Monday, 21 October 2013

Saadi

आजची पोस्ट लेडीज स्पेशल, पुरुषानाही वाचायला बंदी वगैरे अजिबात नाही, पण विषय मुळात आम्हा बायकांचा. वाचून झाल्यावर आपल्या बहिणीला, बायकोला,गर्ल फ्रेंडला अवश्य दाखवा हि विनंती.

सुरुवातीला, साडी नेसायला आवडणाऱ्या व साडी नेसणाऱ्या महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते, आणि मग आपल्या ह्या पारंपारिक वेषाबद्दल बोलते.आज थोडं साडीविषयी.
भारतीय स्त्रीचं सौंदर्य, सर्वात जास्त साडीत खुलतं, असं माझं वैयक्तिक मत. इतर सर्वांचं असं मत असेलच असं माझं अजिबात म्हणणं नाही, किंवा असावं असा आग्रह ही नाही.

मी स्वतः, रोज जरी नेसत नसले, तरी अनेक वेळा, फक्त स्वतःला छान वाटावं, म्हणून साडी नेसते. इतर अनेक जणी मात्र साडी नेसण्याबद्दल खूप उदासीन दिसतात. आणि हो, आणखी एक महत्वाचं म्हणजे, मी साडी नेसते हं, घालत नाही. हल्ली बऱ्याच जणी साडी 'घालतात'.मला 'साडी घातली' असं कोणी म्हंटल, कि खरं सांगायचं, तर कसं तरीच होतं.

माझ्या एका मैत्रिणीचं, सासरकडून मोठ्ठ कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे एक नियम आहे. गणपतीच्या दिवशी सर्व बायकांनी साडी नेसूनच गणपतीच्या दर्शना करता आलं पाहिजे, असा. नियम छान आहे. मला खूप आवडला, त्याबद्दल काही नाही, पण मुळात, असा नियम करावा लागला, ह्याबद्दल मात्र मनात कुठेतरी खंत आहे.

इतका सुंदर दिसणारा वेश, बायकांना का करावासा वाटत नसेल? असा प्रश्न मला खूप वेळा पडायचा आणि म्हणून ह्यावर मी बऱ्याच बायकांशी चर्चा केली. काही मिळालेल्या प्रतिक्रिया अश्या प्रकारच्या :

मला साडी नेसताच येत नाही, साडी नेसण्यात खूप वेळ जातो, साडी फार जड होते, पोट उघडं दिसलेलं मला आवडत नाही, सिल्कच्या साड्यांमुळे फार उकडतं , साडीत वावरायला त्रास होतो, साडी खूप पायात पायात येते, जरा वेळ झाला कि कधी एकदा बदलून टाकते असं होतं, गाडीतून जाताना सुटेल कि काय असं वाटतं, आणि अगदी रिसेंटली ऐकलेली... साडी नेसणाऱ्या मुलींना "बहेनजी" म्हणतात.

म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, कारण कितीतरी लोकांना बायकांना आदरपूर्वक, ‘बेहेनजी’ म्हणताना मी कैक वर्ष ऐकत आल्येय. खोलात शिरल्यावर कळलं कि जुनाट, अजागळ, modern नसलेल्या म्हणजे बहेनजी. थोडक्यात झक पक मिनी स्कर्ट घातलेल्या किंवा तंग pant घातलेल्या, बहेनजी नाहीत व सलवार कमीज सारखे ढगळे किंवा साडी सारखे पूर्ण शरीर झाकून टाकणारे घालणाऱ्या, बहेनजी.

म्हणून, नकोच ती साडीची कटकट!!!

तर, साडीबद्दल वर लिहिल्या प्रमाणे ज्यांचं मत आहे, त्यांची, मी काही लिहिण्याच्या आधीच माफी मागते आणि मग माझ्याकडून न मागितलेला, एक, अगदी प्रेमाचा सल्ला देते.

"नेसत नसाल तर साडी नेसा, ती तुम्हाला सगळ्यांना खूप छान दिसते". भारतीय संस्कृतीचं ते खूप सुंदर प्रतिक आहे.

बऱ्याचश्या पाश्चात्य महिला 'apple shaped' म्हणजे खांदे व कटी प्रदेश,सारखा, ह्या सदरात मोडतात. त्या आपल्यापेक्षा बऱ्याच जास्त उंच पण असतात. त्यामुळे त्यांच्यावर pant-shirt हा वेश आपल्या तुलनेत जास्त अधिक खुलतो. त्यांना साडी फारशी छान दिसत नाही, असंही माझं मत आहे, त्याला कारण बांध्यापेक्षा सुद्धा, साडीसाठी जी नजाकत लागते ती मुळातच त्यांच्यापैकी बऱ्याच जाणीनच्यात नसते.

साउथ एशिअन महिला, मोंगोल फिचर्स वाल्या, म्हणजे बुटक्या व बारीक असतात. त्यांना frock किंवा skirt खूप छान दिसतो. एखाद्या छोट्याश्या बाहुली सारख्या त्या दिसतात.

भारतीय स्त्रियांचा बांधा साडीकरता अगदी योग्य असा. बहुतेक भारतीय स्त्रियांची उंची पाच फुट ते पाच फुट चार इंच ह्या दरम्यान असते. आपल्यापैकी बऱ्याचजणी 'pear shaped' म्हणजे कटी प्रदेश खांद्याच्या तुलनेत मोठा, ह्या सदरात मोडतात. ह्या शारीरिक जडणघडणी मुळे, आपल्यावर साडी खूप खुलून दिसते. किंबहुना साडीच आपल्याला सर्वात सुट करते असं म्हणणं ही चुकीचं ठरणार नाही. कित्येक स्थूल स्त्रिया इतर वेषांच्या तुलनेत साडी मध्ये कमी स्थूल दिसतात.

वयस्कर मंडळीना,घरातल्या तरुण स्त्रियांनी साडी नेसलेली खूप आवडते. साडी नेसल्यामुळे स्वतःला हि खूप भारदस्त वाटतं. माझ्या निरीक्षणा नुसार तर, बऱ्याच पुरुषानाही आपल्या बायकोने किंवा गर्ल फ्रेंड ने साडी नेसलेली खूप आवडते, मग थोडीशी गैरसोय होत असली तरी ह्या सगळ्यांच्या आनंदा करता, साडी नेसायला काय हरकत आहे? आणी थोड्याश्या सवयी नंतर त्यातली गैरसोय नाहीशी होते हे मी स्वतःच्या अनुभवाने नक्की सांगू शकते.

सोय म्हणून,इतर कपडे अवश्य वापरावे पण म्हणून आपल्या पारंपारिक वेषाला अगदीच विसरून जाऊ नये, असं मला मनापासून वाटतं, म्हणून, हा तुम्हा मैत्रिणींशी, प्रेमळ संवादाचा एक प्रांजळ प्रयत्न.

मनापासून ज्यांना साडी नेसावीशी वाटते पण वर लिहिलेल्या मधील काही समस्या आहेत, त्यांना माझ्याकडून काही सोल्युशन्स,

साडी नेसता येत नाही तर शिका, लाखो बायका नेसतात तर तुम्हालाही येईल.साडी नेसण्यात खूप वेळ जात असेल तर जरा लवकर आवरायला सुरुवात करा. साडी फार जड होत असेल तर हलकी(वजनाला) साडी विकत घ्या. सिल्कच्या साड्यांमुळे खूप उकडत असेल तर कॉटनच्या साड्या नेसा. पोट उघडं दिसलेलं आवडत नसेल तर पदर पिनअप न करता सिंगल पदर घ्या. साडीत वावरायला खूप त्रास होत असेल किंवा साडी पायात येत असेल तर साडी थोडीशी कमी लांब नेसा. कधी एकदा बदलून टाकते असं होत असेल तर बदलून टाका, पण आधी थोडा वेळ तर नेसा तर खरी!!, गाडीतून जाताना सुटेल असं वाटत असेल तर पिना लाऊन नेसा किंवा गाडीतून जायचं नसेल तेव्हा नेसा.

आणि शेवटच्या व्यक्त केलेल्या, बेहेनजी, समस्येकरता सोल्युशन,
स्वतःचे वजन वाढले असेल, तर कमी खाऊन नाही, व्यायाम करून वजन कमी करा. अगदी बारीक असाल तर चांगलं खाऊन पिउन जराश्या जाड व्हा, मग एकदम कडक, झक्कपैकी चापून चोपून,छानपैकी साडी नेसा. मग बहेनजी म्हणणाऱ्यांच्या पुढे जाऊन एक मस्त कॉनफीडेंत स्माईल द्या. त्यांचा वासलेला आ बंद होणार नाही, ह्याची पूर्ण हमी. बहेनजी आपण वेषामुळे ठरत नसून आपल्या अजागळपणामुळे, व आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ठरतो.

आणि म्हणूनच शेवटचं एकदा म्हणावसं वाटतंय,

“चंदेरी, पैठणी आणि कान्जीवरमची, साडी नेसा झकास”,

“सुंदर दिसाल इतक्या कि, पाहणारा होईल खलास”

No comments:

Post a Comment