Monday, 21 October 2013

Prem aani Vishwaas

प्रेम आणि विश्वास ह्यांची पूर्ण खात्री पटवणारी ती घटना. आमच्या लग्नाच्या आधीची. त्याकाळी मी शिक्षणाकरता पुण्याला राहत होते. दर शुक्रवारी संध्याकाळी मी मुंबईला यायची व सोमवारी सकाळी पुण्याला परत जायची. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस, मी सगळा वेळ ह्यांच्याबरोबर घालवत असे. कधी ते आमच्या घरी येत ,कधी मी त्यांच्याकडे जायची, किंवा कधीतरी दोघे मिळून आम्ही कुठेतरी बाहेर जायचो.

एकदा असंच आम्ही दोघानी V.T. स्टेशन वर सकाळी अकरा वाजता भेटायचं ठरवलं . तेव्हा ते विक्टोरिया टरमिनसच होतं. छत्रपती शिवाजी टरमिनस झालेलं नव्हतं. ठरल्याप्रमाणे सकाळीच उत्साहाने भराभर तयार होऊन मी घराबाहेर पडले. खाली उतरले, तर आमच्या समोर राहणाऱ्या, एका मैत्रिणीने हाक मारली आणि विचारलं, "स्टेशन वर निघाली आहेस का?"

मी म्हंटलं "हो". तर म्हणाली, “थांब दोन मिनिटं, मी पण आईला सांगून उतरतेच आहे, एकत्र जाऊया”. मी बरं म्हणून खाली उभी राहिले. पाच मिनिटं झाली तरी ती काही आली नाही, मी जरा वैतागलेच, कारण मला उशीर होत होता. आणखी पाच मिनिटं झाल्यावर सुद्धा जेव्हा ती आली नाही, तेव्हा मी तिला खालूनच हाका मारल्या. त्यालाही तिने काही उत्तर दिले नाही.

"मला उशीर होतोय, मी जाते, तू निघ सावकाश", असं तिला सांगून पटकन सटकावं, असा विचार करून मी फटाफट त्यांच्या बिल्डिंगचे दोन मजले चढून वर गेले. त्यांचं दार उघडंच होतं, आणि कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. मी थोडीशी गोंधळले व तिला हाक मारली, तिने मला आत बोलावलं. बघितलं तर झोपलेल्या आईच्या शेजारी बसून माझी मैत्रिणच रडत होती. काय झालं असावं, काही अंदाजही येईना.
अगं कधीची वाट पाहत्येय, काय झालं? आणि रडत्येस कशाला? असं सगळं भराभर, जरासं जोरातच तिला विचारलं.

ती म्हणाली, "आई हाक मारून बाहेर आली नाही म्हणून आत येऊन बघितलं”. “शी इज नॉट ब्रीदिंग, आय काण्ट फील हर पल्स." ही माझी मैत्रीण त्यावेळी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होती. त्यामुळे आई गेली हे तिला समजलं होतं. आधी काहीही झालेलं नसताना रात्री झोपेत काही कारणाने तिची आई गेली होती.

मला दरदरून घाम फुटला, काय करावं काही समजेना, माझ्या हातातली पर्स त्यांच्या सोफ्यावर टाकून मी आत गेले. पाहिलं तर खरच परिस्थिती कठीण दिसत होती. तिला विचारलं, तुझे बाबा आणि भाऊ कुठायत? तिने काहीतरी उत्तर दिलं, काय ते मला आता आठवत नाही. मी तिथेच तिच्या जवळ बसले, धक्का बसल्यामुळे माझ्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं. दहा मिनिटांनी, जरा सावरल्यावर मी शेजारच्या काकुना बोलावलं. मग इतरही लोक आले. माझी आईही आली.

थोड्या वेळाने तिचे वडील आले. मग, खाली जाऊन डॉक्टरला बोलावणे, नातेवाईकांना फोन वगैरे वगैरे सगळं सुरु होतं . सगळं होईपर्यंत मला वाटतं दोन तास गेले असतील.
इतका वेळ, मी आपण कुठेतरी चाललो होतो आणि कोणीतरी आपली वाट पहातंय, हि गोष्ट पूर्णपणे विसरून गेले होते. अचानक एका क्षणी मला ते आठवलं आणि मी एकदम Panic झाले. त्यावेळी मोबाईल फोन वगैरे काही नसल्यामुळे त्यांना काही कळवणेही शक्य नव्हते. एका मिनटात निर्णय घेतला, फटकन उठून आई जवळ गेले आणि म्हंटलं, "आई मी ह्या सगळ्या गडबडीत V. T. चं विसरून गेले गं." ‘हे’ वाट पाहत असतील, मी जाते."

त्यावर आई म्हणली, "अगं आता जायला निघालीस तर जवळ जवळ तीन तास उशीर होईल तुला”, “मला वाटतं ते आता इकडे यायला निघाले सुद्धा असतील, आणि आता इथून जायचं, म्हणजे पुन्हा आंघोळ करायला हवी तुला." मी म्हंटलं," जाऊदे आंघोळ, ते भेटले तिकडेच तर येऊन दोघेही करू आंघोळ, नाहीतर मी परत येउन करेन. आणि ते घरी आले, तर सांग त्यांना तू काय झालंय ते, पण मी जाऊन, ते तिथे नाहीयेत हे पाहून येते."

आईला फारसं काही पटलं नाही माझं वागणं, त्यात आंघोळ न करता जाण्याचं तर फारच खटकलं,पण लोकाच्या घरात ती मला फारसं काही बोलली नाही. मीही जास्त संभाषणाच्या भानगडीत न पडता भराभर बाहेर पडले आणि जितक्या जास्तत जास्त लवकर जाता येईल तितक्या लवकर V.T. ला गेले. आमची चुकामूक झाली असणार, आणि हे नेहमीच्या ठिकाणी असणार नाहीत, असा अंदाज होता, कारण मी जवळपास तीन तास उशिरा गेले होते.

पण उतरून PLATFORM वरून पुढे गेले, तर आम्ही नेहमी भेटायचो तिथल्या बाकावर, ‘हे’, एक पुस्तक वाचत बसले होते. मी जवळ जवळ धावत त्यांच्या पर्यंत गेले आणि त्यांच्या शेजारी उभी राहिले. ते उठले आणि माझे दोन्ही दंड गच्च धरून त्यांनी मला विचारलं, "काय झालं"? त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही राग नव्हता पण भयंकर काळजी मात्र दिसत होती. मी त्या "काय झालं" चं काहीही उत्तर न देता ह्यांना विचारलं, "किती वेळ अशी वाट पाहणार होतात?”, त्यावर ते अगदी शांतपणे म्हणाले, “तू येई पर्यंत".

त्यांचं वेड्यासारखं माझी वाट पाहणं,मी सांगितलंय म्हणजे नक्की येणार हा विश्वास ठेवणं, माझ्यावरच्या प्रेमाची; माझ्यावरच्या विश्वासाची; माझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीची, ग्वाही देऊन गेलं. मला खोलवर कुठेतरी, खूप सुखावून गेलं आणि आमच्या मध्ये एक घट्ट बंध बांधून गेलं.
माझे डोळे ओलावले, आणि मग, आम्हाला दोघानाही हसायलाच आलं. तिथेच बाकावर बसून जे झालं होतं ते सांगितलं आणि मग दोघे मिळून घरी परत आलो.

आई स्वयंपाक करून आमची वाट पहात होती. आल्याबरोबर ह्यांना म्हणाली, "एवढा वेळ तिथेच थांबला होतात? कमाल आहे तुमची!!, आता दोघं आंघोळी करा पटापट आणि जेवायला या. आधीच केवढातरी उशीर झालाय", आणि जेवणांच्या तयारीला लागली.

आज एवढी वर्ष झाली तरी, आमचं एकमेकांची वाट पाहणं जसच्या तसं सुरु आहे. मी रोज त्यांनी ऑफिसातून येण्याची वाट पाहते व मी माहेरी गेल्यावर ते माझ्या घरी परत येण्याची.

No comments:

Post a Comment