Tuesday, 22 October 2013

Mhadyaa

आमच्या खात्यात महादेव दाभाडे नावाचा कर्मचारी होता. आता तो रीटायर झाला. त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली, त्या गोष्टीला आता साधारण दोन वर्ष झाली असतील . स्वेच्छा निवृत्ती घेण्याकरता जे कारण घडलं, ते मात्र, मोठं खासं होतं.

हा महादेव मुळचा सोलापूर जवळच्या कुठल्या तरी गावचा. अतिशय मुजोर आणि उर्मट, त्याला स्वतः बद्दल , गावातल्या घराबद्दल व गावाबद्दल बढाई मारायला फार आवडायची. तो कोणच्याही गोष्टीवर, “आरं कसलं काय तुमच्या मुंबईत, आमच्या गावाकडे बघ…, असं म्हणून गावाचं पुरण लावायचा. दुसऱ्याची फजिती करायला आणि इतरांवर हसायला त्याला भयंकर आवडायचं, म्हणून बऱ्याच मंडळीना हा महादेव अजिबात आवडायचा नाही. माझा त्याच्याशी फारसा कधी संबंध आला नाही, पण एक सहकर्मचारी म्हणून, मी, तो कधी समोरच आला तर, नमस्कार वगैरे करत असे. ह्या महादेवला त्याचे काही मित्र आणि बरेच इतर ‘म्हाद्या’ म्हणायचे. तर ह्या म्हाद्याची एकदा कशी फजिती झाली, ते ऐका.

महादेव दाभाडेच्या मुलाचं लग्न ठरलं. मुलाकरता त्याच्या गावातल्याच कोणा सधन व्यक्तीची मुलगी बायको म्हणून त्याने निशित केली होती. त्यांच्यात हुंडाबिंडा मागायची पद्धत होती,त्याप्रमाणे त्याने तोही मागितला होता. त्याबद्दलही बढाई मारली होती. मुलीला भरपूर सोनं घालायची मागणीही केली होती. लग्नाकरता खात्यातल्या सर्व मंडळींना निमंत्रण दिलं होतं. एक बसही ठरवली होती मुंबईहून. आमच्या खात्यातून मला वाटतं एक दहा माणसं लग्नाला गेली.

दोन चार दिवसानी लग्नाला गेलेली मंडळी परत कामावर आली. आल्यावर लोकांनी विचारलं, "काय? झालं म्हाद्याच्या मुलाचं लग्न"? तर मंडळी काही सांगायचं सोडून खो खो हसायलाच लागली. आम्हाला काही कळेचना कि असं नक्की काय झालं असावं लग्नात?
थोड्या वेळाने पूर्ण हकीकत कळली आणि आम्हालाही हसायला आल्यावाचून राहिलं नाही, घडली ती हकीकत थोडक्यात अशी.

मुंबईहून वाजत गाजत वऱ्हाड सोलापूरला पोहोचलं. व्याह्यांनी सर्व गोष्टींची अगदी चोख व्यवस्था ठेवली होती. म्हाद्याचा वरपिता असल्यामुळे भलताच मान ठेवण्यात येत होता. जे मागेल ते समोर उभं रहात होतं. त्याबद्दल त्याचं मित्रांमध्ये कितीतरी बढाई मारणं हि जोरदार सुरु होतं.

आमच्या खात्यातली मंडळीना खरं तर, म्हाद्या जरा अतीच करतोय असं अनेक वेळा वाटलं. एक दोघांनी त्याला तसं सांगण्याचाही प्रयत्न केला, पण म्हाद्या एकदम जोरात होता. "आरं, लग्न म्हनजे आसच असतया, पोराचा बाप हाय मी, मान केलाच पाहिजे की ,थोड्या येळानं बघा कशी गम्मत करतोय ते", असं तो त्यांना म्हणाला.
मंडळीना म्हाद्या काहीतरी गडबड करणार ह्याचा अंदाज आला पण बोलून काही उपयोग नाही, हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून मग 'तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असा विचार करून मंडळी शांत बसून राहिली.

थोड्या वेळाने सर्व विधींची सुरुवात करण्याकरता किसनला, म्हणजे म्हाद्याच्या मुलाला, बोलवायला मुलीचे वडील आले, तशी म्हाद्या उभा राहिला आणि म्हणाला, "पाव्हनं तसा काय किसन यायचा न्हाई, आमच्या किसनला मानाची म्हुन बुलेट गाडी पाहिजे. गाडी आना, मग लगेच सुरु करू कि लग्नाचे इधी."

म्हाद्याचे व्याही सटपटलेच एकदम, त्यांना काय बोलावं कळेना. एकदम कुठून आणायची बुलेट?मग ते आपल्या मुलांशी आणि इतर मंडळींशी बोलायला आत गेले. इकडे म्हाद्याला त्याचे नातेवाईक, बायको, मुलगा, मुलगी आमच्या खात्यातली मंडळी सगळे असं न करण्याबद्दल समजवायला लागले. म्हाद्या काही ऐकेना.

इतक्यात मुलीचे वडील बाहेर येउन म्हणाले, पाव्ह्ने दिली आम्ही जावयाला बुलेट, उद्या सकाळीच जाऊन विकत घेऊन देतो. इतकं समदं केलं, एक मोटारसायकलची काय मोठी गोष्ट? सगळे लोक अचंबित झाले. पण म्हाद्या आता खूपच जोरात होता, तो म्हणाला "न्हाई आत्ताच पाहिजे गाडी, त्याशिवाय न्हाई उठाचा किसन."

आता सर्वच लोकांना, अगदी म्हाद्याकडच्याना सुद्धा त्याचा राग येऊ लागला, मुलीकडच्याना तर काय करावे हेच समजेनासं झालं. थोडक्यात मस्करीचं आता कुस्करीत रुपांतर होऊ लागलं.

इतक्यात एक अगदी तरुण मुलगा स्टेज वर उभा राहून जोरात म्हणाला, “काका तुम्ही कुसीचं (म्हद्याची होणारी सून कुसुम) लग्न नका लावू ह्यांच्या मुलाशी, तिला खूप त्रास देतील हे लोक नंतर. कुसीला मान्य असेल तर मी आत्ता ह्याच मांडवात तिच्याशी लग्न लावायला तयार आहे, खूप सुखी ठेवीन तिला”.
आता सगळे चूपचाप उभे, इतक्यात कुसुम बाहेर येउन म्हणाली,"दादा, मला ह्यांच्याशीच लग्न करायचं आहे, माझ्या दादाचा एवढा अपमान करणाऱ्याच्या घरी मी आजाबात जानार न्हाई".

आता सटपटायची पाळी म्हाद्या व किसनची होती. म्हाद्याची बायको तर रडायलाच लागली. म्हाद्या नरम येउन, “मी मस्करी करत होतो” वगैरे गुळमुळीत बोलायला लागला. किसन व त्याची आई म्हद्याशी भांडायला लागले. व्याही मुलीला समजवायला लागले पण, कुसुम अडून बसली.

बऱ्याच चर्चेनंतर शेवटी कुसुम किसनशी लग्न न करता मारुतीशीच (तो दुसरा मुलगा) लग्न करणार असा निर्णय घेण्यात आला. मारुतीचे वडील सधन शेतकरी होते. मारुती B.Sc.(agri) झालेला होता.

आता किसन रडायला लागला आणि, किसनची आई म्हाद्याला अक्षरशः शिव्या घालु लागली. म्हाद्याची पार बिकट अवस्था झाली. म्हाद्या आता व्याह्यांच्या पाया पडून किसनशी कुसुमचं लग्न लाऊन देण्याची विनंती करू लागला.

व्याही बिचारे संकटात पडले, मुलगी अजिबात ऐकेना. शेवटी, "झाला परकार लई वाईट झाला पन पोरगी ऐकत न्हाई तर काय करू? ह्येच नशीब असनार, मला माफ करा, पन हे लगीन आता व्ह्याचं न्हाई. म्हाज्या लेकीच्या लग्नाचं जेवान मात्र तुमी करून जायला पायजे", असं म्हणून निघून गेले.

म्हाद्या आणि मंडळी कसली जेवायला थांबतात, तेही सगळे निघाले. इतक्यात एक दहा बारा वर्षाचा मुलगा म्हाद्या पुढे येउन, मोटर सायकलला धरतात तसे हात पुढे करून, म्हणाला, “लई भारी मजा झाली”, “काय पाव्हणं”?, “भिर्र भिर्र भिर्र” … आणि जमलेले लोक जोरात हसू लागले.

म्हाद्या खेट्राने मारल्यासारखे तोंड घेऊन गुपचूप बस मध्ये जाऊन बसला. बाकी सर्व मंडळीही बस मध्ये चढली आणि बस म्हद्याच्या गावी निघाली. बोलण्यासारखं आता काही उरलंच नव्हतं. आमच्या कार्यालययातली मंडळी संध्याकाळच्या गाडीने मुंबईला परतली.
आल्यावर त्यानी आम्हाला हि सगळी कहाणी ऐकवली. ऐकून वाईट वाटलं, पण "अती तिथे माती", हे जर म्हाद्याने लक्षात ठेवलं असतं तर त्याची अशी फजिती व्हायची वेळ आली नसती असं वाटून हसायलाही आलं.

साधारण महिन्याभराने मुलाचं, दुसऱ्याच कुठल्यातरी मुलीशी लग्न लावून म्हाद्या मुंबईला परतला.

नोकरीवर रुजू झाल्यावरही अगदी नरम होता, फार काही बोलत नव्हता कुणाशी. पण कोणीतरी त्याला विचारलच, "काय म्हाद्या? नंतर काय झालं?, “ते पोरगं तर सालं जाम हलकट होतं. तुझ्यासमोर भिर्र भिर्र करून काय नाचलं, शीs तुझा खूपच वाईट अपमान झाला गड्या.

ऐकून म्हाद्याचं तोंड एवढंसं झालं, तो काही न बोलताच तिथून उठून गेला. म्हद्याला मग ती मानहानी सहन झाली नाही आणि काहीच दिवसात तो स्वेच्छा निवृत्ती घेऊन कायमचा गावाला गेला.

तुटे पर्यंत ताणणे म्हणजे काय? ह्याचं, म्हाद्याच्या कहाणीपेक्षा अधिक चांगलं उदाहरण, मी तरी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही, असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही.

(कहाणी खरी, सोर्स सिक्रेट… )

No comments:

Post a Comment