Monday, 21 October 2013

Ghatasphot

आज सांगते एक कथा, तिची आणि त्याची…………
ती होती चंचल, खळखळून हसणारी, आनंदाने वेडीपिशी होणारी, दुःखात खूप रडणारी, रागाने बेभान होणारी,भरभरून प्रेम करणारी,उत्कट आयुष्य जगणारी.

तो अगदी विरुद्ध, धीरगंभीर, हलकेच हसणारा, आनंद आणि दुःख स्थिरतेने पेलणारा,रागही शांतपणे व्यक्त करणारा, प्रेम करणारा, पण ते न दाखवणारा, समतोल आयुष्य जगणारा.

त्या दोघांची भेट झाली. दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले, एकमेकाना आवडू लागले, आई वडिलांच्या संमत्तीने, मोठ्यांच्या आशिर्वादाने लवकरच विवाह बंधनात बंध झाले.

नव्याची नवलाई संपली आणी एकमेकातला विरोधाभास त्यांना सतत जाणवू लागला. विरुद्ध स्वभावाचा त्रास होऊ लागला. तिचा त्रागा त्याला सहन होईना आणि त्याचा संथपणा तिला. एकमेकांच्या समोर येणे नको असे त्यांना झाले. लग्नबंधन तुटते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण दोघेही शहाणे आणि समंजस होते. बरोबर तेच करणारे होते. तुटे पर्यंत ताणू नये हे त्यांना माहित होते. मग त्यांनी थोडी तडजोड केली. तो थोडं जास्त हसू लागला. ती थोडी शांत झाली. एकमेकांना आवडतील अश्या गोष्टी ते दोघेही करू लागले आणि लवकरच एकमेकाना नव्याने आवडू लागले. सुखाचा संसार करू लागले. ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली. आज दोघांची स्थिती अशी आहे कि ते एकमेकांशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाहियेत आणि आनंदाने संसार करतायत.


 अनेक वेळा घडणारी अतिशय सामान्य अशी ही कथा. ही आज का सांगावीशी वाटली मला?
आज सकाळी माझ्या बहिणीशी फोन वर बोलताना आमच्या एका मैत्रिणीच्या मुलाचा घटस्फोट झाल्याचं समजलं,खूप वाईट वाटलं. गेल्या दोन ते तीन वर्षात माझ्या माहितीतल्या आठ मुलामुलींची लग्न झाली आणि आज, दुर्दैवाने, त्यातली फक्त दोन शाबूत आहेत. सहा लग्नांपैकी मला वाटतं तिघांचा घटस्फोट झालाय, दोघी मुली त्यांच्या माहेरी गेल्यायत आणि एका जोडप्यात प्रचंड प्रमाणात भांडणं सुरु आहेत.

ही सर्व मुलंमुली चांगल्या घरातली आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. ती उच्चशिक्षित आहेत. एक व्यक्ती म्हणून विचार केला तर सगळे चांगलेच आहेत, पण एकमेकांचे पटत नाही. कारणं वेगवेगळी आहेत पण समस्या अश्या काही नाहीयेत कि ज्या सोडवता येणार नाहीत.
काही वेळेला खरोखरच परिस्थिती अशी असते कि घटस्फोट हाच एकमेव मार्ग असतो समस्या सोडवण्याचा, पण हल्ली ज्याप्रमाणावर "पटत नाही" हे शब्द ऐकू येतात ते भयावह आहे असा मला वाटतं.
खूप विचार केला, का पटत नसावं त्यांचं?

मला असा वाटतं भारतात पहिल्यांदी मंडळी जेव्हा एकत्र कुटुंबात रहायची त्या वेळेस दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करणे , हल्ली ज्याला आपण "Standing in others shoe "असं म्हणतो, हा भाग अस्तित्वात होता. तो आता नाहीसा झालेला आहे. हल्ली प्रत्येक जण"Minding their own business" मध्ये विश्वास ठेवणारा झाला आहे.
नवीन पिढीत अजून एक खूप ठाम दिसून येणारा विचार म्हणजे “It’s my life, I will live it the way I want to” पण हा विचार करताना लग्नानंतर अजून एकाचं पण आयुष्य आपल्याबरोबर बांधलं गेलं आहे ह्याचा स्वीकार करण्याची तयारी अजिबात नाही. ‘प्रयत्न’ आणि ‘तडजोड’ ह्या दोन अतिशय महत्वाच्या शब्दांना तर फक्त करियर मधे स्थान,लग्न निभावण्यात नाही.

 माझे वडील मला लग्नाच्या आधी नेहेमी म्हणायचे, “लग्न झालं म्हणजे आमच्या मुलीची जबाबदारी संपली असं मानणारे आई वडील आम्ही नाही. पण स्वतःचं लग्न यशस्वी करण्याकरता प्रत्येकाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी पटल्या नाहीत, तरी कराव्या लागतात, आणि तुम्ही असं दोन वेळा केलत तर समोरचाही कधीतरी त्याला न पटणारे तुमच्या करता करायला लागतो. छोट्या समस्यांना मोठ्या न करण्यातच दोघांचं हित असतं”. किती साधी तरी किती महत्वाची आहेत ही दोन चार वाक्य!

 शारीरिक किंवा मानसिक छळ, विवाहबाह्य संबध, व्यसनं, शारीरिक कमतरता ही आणि अशी काही इतर कारणं घटस्फोटा करता ग्राह्य ठरू शकतात, पण ह्या व्यतिरिक्त इतर अनेक कारणं आहेत जिथे घटस्फोट टाळता येणे शक्य आहे. मग आपण आईवडील म्हणून कुठे तरी चुकतोय का????? मला वाटतं आपण सगळे आई बाबा, आपल्या मुलांची, ‘सहनशीलता’, ‘प्रयत्न’ आणि ‘तडजोड’ ह्या शब्दांशी ओळख करून देऊया आणि त्यांचा वापर करून, त्यांचं लग्न आणि आयुष्य, सफल व सुखाचं कसं करता येईल हे त्यांना समजावून देऊया. म्हणजे कित्येक चांगल्या मुलांची आणि मुलींची आयुष्य उध्वस्त होण्यापसून वाचतील आणि तुम्ही आम्ही जसे सुखी आहोत तसेच ते हि होतील.

 मग दोघे जोडीने नमस्कार करायला आल्यावर, आपण भरभरून आशीर्वाद द्यायला मोकळे, आयुष्यवान भव, विद्यावान भव, धनवान भव, आणि सगळ्यात महत्वाचं, सुखी भव……….

No comments:

Post a Comment