Tuesday, 22 October 2013

Lek chalali sasarla..

श्री जयेश मौजे, माझे फेसबुक वरचे एक मित्र, ह्यांनी मला मुलगी लग्नानंतर सासरी का जात असावी? ही प्रथा कशी सुरु झाली असावी? अश्या विषयावर काहीतरी लिहावे, अशी विनंती केली.

खरं सांगायचं, तर प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा ह्या विषयात, माझं ज्ञान अगदी यथातथाच आहे. शाळेत असताना हिस्ट्री हा माझा सर्वात नावडता विषय होता. दुसरं म्हणजे, काल जयेश ह्यांनी विचारे पर्यंत मुलगी सगळ्यांना सोडून सासरी का जात असावी? हा प्रश्न मला कधीही पडला नव्हता. ती फारच नैसर्गिक अशी गोष्ट आहे असं आधीपासूनच मला मान्य होतं.त्यांनी मला विचारल्यावर मात्र माझ्याही मनात असं का? असा विचार आला.

मग इंटरनेट वर थोडं फार वाचन केलं, फोन वर मोठ्या माणसांना विचारलं, कुठूनही फारशी काही माहिती मिळाली नाही. तरीही तो विचार काही मनातून गेला नाही, आणि मग, मी माझ्यापुरतं मला पटणारं उत्तर शोधलं. तेच इथे लिहित्येय. ते बरोबरच असेल असंही नाही, पण असूही शकेल. जाणकारांनी त्याच्यावर आपलं मत आवश्य द्यावं, आणि असलेली माहितीही द्यावी.

अगदी सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला, म्हणजे अगदी मनुष्याला विस्तवाचा सुद्धा शोध लागला नव्हता तेव्हाचा, तर तेव्हा, काही स्त्री पुरुष व मुले समूहाने अन्नाच्या शोधत फिरत असत. गुहांमध्ये किंवा झाडावर राहत असत. तेव्हा, नक्कीच लग्न वगैरे काही अस्तित्वात नव्हते. तेव्हा त्यांना फक्त शरीर जगवण्यासाठी अन्न शोधणे, श्वापदांपासून रक्षण करणे, व मुळातच, स्त्री आणि पुरुषाचं अस्तित्व ज्याकरता निर्माण झालं ते, म्हणजेच प्रजनन करणे, इतकेच माहित होते. सहजीवन मात्र तेव्हाही होते.

नंतर आगीचा शोध लागल्यावर, मनुष्य पाण्याच्या जवळ वस्ती करायला लागला आणि शेती करू लागला. तेव्हाही लग्न संस्था अस्तित्वात होती किंवा नाही ह्याब्बदल नक्की माहिती नाही. पुरुष एका पेक्षा जास्त स्त्रियांशी संग करत असल्याचे उल्लेख कुठे कुठे आढळले. स्त्रिया मुलांचे संगोपन व घराची देखरेख करत, असेही समजते. म्हणजेच तेव्हाही स्त्री पुरुष एकत्र आयुष्य कंठत होते असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही.

काही भटक्या जमातीं मध्ये, स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाला, आपल्या झोपडीत राहण्याची परवानगी देत असल्याचेही संदर्भ वाचनात आले. ह्या झोपडी मध्ये इतरांना जाण्यास मज्जाव असे. ह्यावरून स्त्रियांना आपल्या जोडीदाराची निवड करण्याची मुभा तेव्हाही होती, हे लक्षात येतं .

पुढे इतिहासात गांधर्व विवाहामध्ये, स्त्री पुरुष, एकमेकांची स्वतः निवड करून एकत्र राहण्याचा निर्णय, दुसऱ्या कोणाच्याही उपस्थिती शिवाय घेत असत. महाभारतात, शांतनू राजाने गंगेशी असा विवाह करून तिला आपल्या राज्यात नेल्याचा दाखला आहे.

पुढे त्याच महाभारतात, स्वतःच्या विद्येचे बळ दाखवून, किंवा स्वतःचे सामर्थ्य दाखवून कन्येला जिंकून, स्वतःच्या राज्यात नेल्याचेही दाखले आहेत. स्वयंवरात, कन्या अश्याच सामर्थ्यवान पुरुषाला वरण्यासाठी आतुर असत, हे ही समजते.

ह्या काळा मधे विवाह ही गोष्ट अस्तित्वात असल्याची आणि विवाह झाल्यानंतर पुरुषाबरोबर जाण्याची प्रथा आपल्याला सहज दिसते. पण पुरुषाला एका पेक्षा जास्त बायका पत्नी म्हणून स्वीकारता यायच्या असंही सहज लक्षात येतं.

नंतर रामायणात , रामाने एक पत्नीव्रत आचरल्याचं आपल्याला सर्वांनाच माहित आहे. तेव्हाही सीता त्याच्याबरोबर लग्न करून येते, इतकच नाही तर तो वनवासात निघाल्यावरही त्याची साथ सोडत नाही, हे हि आपण जाणतोच.

पुढे शास्त्राचा विचार जर करायला गेलं तर, आपल्या हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस, पिता कन्यादान करतो, म्हणजेच, एका योग्य पुरुषाला, आपली कन्या देऊन टाकतो, आणि त्याला विनंती करतो, कि ह्या माझ्या कन्येचा तू पुढील आयुष्यभर सांभाळ कर आणि तुझ्या समान दर्जाची वागणूक दे. आता कन्येचं दान केल्यावर, तो कन्येला, ज्याला दान दिलं त्याच्या सुपूर्द करतो म्हणजे पर्यायाने मुलीला नवऱ्याबरोबर नवऱ्याच्या घरी, म्हणजे सासरी जाण्याची, अनुमती देतो.

आता ह्याच गोष्टीचा थोड्याश्या वेगळ्या कोनातून विचार केला तर, आपण लहानपणी शाळेत जातो, दहावी पर्यंत शालेय शिक्षण घेतो. त्यानंतर पुढील शिक्षणाकरता, महाविद्यालयात प्रवेश करतो, तेव्हा आपण शाळा सोडतो, आणखी पुढे शिकायला गेल्यावर महाविद्यालय ही सोडतो. थोडक्यात सांगायचं, तर आपण आपल्या प्रगती साठी आपल्या जीवनात अनेक वेगवेगळे बदल घडवून आणतो. तसेच लग्न हा जीवनात घडवलेला एक सकारात्मक बदल. हा बदल घडवत असताना आपण जीवनाच्या प्रवासात कोणाची तरी साथ मागतो आणि कोणाला तरी साथ देतो, ती साथ देण्याकरता, सहजीवनासाठी मुलगी मुलाच्या घरी जाते.

आता मूळ मुद्दा मुलगीच का जाते? मुलगा का नाही जात मुलीच्या घरी?
ह्याचं उत्तर द्यायचं झालं तर, प्राचीन काळा पासून स्त्री आणि पुरुषाला संसाररथाच्या दोन चाकांची उपमा देण्यात आली आहे. ज्यामध्ये अर्थार्जनाची जबाबदारी पुरुषाची मानली गेली आहे आणि उपलब्ध साधनांचा आणि संपत्तीचा विनियोग करण्याची जबाबदारी ही स्त्रीची, त्यामुळे कुठेतरी अन्नदाता म्हणून पुरुषाला हा मान देण्यात आला असावा.

हे सर्व तात्विक दृष्ट्या योग्य वाटावं असं स्पष्टीकरण, पण, भावनिक विचार जर करायचा झाला, तर सासरी जाणे हा निर्णय, पूर्णतः स्त्रीचा निर्णय असतो. त्याकरता प्रथा कारणीभूत नाही. वरील उदाहरणांवरून हे अगदी सहज दिसून येतं की स्त्रीला, तिने निवडलेल्या पुरुषाबरोबर जीवन व्यतीत करावेसे वाटते. सासरी जाताना तिला माहेरच्या माणसाना सोडून जाण्याचे क्षणिक दुखः जरी होत असले तरी आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर सहजीवनाच्या कल्पनेने ती आनंदी असते.

लग्नानंतर पतीच्या रूपाने स्त्रीला अत्यंत जवळचा, जिव्हाळ्याचा असा मित्र आयुष्यभरासाठी लाभतो. सहवासाने एकमेकांवरील प्रेम वाढतं, अधिकार प्रस्थापित होतो. असं हक्काचं कोणीतरी असणं, हे स्त्रीला काय, किंवा पुरुषाला काय, आवडतंच. आणी म्हणूनच बाकी सगळ्यांना पाठी सोडून मुलगी आनंदाने पतीच्या घरी राहायला जाते.

चांदनी ह्या चित्रपटात श्रीदेवी एका गाण्यात, इतर अनेक माणसांचे निरोप आल्यावर सासरी न जाण्याकरता, वेगवेगळी कारणं देते, पण आपल्या पतीचा निरोप आल्यावर तिला कुठलेही कारण सुचत नाही, व ती घाईघाईने सासरी जायला निघते.

तसेच इतर मुलीनाही आपला पती हा इतर सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाची व्यक्ती वाटत असल्यामुळे ती त्याच्याबरोबर राहणे पसंत करते,आणि म्हणूनच एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात नवीन स्वप्न घेऊन नवऱ्याबरोबर सासरी जाते, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
 

No comments:

Post a Comment