Tuesday, 22 October 2013

Shanticha bhoot...

आम्ही कल्याणला राहत असताना आमच्याकडे विजय सुपर आणि M 80 अश्या दोन, २ व्हीलर गाड्या होत्या. मी लायसन्स मिळण्याइतकं वय नसताना सुद्धा, M 80 चालवत असे.

एकदा मला ट्राफिक पोलिसाने, पकडलंही होतं. लायसन्स मागितल्यावर, "माझ्याकडे लायसन्स नाही आणि पैसे पण नाहीत, तरीही प्लीज मला सोडून द्या",असं मी सांगितलं होतं. हसून त्यांनी मला, लायसन्स मिळे परतपर्यंत गाडी न चालवण्याच्या बोलीवर, सोडून दिलं होतं.

त्या नंतरही मी गाडी चालवतच होते, अगदी त्यांच्या समोर सुद्धा. ते फक्त हसत असत. मग मला जेव्हा लायसन्स मिळालं तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांना माझं लायसन्स दाखवलं होतं. "शाब्बास, पण सांभाळून चालव हा", असं ते मला म्हणाले होते.

तर, आमच्याकडे दोन गाड्या होत्या, त्यांच्या चाकांमध्ये हवा भरायला किंवा छोट्या मोठ्या रीपेयरिंग करता आम्ही नेहमी गाड्या चीचुच्या Garage मध्ये घेऊन जायचो. कल्याणला मुरबाडरोडवर चीचुचं garage होतं. आता आहे कि नाही कोणास ठाऊक?

हा चीचू अत्यंत सालस, सरळमार्गी, पंचवीस सहवीस वर्षाचा मुलगा, त्याचं खरं नाव काय होतं कोणास ठाऊक? सगळे त्याला चीचू म्हणायचे एवढं मात्र खरं. चीचुच्या त्या garage मधे छोटू नावाचा त्याचा मदतनीसही होता. दोघेही खूप चांगले होते. त्यानी कधीही आमच्याकडून अवाजवी पैसे उकलण्याचा प्रयत्न केला नाही. कुठलीही समस्या चटकन सोडवून हा आम्हाला लगेच मोकळं करत असे.

असंच एकदा मी आणि तात्या सकाळी ९ च्या सुमारास त्याच्या garage मध्ये गेलो, तर गुरुजी, तिथे कसलीतरी पूजा करत होते. तात्यांनी चीचुला सहज विचारलं कि “कसली पूजा चालली आहे” ? चीचू म्हणाला, “तात्या काय सांगू तुम्हाला? मोठ्या संकटातून वाचलो काल, म्हणून गुरुजी कसली तरी शांत करतायत”.

साहजिकच तात्यांनी त्याला “का रे? काय झालं “? असं विचारलं. त्याने आम्हाला एक विलक्षण कहाणी सांगितली.

साधारण पाच एक दिवस आधी चीचुच्या garage मधे एक खन्ना नावाच्या माणसाची फियाट गाडी रीपेयारिंग करता आली होती. चीचुने त्या माणसाला गाडी रिपेयर व्हायला चार पाच दिवस लागतील असं सांगितलं होतं. तो माणूसही बरं म्हणून निघून गेला होता. नंतर ती गाडी दोनच दिवसात रिपेयर झाली. चीचुचे दोन चार मित्र त्याच्या मागे लागले, कि आपण ती गाडी घेऊन गोव्याला जाऊया. चीचू काही तयार झाला नाही, कारण त्याला तसं करणं चुकीचं वाटत होतं. मग मित्रांची कटकट नको म्हणून तो ती गाडी स्वतः त्या खन्नाच्या घरी पोचवायला गेला. खन्नाच्या घराला कुलूप होतं. शेजारी चौकशी केल्यावर खन्ना कुटुंब आठवड्याभराकरता दिल्लीला गेल्याचं त्याला समजलं. म्हणून मग,चीचू गाडी घेऊन परत आला.

आता त्याचे मित्र खूपच मागे लागले. हो नाही करता करता चीचू गोव्याला जायला तयार झाला. छोटूलाही त्याने बरोबर घेतलं. गाडीत काही बिघाड वगैरे झाला तर, म्हणून, हत्यारं वगैरे ही बरोबर घेतली व सगळे गोव्याला गेले.

तिथे दोन दिवस राहून सगळे परत यायला निघाले. मुंबई गोवा रस्त्यावर, साधारण संध्याकाळी सहाच्या सुमारास, लघुशंके करता, त्यांनी गाडी जरा आत वळलेल्या एका रस्त्यावर वळवून एका झाडाखाली थांबवली व सगळ्यांनी झाडाच्या आडोश्याला आपले काम उरकून घेतले. तोंडावर जरा पाणी वगैरे मारून सगळे फ्रेश होऊन गाडीत बसले. आता जरा पुढे, कुठे चहाची टपरी दिसली तर चहा घेऊ, आणि पुढे निघू असा विचार त्यानी केला.

गाडी सुरु करायला गेले तर गाडी काही सुरु होईना.चीचू आणि छोटू खाली उतरले व गाडीत काय बिघाड झाला असावा हे शोधू लागले. बराच वेळ सगळं चेक केल्यावरही त्यांना काही बिघाड दिसेना पण गाडी काही सुरु होईना.

आता सगळे इतर मित्रही खाली उतरले आणी आपापसात चर्चा करू लागले. काय करावं? कोणालाच काही सुचेना. आजूबाजूला कोणी माणूसही दिसेना. हळू हळू अंधारही व्हायला लागला होता. इतक्यात एक मित्र म्हणाला, त्याने गाडीत एका बाईला बसलेलं पाहिलं. आता सगळे जरा घाबरले.

त्यांचं वेगवेगळे तर्क करणे सुरु झालं, आणि बहुदा काहीतरी भूतबाधा असावी ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं. मग त्यावर कोणाकोणाला जे काही उपाय माहित होते ते करणं सुरु झालं. गोव्याला देवळात जाऊन आल्यामुळे, त्यांच्याकडे हळद कुंकू होतं , ते त्यांनी तिथे वाहिलं, नारळ होता तो फोडला. कोणीतरी म्हणालं, अश्या वेळेस गाडीत बसून सिगारेट ओढावी, म्हणजे काही बाधा असली तर निघून जाते, असं त्याने कुठे तरी ऐकलं होतं, म्हणून कोणीतरी गाडीत बसून सिगारेट ओढली. गाडी पुढे साष्टांग दंडवत घातला, गाडीवर लघवी केली, गाडीवर थुंकले, असले बरेच अचरट प्रकार केल्यावर सुद्धा गाडी काही सुरु झाली नाही.

चीचू परत काही तांत्रिक अडचण आहे का ते शोधायला लागला. आता अंधारही बराच झाला होता. सगळे भयंकर घाबरलेपण होते. इतक्यात तिथे एक पांढरं धोतर आणि झब्बा घातलेला माणूस आला, आणि ह्या सगळ्यांशी बोलू लागला. त्याने आपलं नाव येटल्या असं सांगितलं , हा म्हातारबाबा म्हणे, पुढे असलेल्या गावातल्या भैरोबाच्या देवळाचा गुरव होता. देवळात दिवा लावण्याच्या कामाला चालला होता. त्या दिवशी त्याला थोडा उशीर झाला होता. चीचुने त्याला समस्या सांगितली.

म्हातारबाबा म्हणाला मला वाटलंच कि "शांतीने धरलं तुम्हाला".त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या झाडावर शांता नावाच्या बाईचं भूत राहायचं व तिथे कोणी थांबल्यास, थांबलेल्या लोकांना, असा त्रास नेहमी होत असे. मग साहजिकच सगळ्यांनी त्याला उपाय काय करायचा असा प्रश्न केला.
त्यावर त्याने गाडी झाडाच्या खालून ढकलत ढकलत लांब न्यायला सांगितलं. त्या प्रमाणे त्यांनी गाडी थोडी लांब ढकलली. मग तो माणूस म्हणाला आता सगळे गाडीत बसा आणि मागे वळून न पहाता गाडी सुरु करून निघून जा.

सगळे गाडीत बसले, गाडी सुरु होईल कि नाही हा प्रश्न त्यांच्या मनात होताच. चीचुने गाडी सुरु करायचा प्रयत्न केला आणि गाडी खरंच सुरु झाली, मागे वळून पाहू नका असं सांगितलं असल्यामुळे त्या माणसाचे आभार सुद्धा न मानता हे सर्व, जोरदार गाडी चालवून, वाटेत कुठेही न थांबता कल्याणला परत आले. रात्रभर garage मधेच थांबले. सकाळी सकाळी गुरुजींकडे जाऊन झाला प्रकार त्यांना सांगितला, आणि मनशांती करता, त्यांनी सांगितलेली शांत चीचू करून घेत होता.

आम्ही तर ऐकून अवाकच झालो. काय झालं असावं नक्की? प्रश्न पडला.

आता झाडावर शांतीचं भूत होतं कि नाही ते त्या झाडालाच माहित, म्हातारबाबा खरं सांगत होता का खोटं ते म्हातारबाबाला माहित. गाडी का बंद पडली आणि कशी चालू झाली ते त्या गाडीला माहित. चीचू खरं सांगत होता कि खोटं ,ते चीचुला माहित. भुतं असतात का नाही? देवालाच माहित.

खरं खोटं काही असो, ऐकून थोडं विलक्षण वाटलं होतं एवढं मात्र खरं आणि म्हणूनच तुम्हालाही सांगितलं.

तुम्हाला तरी काय? गोष्ट ऐकण्याशी मतलब, खरं कि नाही?

No comments:

Post a Comment