Monday, 21 October 2013

Tatya..majhe vadil

पस्तीस-चाळीस वर्षापूर्वी बहुतेक मराठी कुटुंबांची होती, ती माझी पार्श्वभूमी. माझा जन्म कल्याणचा. मी दहावीत जाईपर्यंत आम्ही तिथेच राहायचो. माझे वडील रेल्वेत नोकरी करायचे, आणि आई, मराठी शाळेत शिक्षिका. मला दोन बहिणी. चौदा आणि बारा वर्षांनी मोठ्या. मी घरात सगळ्यात लहान. सगळ्यांची खूप लाडकी.

माझे वडील म्हणजे जमदग्नी चा अवतार, भयंकर तापट. त्यांना मी तात्या म्हणायची. त्यांना उलट उत्तरं दिलेली अजिबात खपत नसत. सुरुवातीला, मी कधी कधी वाद घालायचा प्रयत्न करत असे तेव्हा "तुझे जेवढे वय नाही तेवढी वर्ष मी हे काम करतोय, तेव्हा, तू माझं ऐक". असं ते म्हणायचे. काही वर्षांनंतर मात्र ते शांतपणे दुसऱ्याची बाजू ऐकायचे. कदाचित वय वाढल्यावर होणाऱ्या बदलामुळे असावे.

त्यांना व्यवस्थितपणाचं व्यसन होतं. प्रत्येक वस्तू जिथल्यातिथे ठेवलीच पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. एक छोटीशी गोष्ट... आमच्या स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या समोरच्या भिंतीमध्ये एक कोनाडा होता. ह्या कोनाड्याच्या शेजारी तात्यांनी आमच्या घरात असलेले दोन टॉर्च, (त्यावेळी, आम्ही त्याला battery म्हणायचो) अडकवण्याकरता दोन खिळे मारले होते. छोटी battery पहिल्या खिळ्याला व मोठी दुसऱ्या खिळ्याला अशीच आम्हाला अडकवावी लागे. ती इकडची तिकडे केलेली त्यांना खपत नसे. “असे का?” असे विचारल्यावर, “ मला कसलीच शोधाशोध करायला आवडत नाही. वस्तू जागच्याजागी असली म्हणजे शोधण्याचा प्रश्नच येत नाही. मग ठेवा कि वस्तू जिथल्या तिथे, काय हरकत आहे?” असे उत्तर मिळाले. ह्यावर पुढे काही बोलण्याची माझी काय, कोणाचीच शामत नव्हती.. हा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा फैसला, त्याला अपील नाही.
तात्या अखंड काम करायचे, मी त्यांना काही न करता बसलेलं कधी पाहिलं नाही. ते माटुंग्याला रेल्वे वर्कशॉप मध्ये नोकरीला होते. सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी कल्याणहून जाणाऱ्या वर्कमेन स्पेशल ने ते अनेक वर्ष कामावर जायचे. लहानपणी ‘कामावर जाणे’ हाच शब्द मला माहित होता. माझे वडील ऑफिसला वगैरे नव्हते जात. रोज पाच वाजून पाच मिनिटांनी ते घरातून निघायचे,घरच्या जेवणाचा पूर्ण डबा घेऊन. माझी आई वर्षोनवर्ष सकाळी चार वाजता उठून आमटी, भाजी, भात, पोळीचा ताजा स्वयंपाक, त्यांना डबा देण्याकरता करत असें.
सकाळी लवकर जात असल्यामुळे ते दुपारी साधारण साडेचार वाजेपर्यंत घरी परत येत असत. परत आल्यावर चहा पिउन ते परत आपल्या कामांना निघून जात. नोकरीच्या व्यतिरिक्त, ते इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा झाला असल्याने, इलेक्ट्रिशिअन चे कामही करायचे. ही त्यांची कामं कधीही संपायची नाहीत. बाहेर गेलेले नसतील तर बहुतेक वेळा ते घरी, पंखा, इस्त्री, गिझर अश्या लोकांच्या बिघडलेल्या वस्तू रिपेयर करायचे. तात्यांना आणि आईला सदैव काम करताना पाहिल्यामुळे, अजून सुद्धा, एखादं काम समोर असेल, तर ,ते न करता, मी पुढे जाऊ शकत नाही. ‘कंटाळा आला’, ‘उद्या पाहू’, हे शब्द मी आमच्या घरात कधीही ऐकलेले नाहीत.

ते मनस्वी होते. त्यांना रेकॉर्ड ऐकणे व कुत्री पाळणे हे दोन शौक होते. त्यावेळी पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान रेकॉर्ड मिळायची, त्या काळात,एखाद्या माणसाचा महिन्याचा पगार असायचा तेवढा. आमच्या घरी साधारण दीड-दोनशे रेकॉर्ड होत्या. बाबूजींची गाणी त्यांना विशेष आवडायची, त्यातही त्यांना अत्यंत आवडलेलं गाणं म्हणजे, 'समाधी साधन, संजीवन नाम' हे. हे गाणं त्यांनी एक दिवस सलग एकतीस वेळा ऐकलं होतं.

त्यांनी,त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून कायम कुत्रं पाळलेलं होतं . एक मेलं कि ते दुसरं आणायचे. त्या कुत्र्यांचं सगळं भयंकर प्रेमाने व निगुतीने करायचे. त्यांचे आजार काढायचे,त्यांच्या जेवणाचं पहायचे, त्यांची बाळंतपणही करायचे. कुत्र्याच्या पिल्लांना डास चावू नयेत म्हणून त्यांनी ओट्याखालच्या एका कोनाड्याला, एक जाळी खिळ्यांनी जोडली होती. ह्या जाळीला खालच्या बाजूला एक लाकडी baton जोडलेली होती. त्या वजनाने ती जाळी हलत नसे, व खाली सोडल्यावर पिलांची मच्छरदाणी तयार होत असे. सकाळी त्या baton वर ती जाळी रोलअप करून कोनाड्याचा वरच्या बाजूला ठेवता येत असें. असे अनेक उद्योग ते सतत करत राहायचे. आईने खर्चांवरून कधी कटकट केली तर, “पैसे कमी पडत असतील तर काटकसर करण्यापेक्षा, कष्ट करून ते जास्त कसे मिळतील ह्याचा विचार मी करतो”, असं नेहमी म्हणायचे व वागायचेही.

माझे आई वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आमच्या घरी त्यावेळीही फ्रीज, टी.व्हि, रेकॉर्ड प्लेयर, मिक्सर, अश्या लोकांकडे नसणाऱ्या वस्तू होत्या. आमच्या घरी फोल्डिंग डायानिंग टेबल तर होतंच, पण त्याच्या बाजूनी बसण्याकरता दोन फोल्डिंग बाकं पण होती. हे टेबल भिंतीला जोडलेलं होतं व त्याच्या आतमध्ये भरपूर डबे वगैरे ठेवण्याची स्टोरेज स्पेस होती. सुताराला बरोबर घेऊन हे टेबल, त्यांनी स्वतः बनवलं होतं. तात्या भरपूर सेकंड हँड वस्तू आणायचे व त्या रिपेयर करून वापरण्या साठी उत्तम तयार करायचे.

मला पॉकेट मनी वगैरे कधीच मिळाला नाही, आमच्या घरी, एक प्लास्टिकचं लाल रंगाचं भांडं, कपाटाच्या सेफ मध्ये ठेवलेलं असायचं, त्यात पैसे असायचे व घरातला प्रत्येकजण गरजेप्रमाणे त्यातून पैसे घायचा. त्यांनी आम्हाला मुलींना कधीही त्यातल्या पैशाचा हिशोब विचारलेला मला आठवत नाही..

तात्या जिथे शक्य होईल तिथे इतरांची मदत करायचे, कुणाच्या घरी लग्न आहे त्याला फोटोग्राफर गाठून दे, कुणाचं नवीन लग्न झालंय त्याला भांडी फंडातून, स्वतःच्या नावावर स्वस्तात भांडी घेऊन दे, कुणाला नवीन मिक्सर घ्यायचाय, तो स्वस्त मिळतो म्हणून त्याला लोहार स्ट्रीट ला घेऊन जा, अशी अनेक कामं त्यांनी अनेकांसाठी केली. त्यामधून स्वतःचा काही फायदा व्हावा अशी त्यांची कधीही अपेक्षा नसायची.

एखादी गोष्ट भरपूर समोर असली कि त्यातलं अप्रूप नाहीसं होतं, असं त्यांचं मत. आपल्या मुलांना कुठल्याही खाण्याचं अप्रूप वाटता कामा नये म्हणून तात्या Crawford Market मधून चार किलोची सिडलेस द्राक्षाची पेटी, मोठाले फणस अश्या कितीतरी जड असलेल्या गोष्टी रिक्षासुद्धा न आमच्याकरता घेऊन यायचे. मग द्राक्ष आणि गरे शेजाऱ्यानाही वाटायचे. माझी आई त्या काळीही इडली, डोसा, वडा असे हॉटेल मध्ये मिळणारे पदार्थ भरपूर प्रमाणात घरी करायची.
घरातला कुठल्याही समारंभाची तात्या शान असायचे, ते खूप छान नकला करायचे. कुणाच्याही घरी कितीही काम करायचे. दुसऱ्याचे पैसे कमी खर्च व्हावेत म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचे. समारंभाला भरपूर माणसं बोलवायचे. त्यांनी खूप माणसं जोडली होती. आमच्या घरी अनेक वेळा पाहुणे आलेले असायचे, त्याचा त्यांना त्रास वगैरे कधीच झाला नाही.

त्र्याण्णव साली तात्या वारले, त्यावेळी मी मेडिकलच्या पहिल्या वर्षाला होते. माझ्या आयुष्यातलं खूप मोठं नुकसान होतं ते. त्यांच्या अंत्ययात्रेला किमान पाचेक्शे माणसं हजर होती. गर्दी पाहून कोणीतरी पटकन म्हंटलेलं मी स्वतः ऐकलंय. "भट नेहमी म्हणायचे", "पैसा नको, माणसं जोडा." "जोडलेला पैसा बँकेत राहतो, माणसं पोचवायला स्मशानात येतात."

एवढी आलेली माणसं, ही त्यांचे शब्द खरं करणारा पुरावा नाहीतर दुसरं काय होतं?

No comments:

Post a Comment