काल एका पोस्ट मध्ये कॉमेंट म्हणून मंडळीना उखाणा लिहायला सांगितला. दोघा चौघांनी लिहिलाही. पण मला जाणवलं, कि आपलं ह्या सगळ्यातलं स्किल, आता कमी झालं. मोठ्ठ्या काकांच्या लग्नात आमची आजी उखाण्यातून भांडली होती. झाला प्रकार मी तात्यांकडून ऐकला होता, माझ्या कुवतीनुसार तुम्हाला सांगते.
काकांच्या लग्नात मुलीकडची मंडळी खूप लांबच्या गावाहून दापोलीला लग्न करून देण्याकरता आली. साहजिकच त्यांना मुलाकडच्यांची फार छान व्यवस्था करता आली नाही. प्रसंग पंगतीच्या वेळी घडला. पंगतीत मांडायला मुलीकडच्याना पाट मिळाले नव्हते. रांगोळी, महिरपी सगळं त्यांनी केलं होतं पण पाट नव्हते.
आमची आजी वरमाई, तिला आला राग, ती जेवायला बसताना म्हणाली"समोरच्या कोनाड्यात कुटून ठेवला मसाला, पाट नाही बसाला तर कण्या रांगोळ्या कशाला?"
मुलीकडच्यानही कमी समजू नका हं, सगळेच कोकणस्थ!!! त्यांच्यापैकी एक आजींनी लगेच उत्तर दिलं, त्या म्हणाल्या, “समोरच्या कोनाड्यात दाणे ठेवले कुटून, आम्ही आलो उठून तर पाट मांडू कुठून?”
लगेच आजीचं प्रत्युतर, “समोरच्या कोनाड्यात विरजून ठेवलं दही, बाकी सगळं मागून नेलं तसे पाट मागून न्यायला हरकत नाही.”
आता मुलीची आई घाबरली, तिने भांडण आवरतं घेतलं, ती अजीजीने म्हणाली, “समोरच्या कोनाड्यात आणून ठेवली कॉफी, आमच्या हलगर्जीपणाला देऊन टाका माफी”.
इतक्यात माझे आजोबा तिथे येताना माझ्या आजीला दिसले, तिने लगेच सूर बदलला आणी म्हणाली, “समोरच्या कोनाड्यात ठेवली काळी शाई, तुमची अडचण समजून घेते, मी पण आहे मुलीची आई.”
गम्मत म्हणजे हे सर्व उत्स्फूर्त. आता कधी उखाणे घेतात तरी कि नाही कोणासठाऊक?
गेल्यावर्षी आमच्या मुंबईतल्या नवीन घराची वास्तूशांत झाली. होम झाल्यावर गुरुजी म्हणाले, "वाहिनी खरं म्हणजे अश्या वेळी मी नाव घ्यायला सांगतो, पण तुम्ही सकाळपासून मुखार्जीना एवढ्या हाका मारल्यात, कि आता सर्व झाल्यावर परत तुमच्या तोंडून नाव ऐकलं तर ते विचारात पडतील आता नवीन काय काम उभं राहिलं?"
मी म्हंटल, "असं काही नाही हो त्यांना सवय आहे, घेते मी नाव"… आणि गम्मत म्हणजे दोन मिनिटं मला उखाणाच आठवे ना…… तर मुद्दा काय स्किल कमी झालं………………
No comments:
Post a Comment