Monday, 21 October 2013

Satyanarayan...

आमच्या कल्याणच्या घरी दरवर्षी श्रावणात सत्यनारायण असायचा . बहुतेक वेळेला शनिवारी किंवा १५ ऑगस्ट ला असायचा, कारण त्या दिवशी, आईला फक्त सकाळी शाळेत जायचं असायचं. आमच्या घरी, आमच्याच कशाला, आमच्या सबंध भट कुटुंबात कोणाकडेही, कुठलाही कार्यक्रम, माझ्या आईच्या सोयीचा विचार करून केला जायचा.त्याला एक महत्वाचे कारण होतं. त्या काळी आमच्या भट कुटुंबात असलेल्या बायकांमधे माझी आई एकटीच नोकरी करायची, आणी कोणच्याही समारंभाच्या स्वयंपाकाची जबाबदारी नेहमी तीच घेत असे. ती पन्नास शंभर माणसांचा स्वयंपाक अगदी सहजपणे करायची.

तरs , सत्यनारायण असायचा, आणि त्याला आमचे सगळे नातेवाईक, शेजारी पाजारी, तात्यांचे असंख्य मित्र सगळे यायचे. ह्यात नातेवाईक जेवायला असायचे व बाकीचे सर्व तीर्थ प्रसादाला. बहुतेक वेळेला तीर्थ प्रसादाला येणाऱ्यान करता आई एखादा पदार्थ व मसाला दुध करत असे आणि जेवणात तिची स्पेशालिटी असलेल्या, पडवळ डाळींब्या, बाकी इतर पदार्थ बदलले तरी पडवळ डाळींब्यांची भाजी मात्र दरवर्षी नियमित पणे असायची.

आमच्या तात्यांना, त्या सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा आलेल्या मंडळींच्यात जास्त इन्टरेस्ट असायचा. सत्यनारायण कधी करायचा हे एकदा ठरलं, कि ते कैक वेळेला माणसं किती येणार, ह्याची यादी करायचे, पहिल्यांदी तोंडीच मोजायला सुरुवात करायचे व मग आवाक्याच्या बाहेर जायला लागलं कि म्हणायचे, 'तसं नको, आण,एक कागद पेन आण' मग त्याच्यावर यादी करायचे. ह्यानंतर मग ते काहीच करायचे नाहीत. सगळं माझी आई सांभाळायची. पूजेला सुद्धा शक्यतो ते स्वतः बसायचे नाहीत, माझ्या काकांना वगैरे बसवायचे, नाहीच जमलं, तर स्वतः बसायचे.

पूजा सांगायला आमच्या कडे अगदी सुरुवातीला फणसे नावाचे गुरुजी यायचे, त्यांच्या बद्दल मला फारसं काही आठवत नाही. मला नीट आठवतात ते वाडेकर सर, आमच्या आईच्या शाळेत ते संस्कृत शिकवायचे, ते मुळचे त्रंबकेश्वरचे. त्रंबकेश्वरच्या देवळात त्यांचे वडील बंधू अजूनही याद्निकी करतात.

तात्या पूजेला बसले म्हणजे अर्धी अधिक पूजा वाडेकर सरानाच करावी लागायची. कथा बिथा ऐकायला तर बहुतेक वेळा तात्या बसायचेच नाहीत, आम्हाला मुलांना बसवायचे, वर म्हणायचे “ऐका ऐका कथा, नाहीतर सत्यनारायणाचं पुण्य नाही मिळायचं”. वाडेकर सरांना म्हणायचे, “कथा मराठीत मुळीच वाचू नका… संस्कृत मध्ये म्हणा भराभर, तुम्हाला पाठ येते ना मग त्याचा फायदा करून घेऊया”.

एकदा पूजेच्या वेळी अशी एक गम्मत झाली कि त्याची आठवण,आजून सुद्धा सत्यनारायण असला,कि आमच्या घरी निघते. तात्या पूजेला बसले होते व पूजा सुरु असल्यामुळे बाकी सर्व शांत होतं, आमचे नाना काका खिडकी जवळच्या पलंगावर बसले होते, बसल्या बसल्या त्यांना यायला लागली झोप, म्हणून ते तिथेच आडवे झाले व त्यांना झोप लागली.

आतल्या खोलीत बायकांचा स्वयंपाक चालला होता. तिथे एक मांजर कशात तरी तोंड घालायला गेले म्हणून त्याला कोणीतरी फटका मारून पळवले, ते मांजर जोरात बाहेरच्या खोलीत पळत आले व नाना काकांच्या पोटावर उडी मारून खिडकीतून बाहेर पळून गेले. नाना काका अचानक पणे जोरात ओयs … हाs … हाs …. असं ओरडत उठले.

ते झोपलेले असल्या मुळे त्यांना काय नक्की झालं हे कळेना… त्यामुळे ते कोण? कोण? कोण आहे? असं काहीतरी ओरडत होते. आम्ही सर्व मंडळींनी काय झाले हे पहिले होते त्यामुळे हसून हसून आमची मुरकुंडी वळायची वेळ आली.

अती प्रचंड हसायला येत असल्यामुळे नक्की काय घडलं ते आम्हाला नाना काकाना सांगताही येईना . ते बिचारे प्रश्नार्थक नजरेने,गोंधळलेल्या अवस्थेत आमच्याकडे पहात होते. इतक्यात तात्या त्यांना म्हणाले , "नाना पूजा सुरु असताना झोपलास म्हणून सत्यनाराययाणाने उडी मारली तुझ्या पोटावर". हे ऐकून एक नवीन हास्याची लाट उसळली. माझ्या आईने मग खरा प्रकार काकाना सांगितला, तशी ते सात्विक संतापाने म्हणाले, "साली मांजर, सापडली की चापटवली पाहिजे ". हसून हसून गडबडा जमिनीवर लोळायचं तेवढं शिल्लक होतं.

राग ओसरल्यावर नाना काकाना पण हसायला यायला लागलं. एवढा वेळ पूजा पॉज मोड मधे होती ती पुढे सुरु झाली. तात्यांच हसणं मात्र सुरूच राहिलं .

त्यादिवशीच्या पूजेचा हा मग स्पेशल विषय ठरला व सगळ्यांच्या ओठावर हसू खेळवून गेला. आत्ता सुद्धा हे लिहिताना तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढे जसाचा तसा उभा राहिला. किती सुंदर होते ते दिवस, एकत्र येणं, सुखं दुखं एकत्र साजरी करणं, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणं..

आता कल्याणचं घर नाही, तात्या नाहीत, आणि नाना काकाही नाहीत पण आठवणी मात्र लक्ख, जश्या च्या तश्या आहेत.

No comments:

Post a Comment