Tuesday, 22 October 2013

Satalkarancha Popat

काल शेफाली वैद्य ह्यांनी, त्यांच्या मुलानी उच्चारलेलं एक वाक्य फेसबुक वर पोस्ट केलं होतं, “Mamma, animals are good people” असं ते वाक्य, आणि त्यावर त्यांनी स्वतः कॉमेंट मधे, Well, a lot of people are bad animals” अशी प्रतिक्रिया दिली होती.

दोन्ही वाक्य थेट मनाला भिडली. हल्ली असं दृश्य पाहायला मिळतंय खरं. माणसं भावनाशून्य होत असलेली दिसतायत. बलात्कारांच्या बातम्यांनी थरकाप उडतोय. माणूस जनावरा सारखं वागताना दिसतोय आणि त्याच्या अनेक चुकीच्या कृत्यांमुळे, त्या बिचाऱ्या कोणाच्या वाट्याला उगाच न जाणाऱ्या, प्राण्यांचं जगणं मात्र मुश्किल झालंय.

पण माझा लेखनाचा विषय हा नाही. कारण, हा कोळसा आहे, जितका उगाळावा तितका काळाच. मला माझ्या लेखनाने, माझ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर, काळजीचे आणि दुख्खी भाव उमटवण्यापेक्षा, स्मितरेषा उमटवायला जास्त बरं वाटतं.

तर आजची पोस्ट एका good people animal, aani एका bad animal man ची.

आजच्या आपल्या कहाणीचा हिरो आहे एक पोपट. आणि ते जनावरा सारखे वागणारे वाईट लोक, म्हणजे व्हिलन सारखे वागणारे आहे, साताळकर कुटुंब.

मी बरीच लहान असताना तात्यांनी सांगितलेली ही हकीकत.
तात्या साधारण सतरा अठरा वर्षाचे असताना त्यांच्या काकांनी त्यांना ठाण्याला आणलं. त्याआधी ते दापोलीला राहायचे. नोकरी मिळून स्थिरस्थावर होई पर्यंत, तात्या, काकांच्या घरी ब्राम्हण सोसायटीत राहायचे. तिथे घडलेली ही गोष्ट.

ठाण्याला आल्यावर तात्यांची एका नव्या जीवनाशी ओळख झाली. मुंबईच्या लहान जागा, प्रचंड गर्दी ह्यांनी सुरुवातीला ते अगदी भांबावून गेले. नंतर हळू हळू सरावाने त्यांना मुंबईत गम्मत वाटू लागली. त्यांना ठाण्याला खूप चांगले, जीवाभावाचे मित्र मिळाले. त्यांच्या दोन अतिशय जवळच्या मित्रांची नावं होती अनंत आणि वसंत. हे दोघेही तेव्हा ब्राम्हण सोसायटीत, त्यांच्या शेजारच्या घरात राहायचे.

घडलेली हकीकत त्यांना नोकरी लागायच्या आधीची. त्यावेळी नोकरी मिळालेली नसल्यामुळे तात्या बराच वेळ घरात असत. त्यातला बराच वेळ, ते मित्रांबरोबर घालवत. ह्याच त्यांच्या मित्रांनी एकदा बोलता बोलता साताळकरांचा विषय काढला व त्यांच्या मुळे होत असलेल्या उपद्रवाबद्दल ते बोलू लागले.

ते राहत असलेल्या मजल्यावरच साताळकर कुटुंबही राहात असे. ह्या साताळकरांनी एक पोपट पाळला होता. त्या पोपटा जवळ कोणीही गेलेलं त्यांना अजिबात आवडत नसे.

पोपट पाळला तर होता, पण त्या पोपटाची, कुठल्याही प्रकारची काळजी मात्र ते घेत नसत. त्याचा पिंजरा दिवसरात्र बाहेच्या Gallery मध्ये टांगलेला असे. तो स्वच्छ करण्याचे कष्ट साताळकर घेत नसल्यामुळे, पिंजरा व पोपट दोघेही घाण झालेले असत. त्यातून, येणाऱ्याजाणाऱ्याना अतिशय घाण वास येत असे. अनेक वेळा इतरांनी तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नव्हता.

ते कधीही पोपटाला कच्ची डाळ, मिरची, पेरू वगैरे देत नसत. त्यांच्या पोपटाला रोज साताळकर काकू आमटी आणि पोळी खायला देत.पोपट बिचारा, अगदीच फार भूक लागली, कि ती आमटी पोळी खात असे.
दुपारच्या वेळेला तो पोपट प्रचंड कर्कश्य असा ओरडू लागे, त्यालाही एक कारण होतं, दुपारी Galleryत उन येत असल्यामुळे त्या पोपटाचा पिंजरा खूप तापे व त्याला चटके बसत, म्हणून बिचारा आकांत करत असे.

साताळकरांवर मात्र ह्याचा काही परिणाम होत नसे. बिल्डिंग मधली बाकी बिऱ्हाडंही ह्या सगळ्याला अतिशय कंटाळली होती.

मग बिल्डिंग मधल्या मुलांनी, ह्या त्रासाचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे, असं ठरवलं. अतिशय खोडकर स्वभाव, आणि आचरट उद्योग करण्याची सवय, पहिल्यापासून असल्यमुळे, म्होरक्या होण्याचा मान अर्थातच आमच्या तात्यांनी मिळवला आणि पोपटाला कष्ट मुक्त बनवण्याची एक योजनाच बनवली.

आधी त्यांनी साताळकरांकडे जाऊन, त्यांच्याशी प्रेमाने बोलून ,पोपटाचा पिंजरा साफ करून दिला. साताळकरांना आधी संशय आला पण नंतर ते बरेच खुश झाले व सगळ्या ह्या तरुण मुलांना पोपटाच्या पिंजऱ्याजवळ गेल्यावरही ओरडेनासे झाले. मुलं मग कधी पोपटाला पेरू, कधी मिरची बिरची देऊ लागली. आता साताळकर ह्या सगळ्या मुलांशी फार चांगले वागू लागले, त्यांना मुलांबद्दल विश्वास वाटू लागला आणि त्यांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष ठेवणे बंद केले.

थोडे दिवस असे गेल्यावर योजनेचं मुख्य उद्दिष्ट साध्य करण्याचा दिवस उजाडला. दुपारच्या वेळेस साताळकरांच्या घरात सगळे जरा वामकुक्षी घेत असताना तात्यांनी वसंतकाकांना त्यांच्या घरावर लक्ष्य ठेवायला सांगून अलगद पिंजऱ्याचं दार उघडलं. तो पोपट इतका वेडा कि दार उघडूनही, बाहेर उडेचना!

आता मोठी पंचाईत झाली, आवाज केला तर कोणीतरी उठायची भीती. मग अनंताकाकांनी एक फुट पट्टी आणली व त्या पोपटाला त्या पट्टीने ढोसलं, तशी तो पोपट इकडे तिकडे करू लागला व एकदाचा पिंजऱ्याच्या बाहेर पडला. बाहेर पडल्यावरही मिनिटभर त्याला उडता येईना, पण मग तो उडाला व थोड्या दूर असलेल्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला.
हे सगळं समोर राहणाऱ्या जोशी काकुनी पाहिलं, मुलांनी त्यांच्याकडे पाहून हात जोडले, तशी त्या फक्त हलकेच हसल्या आणि आत निघून गेल्या.

मग पिंजऱ्याचं दार हलक्या हाताने बंद करून तात्या व त्यांचे मित्र गुपचूप खाली उतरून सिनेमा पाहायला निघून गेले.

संध्याकाळी ते परत आले तेव्हा मजल्यावर जोरदार गोंधळ सुरु होता. आल्याबरोबर साताळकर आजी म्हणाल्या, "दत्ता आमचं जनावर कुणीतरी सोडलं रे, तुमच्या घरी गेले होते तुला पाहायला, तर भट वाहिनी म्हणाल्या, तू बाहेर गेलायस म्हणून, कसं रे परत आणायचं जनावर?"नंतर आजीच तात्यांना दुपारची कहाणी सांगू लागल्या, "अरे जरा डोळा लागला”. “थोड्या वेळाने आवाज येईना, म्हणून बाहेर गेले तर जनावर पिंजऱ्यात नाही, राधाला( सौ साताळकर) जोरात हाक मारली आणि सांगितलं कोणीतरी जनावर सोडलन." "जनावर कोणी सोडलं असेल रे दत्ता?", “मला खात्री आहे जनावर जायचं नाही, ते येईल परत. "तुला काही कळलं तुझ्या मित्रान कडून तर मला येवून सांग रे, मग बघते एकेकाला".

तात्यांना खरं तर, हसू कसं थांबवावं कळत नव्हतं, त्यात साताळकर आजींचं पोपटाला जनावर म्हणणे, म्हणजे तर, गमतीचा कळसच होता. ते मनात म्हणत होते," वाट बघा, तो पोपट कशाला परत येतोय तुमची आमटी पोळी खायला?"प्रत्यक्षात मात्र ते, "आजी वाईट झालं हो, मला काही कळलं तर नक्की सांगतो, मला पण वाटतंय येईल तो परत" असं म्हणाले.

संध्याकाळी तिघं मित्र जोशी काकूंच्या घरी बटाटे वडे घेऊन गेले आणि त्यांना साताळकराना काही न सांगण्याची विनंती केली. जोशी काकू हसून म्हणाल्या, "गाढवानो, काय तुमचे उपद्वाप? कोणी पहिलं असतं तर? पण तो वैताग नाहीसा केलात ते बरंच केलंत".
नंतर साताळकर कुटुंब सोडून हि कहाणी सगळ्यांना समजली, पण कोणी त्याबद्दल एक चकार शब्द काढला नाही.

साताळकर आजी मात्र म्हणत राहिल्या" जनावर आल्याशिवाय राहायचं नाही…ते नक्की परत येणार…

आणि अश्या तर्हेने Good people animal ची bad animal man पासून सुटकाss झाsली.

No comments:

Post a Comment