Tuesday, 22 October 2013

Pardesh...

परदेशात राहणे, या बद्दल अनेक व्यक्तींच्या, अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात;
कुणाला, आपल्याला परदेशात राहायला मिळावं असं वाटतं, कुणाला, तिथे जायला लागलं नाही, ह्याबद्दल आनंद असतो, कुणाला तिथे राहायला आवडतं, कुणाला, त्याबद्दल बढाई मारायला आवडते, कुणाला, परदेशात असणे हे, तो किंवा ती, कसा, किंवा कशी, यशस्वी आहे, हे दाखवण्याचं एक साधन वाटतं, तर माझ्या सारख्या काहींना इलाज नाही म्हणून, तिथे राहावं लागतं.

मला बरेच लोकं, “इलाज का नाही?”, “नाही आवडत तर यायचं परत”, असं म्हणतात. असं करावं, असा विचार अगणित वेळा मनात आला. पण जे आपल्याला हवं आहे, ते करणे, आणि जे बरोबर आहे, ते करणे ह्या मनाच्या द्वन्द्वात, नेहमीच, मनाने मला बरोबर आहे ते करण्याचा सल्ला दिला. मनाविरुद्ध असले तरी सध्य परिस्थितीत इथे राहणे बरोबर असल्यामुळे, इलाज नाही, म्हणून मी इथे राहते.

इथे सर्व काही रोज सुरळीत पणे सुरु असते, वीज प्रवाह खंडित होत नाही, पाणी जात नाही. हल्ली हल्ली कधीतरी गाड्यांचा गोंधळ असतो, पण साधारण एक वर्षभर आधी पर्यंत तो त्रासही नव्हता. आता गर्दी वाढल्येय, आधी तीही नव्हती. दिलेल्या वेळा माणसं पाळतात. सर्वत्र स्वछता आहे. तरीही मी इथे आनंदात का नाही?

माझ्या मते इथे असणाऱ्या मंडळींच्यातला, भावनांचा आभाव, हे त्याचं मुख्य कारण असावं.

हे विधान मी इथे असणाऱ्या भारतीयांबद्दल करत नाहीये, हे मला विशेषतः नमूद करायचंय. भारतीय मंडळींच्या संगतीत इथेही आनंद मिळतो. पण म्हणजे आनंदी राहायचं असेल तर आपला समुह शोधायला हवा असा त्याचा अर्थ होतो आणि ते मला तितकंसं रुचत नाही.

तर, मी इथे बहुतांश असणाऱ्या इतर जनांच्या विषयी बोलत्येय ..
इथे भरपूर गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये सुद्धा बहुतेक वेळा प्रचंड शांतता असते. कोणी कोणाशी बोलत नाही. इथे लोकांना एकमेकांशी बोलताना, किंवा हसताना किंवा रडताना किंवा भांडताना मी क्वचितच पाहिलंय. माणसं इस्त्री केलेल्या चेहऱ्याने मोबाईल फोन वर काहीतरी करत राहतात.

एकदा माझ्या घरासमोर एका गाडीचा अपघात झाला, गाडीचा मालक, पोलीस व गाडी टो करून नेणारी मंडळी येई पर्यंत, रस्त्यात मोडलेल्या गाडीच्या शेजारी, एकटा उभा होता. मला खाली जाऊन “काही मदत हवी का”? असं विचारावं कि नाही?, हे ठरवायला पांच मिनिटं लागली, कारण, दुसरं कोणीच दिसेना. (भारतात अपघात झाला तर, अपघात झालेली गाडी आणि माणूस, दिसू शकत नाहीत, एवढी माणसं त्याच्या भोवती जमतात). शेवटी खाली गेले आणि विचारलं. त्या माणसाने अर्थातच काही मदत घेतली नाही, हे आहेच.

म्हणजेच थोडक्यात सांगायचं, तर, माझी आणि सिंगापूरची तार काही विशेष जुळलेली नाही.

ह्या पैलतीरावर पोहोचण्याकरता, त्या ऐलतीराला पूर्णपणे सोडायला हवे हे कळत असून सुद्धा वळत मात्र नाही. दरवेळेस मनाला ऐलतीरावरच सोडून मी फक्त शरीराने इथे येते. सहा वर्ष इथे राहिल्यावर सुद्धा,मी रोज मुंबईला जाण्याची वाट बघते. थालीपीठ, दुधातले घावन आणि फोडणीची मिरची, मऊभात तूप आणि मेतकुट, पडवळ डाळींब्या, चिंच गुळाची आमटी हे पदार्थ, वारंवार, मुद्दाम इथे शिजवते. मुंबईला गेल्यावर करायच्या गोष्टींची परत परत यादी करत राहते. तिथे आता किती वाजले असतील ह्याचा हिशोब करत राहते.

हे सगळं वाचून बरेच लोक मला "वेडी आहेस" असं सहज म्हणतील. म्हणतील कशाला? अनेकांनी म्हंटल आहे तोंडावर. पण, आहे हे असं आहे खरं.

मला, मुंबईत न विचारता सुद्धा मदतीला येणारी माणसं आठवतात, शेजाऱ्यांचा मुलगा पास झाल्यावर, स्वतःच्या घरी आनंद साजरा करणारी माणसं आठवतात. "जपून जा हं", “काळजी घे हं”, असं म्हणणारे नातेवाईक आठवतात. सण समारंभ, त्यातल्या गप्पा, मतभेद ह्यांची आठवण येत. "किती राठ झालेत ग केस, ये तेल लावून देते", असं म्हणणाऱ्या आईची आठवण येते. माझ्यासाठी, मला साडी नेसायला मिळावी म्हणून, तीन तास उभं राहून टेलरकडून ब्लाउज शिवून आणणारे सासरे आठवतात. मला खूप आवडतं म्हणून 'मिष्टी दोई', आणून ठेवणाऱ्या सासूबाई आठवतात. “उभ्या उभ्या येऊ नको ग सवडीने ये”, असं म्हणणारी मित्र मंडळी आठवतात.

एखाद्या व्यंग असणाऱ्या मुलावर आईचं जसं जरा जास्त प्रेम असतं ना, तसं अनेक समस्या असणाऱ्या भारत देशावर माझा जरा जास्त जीव आहे. इथल्या यांत्रिक माणसांपेक्षा, तिथले भांडणारे शेजारीच मला जास्त आवडतात. एखादा मनुष्य रस्त्यावर घेरी येऊन पडल्यावर इमरजन्सी नंबर डायल करणाऱ्यांपेक्षा, त्याच्या तोंडावर पाणी मारणारे जास्त आवडतात. दहा वेळा मिटिंगची वेळ फोनवर कनफर्म करणाऱ्यांपेक्षा, अचानक येणारे पाहुणे जास्त आवडतात. माणसातलं माणूसपण खूपसाऱ्या पैशांपेक्षा जास्त गरजेचं वाटतं.

अश्या विचारांच्या माणसाला वेडं नाहीतर दुसरं काय म्हणणार? खरं आहे, ......

असे हे वेडे विचार माझ्या अगदी जीवाभावाचे, म्हणून, त्यांच्या माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये समावेश.

No comments:

Post a Comment