Tuesday, 29 October 2013

Pune te Pali natyamay pravas...


पुणे ते पाली ह्या प्रवासाला साधारणपणे सुमारे दोन अडीच तास लागत असतील. हेच अंतर कापण्याकरता माझ्या एका मैत्रिणीला दहा ते अकरा तास लागले. इतकंच नव्हे, तर अब्रुवर आणी जीवावरही बेततं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली.ही माझी मैत्रीण, फेसबुक वर नवीनच झालेली. परवा तिच्याशी बोलताना, तिने मला तिच्या ह्या प्रवासाची कथा ऐकवली. तिच्यावर बेतलेला प्रसंग ऐकून मन थोडावेळ सुन्न झालं, तिची गोष्ट तुम्हालाही सांगावी अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. तिला विचारल्यावर तिने ती सांगायची परवानगीही दिली. पण तिला आपलं खरं नाव मात्र जाहीर करायची इच्छा नाही, म्हणून आपण तिला मीना म्हणूया. तिच्याबरोबर प्रवासात तिची बहिणही होती. तिला आपण नीना म्हणूया.

तर आजची कथा, मीना आणी नीनाच्या नाट्यमय पुणे पाली प्रवासाची.

मीनाच्या आतेबहिणीचं पालीला लग्न होतं. त्या लग्नासाठी मीना आणी नीना दोघींनी एकत्र पालीला जायचं ठरवलं. नीना राहायची सांगलीला. म्हणून नीनाने सांगलीहून पुण्याला यायचे आणि मग दोघींनी मिळून पुढे जायचे असा बेत ठरला. त्याप्रमाणे नीना सांगलीहून आपल्या मुलाला बरोबर घेऊन पुण्याला आली.

मीना एका खाजगी कंपनी मधे नोकरी करायची. तिने लग्नाला जायचे म्हणून सुट्टी करता अर्ज केला. सुट्टी मिळालीही पण निघण्याच्या दिवशी काहीतरी महत्वाचं काम असल्यामुळे तिला ऑफिस मधे जावं लागलं. काम संपल्यावर लगेच निघण्याची परवानगी मात्र तिच्या अधिकाऱ्याने तिला दिली होती. साधारण दोन वाजता निघायचे असे मीनाने नक्की केले. सांगलीहून आलेल्या नीनाला, मीनाने तिच्या मुलाला, घरून घेऊन, शिवाजीनगरला यायला सांगितले. पण काम खूपच लांबले आणि  त्या दिवशी लवकर निघायचं ठरवलं असून सुधा मीनाला ऑफिस मधून निघायला साडेचार वाजले.

दोन छोटी मुलं, लग्नासाठी म्हणून साड्या, दागिने, मुलांसाठी थोडं खायला, असं समान घेऊन दोघीजणी पाच वाजता पुण्याहून पालीला जाण्याकरता निघाल्या, त्या वेळी आपण कुठल्या संकटाला सामोरं चाललोय ह्याची त्यांना यत्किंचितही जाणीव नव्हती.

उशीर झाल्यामुळे पालीला जाणारी ST निघून गेली पण जायचं ठरवलं असल्यामुळे त्यांनी मिळाली ती, खोपोलीला जाणारी ST पकडली आणि प्रवास सुरु केला. त्या दिवशी ट्राफिक मुळे पुण्यातून बाहेर पडायलाच त्यांच्या ST ला सात वाजले आणि खोपोलीला पोहोचेपर्यंत रात्रीचे नऊ.

खोपोली बस स्थानकावर पोहोचल्यावर, पालीसाठी जाणऱ्या ST ची चौकशी केल्यावर, पालीला जाणाऱ्या सर्व गाड्या निघून गेल्या असल्याचे त्यांना समजले. बरोबर असलेली लहान मुलं अतिशय कंटाळून रडायला लागलेली, बरोबरच्या सामानात दागदागिने, अश्या परिस्थितीत परत पुण्याला जावे असा विचार करत असताना एका रिक्क्षावाल्याने त्यांना रामवाडीला जाण्याचा सल्ला दिला. रामवाडीहून पालीला जायला नक्की बस मिळेल असं त्याचं म्हणणं पडलं.

त्याच वेळेस खोपोली स्थानकातून रामवाडीकडे जाणारी एक बस निघणार असल्याची घोषणा करण्यात आली. मीनाने, पालीला लग्नाच्या ठिकाणी आधीच पोहोचलेल्या वडीलाना, फोन करून, परिस्थिती कळवायचे ठरवले. फोन पर्स मधून बाहेर काढल्यावर, battery low झाल्यामुळे फोन बंद झाल्याचे तिच्या लक्षात आले. पटकन निर्णय घेऊन दोन्ही मुलांना आणि बहिणीला बस मधे बसवून, आणी कंडकटरला विनंती करून मीना पब्लिक फोन वरून फोन करायला गेली. फोन लागला पण दुर्दैवाने फोन वडिलांनी नाही, तर सावत्र आईने उचलला. “मी निरोप सांगेन” असं त्रोटक बोलून तिने फोन ठेऊन दिला. बस निघणार असल्यामुळे, परत फोन करायचा विचार सोडून, मीना बसकडे परत आली. बस रामवाडीकडे निघाली.

आता घड्याळाचे काटे दहा वाजलेले दाखवू लागले. बस सुरु झाल्यावर कंटाळलेली थकलेली मुलं झोपून गेली. रामवाडीच्या बस मधे मीना आणि नीना दोघीच बायका, बाकी सर्व पुरुष, त्यांच्या मधे काही दारू प्यायलेले. नीना, ताण असह्य होऊन  रडू लागली. मीना मात्र घाबरलेली असून सुद्धा,कोणी आपल्याशी बोलायला येऊ नये म्हणून, आपण फोन वर कोणाशी तरी बोलतोय, असं नाटक करत राहिली. सुदैवाने त्यांच्याशी अतिप्रसंग वगैरे करण्याचा प्रयत्न गाडीतल्या कोणी केला नाही आणि रात्री अकरा वाजता बस रामवाडीला पोहोचली.

रामवाडीला पोहोचल्यावर बरीच माणसं आजूबाजूला पाहून दोघींच्या जीवात जीव आला. पालीच्या गाडीची चौकशी केल्यावर मात्र, आता पालीला जाणारी गाडी नाही अशी माहिती मिळाली. आता तर परतही जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मिळेल त्या बसने पुढे प्रवास करणे ह्या शिवाय दुसरा मार्ग दिसेना, दुसऱ्या दिवशी लग्न असल्यामुळे पालीला जाण्याची ओढही होतीच, म्हणून मीना आणि नीनाने जसे जमेल तसे पुढे जायचे ठरवले. मीनाने पुन्हा एकदा घरी फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन कोणी उचलला नाही.

इतक्यात कोकणात जाणाऱ्या एशियाड बस ची घोषणा झाली, मीनाने त्या बस ने पाली फाट्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही झोपलेल्या मुलांना कडेवर घेऊन दोघी बस मधे चढल्या. कंडकटरने पाली फाट्यावर उतरवण्याचे मान्य केले. बस सुरु झाली. मीनाच्या शेजारी एक तरुणसा मुलगा बसला होता, चेहऱ्यावरून चांगला वाटत होता. त्याच्या हातात फोन होता. मीनानी त्याला सगळी परिस्थिती सांगितली फोन वापरायला देण्याची विनंती केली. त्या मुलाने फोन मीनाकडे दिला आणि "तुम्ही अवश्य फोन लावा", असं सांगितलं.

आता वेळाची समस्या नसल्यामुळे, चार पाच वेळा परत परत लावल्यावर, भावाने फोन उचलला, भावाला सर्व काही सांगून, गाडी साधारण जेव्हा पाली फाट्यावर पोहोचली असती, त्या वेळेस, मीनाने, भावाला तिथे येण्यास सांगितले आणि सुटकेचा निश्वास सोडला. मीनाच्यामते कठीण वेळ आता संपली होता.

पण देवाच्या मनात, मीना आणि नीनाची, अजून थोडी कठीण परीक्षा घेण्याचा, विचार होता. खऱ्या नाट्यालाला तर ह्या पुढेच सुरुवात व्हायची होती.......

मीनाने ज्या मुलाकडून फोन घेऊन भावाला फोन केला होता, त्याला जवळच कुठेतरी जायचं होते. थोडं पुढे गेल्यावर त्याने कंडक्टरला बस थांबवायला सांगितली व तो उतरून गेला. आणखी थोड्या वेळाने ST एका बाजूला उभी करून ड्रायव्हर आणि कंडक्टर खाली उतरले, इतरही मंडळी खाली उतरायला लागली. दोघीनाही काय झालंय एक मिनिटं समजेचना. मांडीवर मुलं झोपली असल्यामुळे पटकन उठून पाहताही येईना. एका माणसाला विचारल्यावर त्यांना कळलं कि त्यांच्या बसचं चाक पंक्चर झालंय. देवाने त्यांची परीक्षा बघायचं ठरवलेलं दिसत होतं. पण आता जे जे होईल ते पाहणे एवढंच दोघींच्याही हातात शिल्लक होतं.

सर्व मंडळीना खाली उतरायला सांगून ड्रायव्हर कंडक्टर, चाक बदलायला लागले. दोघी मुलांना घेऊन मिट्ट काळोखात रस्त्यावर उभ्या होत्या. सुदैवाने मुलं झोपलेलीच होती. त्यादिवशी का कोण जाणे? चाक रिपेयर व्हायला कितीतरी वेळ लागला. घरी परत फोन करावा तर मीनाला कोणाकडेही फोन दिसेना.
सांगितलेल्या वेळेस मीनाचा भाऊ पाली फाट्यावर येउन दोघींची वाट पाहत थांबला. खूप वेळ वाट पाहिल्यावर सुद्धा, जेव्हा दोघी येईनात, तेव्हा त्याच्या मनात निरनिराळ्या शंका येऊ लागल्या. मुख्यतः, गाडीला अपघात झाला असावा, अशी शंका आल्यामुळे तो पाली पोलिस स्टेशन गेला आणी त्याने पोलिसांची मदत मागितली.
इकडे मीनाच्या बसचे चाक रिपेयर झाल्यावर बस जेव्हा पालीफाट्यावर पोहोचली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. उतरल्यावर दोघींना भाऊ कुठेही दिसेना, पुढे काय करावे हे ही समजेना.

पाली फाट्यावर त्या भयाण काळोखात त्यांना बल्ब लावलेल्या तीन चार चहाच्या टपऱ्या दिसल्या. मीना आणि नीना त्यांच्या दिशेने गेल्या. चार टपर्यांपैकी एका टपरीत त्यांना एक मध्यमवयीन बाई दिसली. त्या बाईबरोबर एक वीस बावीस वर्षाचा मुलगा पण होता. दोघी त्या टपरीत शिरल्या. त्या बाईनी, त्यांना अर्थातच, एवढ्या उशिरा तिथे कश्या वगैरे प्रश्न विचारले. आता दोघींचीही मुले उठली. त्यांना भूक लागल्यामुळे किरकिरायला लागली. ह्यांच्याकडचे खाण्याचे सर्व संपले होते. त्याबाईने त्यांना, तिच्या टपरीत जे शक्य होतं ते, म्हणजे चहा आणि बिस्कीटं दिली. दोघीही आपापल्या मुलांना चहात बुडवून बिस्कीट भरवू लागल्या.
इतक्यात त्या टपरी जवळ एक ट्रक उभा राहिला त्यातील ड्रायव्हर आणि आणखी एक माणूस, ह्या बायका मुलांना बघून, त्या टपरीत आले. ह्या दोघींनी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, पण ते त्या टपरीतल्या बाईला ह्यांच्या बद्दल विचारू लागले. तिने फार काही माहिती वगैरे दिली नाही. मग ते चहा घेऊन ह्यांच्या शेजारच्या बाकावर बसले आणि अगदी सहज करावी तशी ह्यांची चौकशी करू लागले.  

मीनाला ते दोघेही तितकेसे काही चांगले वाटले नाहीत म्हणून तिने पर्स मधून फोन काढून भावाशी बोलण्याचे नाटक सुरु केले. पण नीनाने, बोलता बोलता चुकून, “आम्हाला पालीला जायचे”, आहे असे त्यांना सांगितले. मीनाचे फोनवरचे बोलणे थांबल्याबरोबर त्यांच्यापैकी एकजण त्या दोघींना म्हणाला, “तुम्ही चला आमच्या बरोबर, आम्हीपण पलीलाच चाललो आहोत, आम्ही तुम्हाला सोडतो”. त्यावर मीनाने, “नको, आम्हाला घ्यायला भाऊ येतो आहे”, असं त्यांना सांगितलं.

ते दोघं चहा पिउन उठले आणि ट्रक जवळ उभे राहून विडी ओढू लागले. भाऊ घ्यायला येतोय ह्या थापेवर त्यांचा विश्वास बसला नव्हता. ते ट्रकपाशीच उभे राहून, खरंच ह्यांचा भाऊ येतोय का ते पाहू लागले.
थोड्यावेळाने परत टपरीत येउन ह्या दोघींच्या मागेच लागले, तुम्ही चलाच, आम्ही तुमच्या भल्याचं सांगतोय. इथे तुम्हाला दुसरे लोक खूप त्रास देतील, रात्रीची मदतही मिळणार नाही अश्या अनेक गोष्टी सांगत राहिले. ह्या दोघी आम्हाला जायचं नाहीये, असं त्यांना सांगत राहिल्या. सगळ्या चाललेल्या बोलण्याच्या आवाजामुळे शेजारच्या टपरीतले लोकही काय झालं बघायला आले. पण तेही ह्या दोघींना मदत वगैरे करण्याच्या विचारात दिसत नव्हते. ते फक्त, काय चालू आहे, ती मजा पाहत बाजूला उभे होते.
मग त्या माणसांची हिम्मत जास्तच वाढली. ते ह्या दोघींच्या मुलांचे हाथ धरून, “चला तुम्ही, चला तुम्ही”, अशी जबरदस्ती करायला लागले. इतक्यात त्या टपरीतली ती मध्यमवयीन बाई एक काठी हातात घेऊन आली आणी ह्या दोघींच्या व त्या ट्रक मधल्या माणसांच्या मधे अक्षरशः रक्षणकर्त्या देवीच्या रुपात उभी राहिली. तिने मुलांचा हात त्या दोघांच्या हातातून सोडवून घेतला आणि दोन्ही बायकांना मुलांसकट ओढत ओढत टपरीत घेऊन गेली आणि त्यांना आतच बसायला सांगून, स्वतः बाहेर जाऊन त्या दोन्ही माणसांशी भांडायला लागली. इतर टपरीवाल्या लोकांना मदत न करण्याबद्दल शिव्या देऊ लागली. तिने ट्रकवाल्यांना, तिथून निघून जायला सांगितले, व जर ते गेले नाहीत, तर इतर गाड्यांना थांबवून मदत मागेन अशी धमकीही दिली.

ते दोघे थोडेसे मागे हटले, पण मग त्या बाईला म्हणाले, “मावशी तुम्ही तुमच्या चहाचं बघा, तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. आम्ही त्यांना खरच पालीला सोडणार आहोत. तुम्ही आता गाड्यांना थांबवायचा प्रयत्न केला तरी कोणीही थांबणार नाही”

हे बोलून ते दोघं परत टपरीत जाऊन मीना आणि नीनाच्या मुलांना उचलून बाहेर आणू लागले. दुसरे सर्व पुरुष षंढा सारखे उभे होते. त्या बाईलाही काय करावा सुचेना. मीना आणि नीना तर भीतीने गारठल्या. दोन्ही मुलं त्यांच्या जवळ होती, त्यांना दोघीजणी त्यांच्या मागे मागे जात, त्या दोघांकडून,  ओढू लागल्या. ते दोघे पुढे पुढे चालत होते. मीना ओरडत होती आणि विचार करत होती कि हे दोघे जर ट्रक पर्यंत पोचले, तर आपली घरी परत जाण्याची शक्यता संपणार.
इतक्यात, अगदी हिंदी सिनेमात होतं तश्या पद्धतीने, मीनाचा भाऊ त्याची गाडी घेऊन दोन पोलिसांना घेऊन आला. पोलिसांना बघताच, त्या दोघांनी, मुलांना खाली टाकून, ट्रककडे धाव घेतली व क्षणात ट्रक मध्ये बसून ट्रक सुरु करून पळून गेले.
पोलिस त्यांच्या मागे वगैरे मुळीच गेले नाहीत, कारण त्यांच्या मते त्या दोघांवर असाही कुठला गुन्हा सिद्ध होणार नव्हता.
मीना आणि नीनाने, त्या टपरीतल्या बाईचे आभार मानले. एवढ्या संकटात ती एकटीच होती जी त्यांना मदत करायला उभी राहिली होती, निदान तिने प्रयत्न केला होता.

भाऊ दोघीनाही गाडीतून पालीला घेऊन गेला व लग्न समारंभ संपल्यावर त्याच गाडीतून दोघींना त्यांच्या घरीही सोडून आला. त्या प्रसंगानंतर कितीतरी दिवस मीनाचे मनस्वास्थ्य बिघडलेल्या अवस्थेत होते. अजूनही तो प्रसंग आठवला तरी तिच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.

हकीकत, मीनाने जशी सांगितली, तशीच्या तशी तुमच्यापुढे कथन केली.

देवदयेने मीना आणि नीना सुरक्षित राहिल्या हे नशिबच म्हणायचे आणि काय?

थोडक्यात म्हणजे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असा प्रकार. आपल्या देशात बायका किती अशुरक्षित आहेत, ह्याचं, हा प्रसंग एक उदाहरण म्हणायला हवं.

तुम्हालाही सुन्न झाल्यासारखं वाटलं ना????    

त्या टपरीवाल्या बाईला सलाम करण्याकरता आणि मीना बचावल्याचा आनंद प्रकट करण्याकरता, माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये ह्या हकीकतीचा समावेश..............