनेक बदल केले.  ठाण्याला राहायला लागल्यामुळे अभ्यासाचे कुठलेही नुकसान होऊ नं देण्याची जबाबदारी कोणीही न सांगता त्यांनी स्वतःकडे घेतली.शाळा असलेल्या दिवशी ते जसं जमेल तसं ठाण्याला येउन मला शिकवायचे. रविवारी पूर्ण दिवस मात्र मी त्यांच्याकडे जाऊन शिकायची.  

रविवारी मी सकाळी नऊ वाजता त्यांच्या घरी जात असे व संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरी अभ्यासाकरता थांबत असे. माझे जेवणखाण, आराम सगळे काही  त्यांच्या घरी असे. त्यांच्या पत्नीने माझं सगळं त्यांच्या मुलीसारखं केलंय. अगदी वेणी सुद्धा घातल्येय संध्याकाळी घरी येताना. त्यांची मुलगी माझी धाकटी बहिण झाली. मला तिने मी कुठेतरी दुसरीकडे आहे असं कधीही जाणवू दिलं नाही. 


बरेच वेळेला चांगल्या चांगल्या व्याख्यानांकरता सर मला मुंबईला घेऊन जात. त्यावेळी ते प्रवासातही मला शिकवत असत आणि ट्रेन मधे खूप आवाजामुळे disturb होत असल्यामुळे, ते स्वखर्चाने taxi ने मला घेऊन जात असत. आणि हे सर्व फक्त माझ्या करता नाही हं. इतरही सगळ्या विध्यार्थ्यांसाठी ते हे सगळं नेहमी करताना मला दिसायचे. 



ह्या सगळ्यामध्ये, पैसा हा विषय कधी सुद्धा उच्चारला गेला नाही. त्यांनी व्यवहार कधीच पहिला नाही. असे गुरु, गुरूच कशाला, अश्या व्यक्तींचा सहवास लाभायला सुद्धा भाग्य लागतं,म्हणून मी खूप खूप भाग्यवान आहे. 

नंतर पुढे शिक्षणासाठी लांब जावं लागलं. लग्नानंतर तर कल्याण जवळ जवळ सुटलंच. सरांकडे जाणंही फारसं झालं नाही. पण सर माझ्या मनात नेहमीच आहेत. आता फेसबुक मूळे परत एकदा नियमित संवाद सुरु आहे.


लिहायच्या म्हंटल्या तर दिवस पुरणार नाही इतक्या गोष्टी आहेत. पण थोड्याश्या गोष्टी त्यांच्या आणि माझ्या मनातच ठेवायला आवडतील. त्यांना धन्यवाद देऊन, मला कृतघ्न तर मुळीच व्हायचं नाही. मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहायला आवडेल.


पण त्यांचा, माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश नसेल, तर तो कप्पा अपूर्ण, रिकामा वाटेल, म्हणून आमचे बंध आमच्या मनात, पण तुमच्यापाशी त्याचा छोटासा उल्लेख……

No comments:

Post a Comment