ही आमच्या तात्यांच्या लहानपणीची एक आठवण, जशीच्या तशी त्यांच्या शब्दात.
आमच्या आईला दुधाचं भारी कौतुक. ते तापवणे, विरजण लावणे, ताक करणे, साजूक तूप कढवणे, ते नीट साठवणे, आधी ठेवलेलं तूप नंतर ठेवलेल्याच्या आधी वापरणे, थोडं तूप जखमेवर लावण्याकरता खूप जुने करणे, अश्या गोष्टी करायला, तिला मनापासून आवडायचं. हे सर्व करण्यात, तिचा बहुतेकसा सकाळचा वेळ, जात असे. दुसरे एक खूप वेळ घेऊन करण्याचे तिचे काम म्हणजे, न्हाणीघर (बाथरूम) स्वच्छ करण्याचे. ती एकदा न्हाणीघरात गेली कि साधारण स्वच्छता व तिची आंघोळ, ह्याकरता, दोन तास ते इतरांसाठी बंद होई.
स्वयंपाक वगैरे लवकर होण्याचा प्रश्न अर्थातच निकालात निघालेला असे. कित्येक वेळेला त्याच्यामुळे दादांना कोर्टात जायला भरपूर उशीर होत असे. अश्यावेळेस ते सात्विक संतापाने आईला,"तुझं ते दुssध, तुझं ते तूssप आणि तुझं ते मूssत", “उच्छाद आहे नुसता”. “जेवायला वाढणार आहेस का आजच”? असं म्हणत असत.
आम्ही मुलंही कैक वेळेला सकाळच्या चहावर, दहाच्या शाळेला जात असू, म्हणजेच आमच्या पोटात, दुपारी दोन वाजता आल्यावर काहीतरी पडत असे. ह्यावर दादांनी, "अगss, तुझे उरकत नाहीss, तर त्यांना दुध प्यायला देत जाss, शाळेत जातानाss", असं आईला अनेक वेळा सुचवलं.
मला, वसंताला आणि अरुणला आम्हाला दुध प्यायला आवडायचं. मला वाटतं, आई देत नसल्यामुळे कदाचित त्याचं जास्त अप्रूप वाटत असावं. आम्ही सगळी मिळून सहा भावंडं, चौघे भाऊ व दोन बहिणी. इतक्या मुलांना दुध प्यायला दिलं, तर मग तूप कुठून कढवणार? ह्या विचाराने आईचा जीव बहुदा घाबरा झाला असावा. साहजिकच तिने दादांच्या सल्ल्याला, कानातून शिरू सुद्धा, दिलं नसावं.
एक दिवशी दुपारी, शाळेतून घरी आलो, आई आमचे जेवण झाकून ठेऊन माजघरात झोपली होती. ती रोजच स्वतःचे जेवण झाल्यावर आमचे जेवण झाकून ठेऊन, दुपारी झोपत असे. झाकणं उघडून बघितलं, तर पावट्याची उसळ, कढी,आणि भात असं सगळं थंडगार जेवण दिसलं. मला ते जेवावंसच वाटेना.
भूक तर जाम लागलेली. मग मनात विचार आला, आज दुधच प्यावं. पण कसं? हा प्रश्न होताच, कारण दुध, दही वगैरे सगळं आई सोवळंओवळं पाळण्याच्या नादात फडताळात अगदी वर ठेवत असे. त्यावेळी माझं वय काहीतरी दहा-अकरा वर्षाचं होतं, वसंता माझ्याहून थोडा मोठा, अरुण फारच लहान, त्यामुळे, दुधापर्यंत कोणाचाच हात पोचण्याचा प्रश्न नव्हता.
पण कसंही करून आज दुध प्यायचंच असं ठरवलं. वसंताला आणि अरुणलाही माझ्या बेतात सामील करून घेतलं. मग अरुणला माजघराच्या दारात उभं राहून आईवर लक्ष ठेवायला सांगितलं, आणि वसंताला खाली गुढघ्यावर बसवून त्याच्या खांद्यावर चढून, फडताळातून दुधाचं पातेलं काढण्याचा प्रयत्न करू लागलो. कुठे काय चुकलं समजलं नाही, पण ते पूर्ण फडताळं आतल्या सगळ्या सामानासकट, भिंतीतले मारलेले त्याचे खिळे उचकटल्यामुळे, धडाssमकन, जमिनीवर कोसळलं.
जमिनीवरचं दृश्य फारच वाईट होतं. दुध सगळं सांडलं होतं, दह्याची बरणी; फुटली नव्हती, पण गर्रकन फिरून, घरंगळत जाता जाता दह्याची रेघ ओढत कोपऱ्यात गेली होती, तुपाची लोटी; उपडी पडली होती, थोडा शिळा भात; तिथेच शेजारी सांडला होता, लशणीचं तिखट; भातावर पडलं होतं आणि फोडणीची मिरची असलेली बरणी; फडताळातच अडकून सांडली होती.
आम्ही जाम घाबरलो आणि मार खाण्यासाठी पाठीना तयार करत ,पडवीतल्या भिंतीच्या मागे लपून उभे राहिलो.
आई माजघरातच जोरात, “कोण आहे? “काय झालं”? असं ओरडली.
आता ती बाहेर येउन आपल्याला चांगलीच सडकवणार ह्याची तयारीच करत होतो, इतक्यात, आमचा लाल्या बोका, आमच्या मदतीला देवासारखा धाऊन आला. तो स्वयंपाकघराच्या खिडकीतून उडी मारून आत आला आणि सांडलेलं दुध चाटू लागला.
तेवढ्यात आई तिथे आली, समोरच्या दृष्यावरून तिची समजूत अशी झाली कि लाल्याने उडी मारून फडताळं पाडलं. ती सगळी नासधूस बघून तिच्या जीवाचा संताप संताप झाला, ती जोरात ओरडली, "रांडोळा बोका, ह्याचं एकदा कंबरड मोडलं पाहिजे", आणि आलेला विचार आमलात आणायला तिने लाटणं हातात घेऊन लाल्याची पाकट काढली, लाटण्याचा एक तडाखा मिळताच लाल्या खिडकीतून पटकन उडी मारून पळून गेला.
आम्ही मात्र जिवावरच्या प्रसंगातून वाचलो. थोड्यावेळाने साळसूदपणे येउन, "हे काय झालं आई?", असं आईला विचारून, सगळं आवरायला तिची थोडी मदतही केली.
थोडक्यात म्हणजे “काळ आला होता पण वेळ आली नव्हती”,अशी आमची परिस्थिती. मग विचार केला, हे काही खरं नाही, आईनीच आपल्याला दुध दिलं पाहिजे, असं काहीतरी करायला हवं.
मग थोडे दिवस कामांच्या क्रमावर लक्ष ठेवलं, आणि एक दिवस, आईला संध्याकाळी म्हंटलं, "तू आम्हाला दुध देत नाहीस, मी तुला शाप देतो, कि तुझं दुध नासेल".
आई त्यावर “बरं हं, नासुदे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही”, असं म्हणाली. त्यादिवशी मी स्वयंपाकघरावर लक्षच ठेऊन होतो. संध्याकाळी गडी दुध घेऊन आला, आईने दुध तापवून तिथेच चुली शेजारी ठेवलं आणि वाळलेले कपडे काढून आणयला, मागच्या अंगणात गेली. मी लगेच स्वयंपाकघरात येउन दोन मुठी खडे मीठ, तापलेल्या दुधात टाकलं, आणि खेळायला निघून गेलो. रात्री नवीनच बसवलेल्या फडताळात आई दुधाचं पातेलं ठेवायला गेली तर तिला दुध नासलेलं दिसलं. मला मात्र ती काही बोलली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी, तिने आम्हा मुलांना, एक एक छोटं भांड भरून दुध दिल. मला भांड देताना म्हणली, "दत्त्या, मेल्या तुझी बत्तीशी वठली काल, माझं सगळं दुध नासलं”. आजपासून तुम्हाला सगळ्यांना दुध द्यायचं असं ठरवलं आहे, उगीच, देवाचाकोप होवाला नको", मी चूपचाप भांडं हातात घेऊन दुध प्यायला लागलो. वसंता माझ्याकडे बघून हळूच हसला.
त्यानंतर आम्हाला रोज एक भांडं दुध मिळायला लागलं.
तर, अशी ही भांडंभर दुधाची, साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

No comments:
Post a Comment