माणसाच्या प्रगती साठी बुद्धी,
प्रयत्न आणि चिकाटी
हे अत्यंत महत्वाचे
गुण, पण ह्याहीपेक्षा
महत्वाचा गुण निर्णय
घेण्याची क्षमता व घेतलेल्या निर्णयाचे
चांगलेवाईट परिणाम स्वीकारण्याची हिंमत,
हा .
आजच्या पिढीत अनेक मुलांमध्ये
ह्या गुणाचा अभाव
आढळतो. दहावीच्या वर्षात असणाऱ्या
एखाद्या मुलाला जर आपण
विचारलं कि, "आता पुढे
काय शिकण्याचा विचार
आहे"? तर कितीतरी
वेळा, " Not Sure " किंवा Still haven't decided" किंवा "Let's see, depends on
marks" अशी उत्तरं बरेच वेळा
ऐकायला मिळतात. मला वाटतं
वय वर्ष पंधरा
पर्यंत आपल्याला आयुष्यात काय
करायचंय ह्याचा निर्णय जर
एखाद्याच्या मनात झलेला
नसेल, तर पुढची
वाटचाल खूप कठीण
ठरू शकते.
मुलांची अशी स्थिती
कश्यामुळे होत असावी?
का त्यांना निर्णय
घेता येत नसावा??
त्यांच्या पुढे उभ्या
असलेल्या ह्या समस्येला
ती स्वतः जबाबदार
आहेत का??? ह्या
सर्व प्रश्नांना माझं उत्तर“
नाही” असं आहे.
माझ्या मते ह्याचं
कारण आपण आईवडील
आहोत.
मुलांना गरज नसताना
प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत
करायला जाणे, त्यांची प्रत्येक
समस्या; त्यांना उपाय शोधण्याचाही
अवधी न देता,
चुटकी सरशी सोडवून
टाकणे, किंबहुना त्यांच्या पुढे
कुठलीही समस्या न येऊ
देणे, प्रत्येक परिस्थितीत तू काय कर हे त्यांना सांगणे, कुठेही चुकल्यावर
त्यांना, "कशाला काहीतरी करायला जातोस तू?मी येईपर्यंत जरा थांबता येत नाही का"?
असं म्हणणे, ह्या आपल्या वागण्यामुळे आपण
स्वतःच मुलांना ह्या परिस्थिती समोर उभं करतो. हे ठामपणे म्हणण्याचं कारण
असं कि, मुलांची काळजी घेणे, ह्या सदरात, मी स्वतः, हे सगळं केलेलं आहे. काही वर्षांनी
मात्र मला जाणवलं कि मी मोठी चूक करत्येय आणि मी जाणीवपूर्वक माझं वागणं बदललं.
तसे करण्याने माझ्या मुलांच्यात मला निश्चितपणे
सकारात्मक बदल जाणवला.
असं करायलाही एक अगदी
साधं कारण घडलं, आदित्य ५ वर्षाचा असताना आम्ही दुकानात एक घड्याळ विकत घेत होतो त्याच्याकरता,
तेव्हा माझे मिस्टर म्हणाले,"अगं त्याला डिजिटल घड्याळ घ्यावं लागेल, त्याला कट्याचं
नाही कळणार" हे वाक्य ऐकल्यावर मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवला...
मला मनगटी घड्याळ फार
आवडायचं, त्या काळात साधारणपणे १० वी झाल्यावर घड्याळ दिलं जायचं, पण माझ्या वडिलांनी दुसरीत
असताना मला आवडतं
म्हणून मनगटी घड्याळ घेऊन
दिलं होतं, हे घड्याळ
हातावर बांधण्याकरता मात्र एक अट होती,
ती म्हणजे घड्याळ
पाहून किती वाजले
ते बरोबर सांगता
येण्याची. घड्याळ हातावर बांधता
यावं म्हणून मी
वडलांचा, शिकवतानाचा भरपूर ओरडा
खाऊन सुद्धा, घड्याळ
पाहायला शिकले होते. शिकताना
त्रास झाला पण
नंतर बाहेरच्या कोणाही
माणसाने " अरे!… तू हातावर
घड्याळ लावलयस!, वाजले किती
समजतं का"? असं
विचारल्यावर मी झोकात
बरोबर वेळ सांगत
असे.
ह्याचाच अर्थ हातावर
घड्याळ बांधण्यासाठी घड्याळ पाहायला शिकण्याचा
किंवा न शिकण्याचा
निर्णय घेण्याचं काम माझ्या
वडिलांनी मी ७
वर्षाची असताना मला दिलं
होतं. परत त्यात
कुठलीही सक्ती नव्हती. घड्याळ
आहे, जेव्हा शिकशील
पाहायला, तेव्हा बांध, आजच
शिक असं त्यांनी
म्हंटलं नव्हतं.
माझ्या आणि आदित्यच्या
घड्याळ मिळण्याच्या वयातला फरक जरी मान्य
केला, तरी दोन वडिलांच्या विचारसरणीतली तफावत आम्हाला जाणवली. आम्ही दोघांनी ठरवलं, कि सगळंच सोपं करून नाही
द्यायचं मुलाना. काहीतरी मिळवण्याकरता
एक ठाम निर्णय घ्यावा लागतो, व तो तडीस नेण्याकरता कष्ट करावे लागतात आणि ते करताना
आलेल्या समस्यांना उत्तरं शोधावी लागतात, हे त्यांना कळू द्यायचं.
पूर्वी एखाद्या मुलीने
"आई, मला गाणं
म्हणायला खूप आवडतं,
मला गाण्याच्या क्लास
ला जायचंय”, असं
म्हंटल्यावर, आईवडील शक्य असेल तर, तिला गाण्याच्या क्लासला पाठवायचे. ह्यामध्ये गाणं शिकण्याचा निर्णय त्या मुलीचा
असायचा, तिच्या आईचा नव्हे. आई फक्त तिला गाणं शिकायला लागणारी मदत क्लास लावून करत
असे.
आता एखाद्या मुलीने टी. व्ही वर सुरु असलेल्या
गाण्यावर जरासे अंग हलवले कि ताबडतोब त्या मुलीला नाचाच्या क्लास मध्ये दाखल केले जाते.
ह्यात नाच शिकण्याचा
निर्णय मुली पेक्षा
आईचाच जास्त दिसतो.
मुलीला घरी जरासं
नाचून स्वतःचं मनोरंजन
करायचं असतं, आई लगेच
मुलीला नृत्यांगना बनवून ती
दुसर्याचं मनोरंजन करत्येय अशी
स्वप्न पाहू लागते.
वाचन चांगले आहे असे
आपण स्वतः ठरवतो
व मुलांसाठी गोष्टीची
पुस्तकं आणतो, आर्थिक सुबत्ता
असल्यामुळे एक छोटं
पुस्तक न आणता
पुस्तकांचा गठ्ठाच घेऊन येतो,
ती एवढाली पुस्तकं पाहून मुलगा कोणतंच पुस्तक उघडत नाही. कारण वाचन
करण्याचा निर्णय हा त्याने घेतलेलाच
नाहीये.
असे अनेक निर्णय आपण
आपल्या मुलांकरता कळत नकळत घेत राहतो. ह्यामुळे मुलं त्यांची निर्णय घेण्याची क्षमता
गमावून बसतात. आपण घेतललाला निर्णय चुकीचा ठरला तर? ह्याची भीती त्यांना वाटू लागते
आणि मग, ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या चेहऱ्यावर शोधायला लागतात.
लहानपणी चुकलेल्या
निर्णयांची किंमतही तुलनात्मकरित्या लहान असते.
जसं कि एखादी छोटी गोष्ट चुकीची निवडणे, किंवा कधीतरी अभ्यास न केल्यामुळे, एखाद्या
परीक्षेत कमी मार्क मिळणे, ज्यामुळे थोडेसे नुकसान होऊ शकते. पण हेच निर्णय मोठेपणी
चुकीचे घेतल्यावर नुकसान बरेच मोठे
असू शकते, जसे कि चुकीच्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक केल्या मुळे होणारा आर्थिक तोटा
किंवा चुकीच्या जोडीदाराची निवड केल्यामुळे होणारा आयुष्यभराचा त्रास, वगैरे. मग मोठ्या फायद्या साठी छोटं नुकसान झालेलं बरं
नाही का ?
बघा.., पटत असेल माझं
म्हणणं, तर, वागुद्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे, चुकूदे त्यांना, भोगुदे त्याना
त्यांनी केलेल्या चुकीचे परिणाम. मला
खात्री आहे, एकदा दोनदा असं झाल्यावर ती बरोबर तेच करायला लागतील.
अर्थात, मुलाने ५ व्या
मजल्यावरनं उडी मारायची इच्छा दर्शवली तर त्याला थांबायलाच हवे. त्यांना कायमची हानी होऊ शकेल अश्या गोष्टी त्यांना
करू देता उपयोग नाही. थोडक्यात, ज्यामध्ये IRREPARABLE DAMAGE होणार असेल अश्या ठिकाणीच
आपण हस्तक्षेप करूया.
मग आपण, स्वतःचा निर्णय
स्वतः घेणारी, विचारपूर्वक काम
करणारी, थोड्याश्या समस्यांनी आत्मविश्वास
न हरवणारी, स्वतःच्या
बळावर यशस्वी होणारी,असफल झाल्यावर
न कोलमडता पुन्हा ताठ उभी
राहणारी, समर्थपणे ह्या
जगाचा सामना करणारी
अशी नवी पिढी तयार करू
शकू.
आपल्याला तरी आयुष्यात
ह्यापेक्षा जास्त काय हवंय?
चला तर मग, ह्या
शुभ कार्याला लगेच
सुरुवात करूया.
No comments:
Post a Comment