Monday, 21 October 2013

Vachan..Reading..

लहानपणापासून मला वाचनाचं अफाट प्रचंड वेड. मी बाटली वरच्या लेबल पासून,चणे शेंगदाणे बांधून दिलेल्या कागदा पर्यंत, जे हाती लागेल ते वाचायची. काही गोष्टी कळायच्या, काही नाही.

अगदी आधीचं काही आठवत नाही, पण इयत्ता तिसरीत असता पासून मी वाचते. तेव्हा मी 'अमर चित्र कथा' आणि 'चंपक' वाचायची. आई तात्यांनी मला इंग्लिश मिडीयम शाळेत घातल्यामुळे, मराठी भाषा, तिसरीत असे पर्यंत, मी फक्त बोलण्याकरता वापरत असे.
दुसरीत, शाळेत मराठी मुळाक्षरांची ओळख झाली व तिसरीत 'कमल नमन कर' ने मराठी वाक्याशी. मी अक्षर अक्षर जोडून वाचायची. मला वाचायला आवडायचं म्हणून तात्या मला, तेव्हा ६० पैशाला मिळणारी मोठ्ठ्या टाइप मधली, एकच गोष्ट असणारी, खूप पुस्तकं आणायचे.

अश्याच एका पुस्तकात 'विनू एक नंबरचा धांदरट' असं वाक्य होतं . मला धांदरट हा शब्द का कोण जाणे, पण 'छनदारट' असा वाटत होता. मग वाक्याचा अर्थ लागेना.
मग तात्यांना विचारलं, 'छनदारट म्हणजे काय ?'
ते म्हणाले," कुठाय”? ”बघू "?
मग पुस्तक दाखवल्यावर म्हणले, " अगं, ते धांदरट आहे छनदारट नाही".
मी म्हंटलं, "Means What?"
तर म्हणाले, means तू धांदरटा सारखी 'धांदरट' हा शब्द 'छनदारट' असा वाचत्येयस".
मग मला धांदरट ह्या शब्दाचा अर्थ कळला.

साधारण चौथीत असताना मला मराठी वाक्य वाचता यायला लागली व मी सगळीकडे लावलेल्या पाट्या वाचायला लागले. ह्या पाट्या वाचण्याच्या माझ्या सवयी मुळे घरात सगळ्यांची कितीतरी वेळा बिकट अवस्था होत असे.

मुंबईच्या लोकल मधे, आता माहित नाही, पण पूर्वी, '१०० रुपयात गर्भपात',वगैरे लिहिलेल्या पाट्या असायच्या, एकदा तशी एक पाटी वाचून मी मनीषाला ( चुलत बहिण) "गर्भपात म्हणजे काय?",असा प्रश्न विचारला होता. ती माझ्याहून तीन वर्षांनी मोठी. मी सहावीत व ती नववीत. त्यामुळे तिलाही बहुतेक अर्थ माहित नसावा. पण मोठ्ठेपणाचा आव आणून ती मला,"मोठी झालीस कि समजेल",असं म्हणाली होती.

एक दिवस तात्यांना विचारलं होतं, "भगेंद्र म्हणजे काय?"
ते एकदम चमकले आणि मला उत्तर द्यायचं सोडून म्हणाले,"कोणाला झालंय?"
मी म्हंटल,"काय झालंय?"
ते म्हणाले,"भगेंद्र…? कोणाला झालंय?"
मी म्हंटल,"मला काय माहित कोणाला झालंय? मी काल ठाण्याहून येताना गाडीत वाचलं होतं, तेव्हा विचारायला विसरले म्हणून आत्ता विचारलं".
पण 'ते' म्हणजे काय ते सांगायचं सोडून कोणाला झालंय काय विचारताय?"
त्यांनी थोडसं अस्वस्थ होत, "अगं, आजार आहे एक प्रकारचा”, असं मोघम उत्तर दिलं.

असं तीन चार वेळा झाल्यावर तात्यांनी एक महत्वाचं काम केलं, त्यांनी चार dictionary आणल्या, मराठी टू मराठी , मराठी टू इंग्लिश, हिंदी टू इंग्लिश, आणि इंग्लिश टू इंग्लिश , त्या माझ्याकडे देत म्हणाले उद्या तुला ह्याच्यात शब्दाचा अर्थ कसा शोधायचा ते शिकवतो , मग तुला सारखं सगळ्यांना विचारायला नको. मग कधीतरी मी अर्थ बघायला DICTIONARY वापरू लागले.

मला वाटतं, मी सहावीत असताना, तात्यांनी मला वाचनालयातून पुस्तकं बदलून आणण्याचं काम दिलं होतं. ते बाबा कदम, श्रीकांत सिनकर,सुहास शिरवळकर, वगैरे लेखकांच्या कादंबऱ्या वाचायचे. जे पुस्तक वाचलं असेल, त्या पुस्तकाच्या दहाव्या पानावर पेनानी एक ठिपका काढायचे. ठिपका असलेलं पुस्तक आणायचं नाही, ठिपका नसला कि घेऊन यायचं. असं, मी शाहण्या सारखं,बरेच दिवस करत होते.

एक दिवस दहाव्या पानावर ठिपका बघताना सहज अक्षरांवर नजर गेली, काहीतरी "मी रात्री तुझी स्टेशन वर वाट पाहीन" …. वगैरे असं काही तरी लिहिलेलं होतं, काय गोष्ट असावी उत्सुकता वाटली आणि कादंबरी वाचनाला आरंभ झाला.

घरी येउन वाचायला लागले तर आई ओरडली, "ती मोठ्यांची पुस्तक आहेत, तू जरा येत नाही ते हिस्ट्री वाचलंस,तर बरं होईल, परीक्षा आठ दिवसांवर आल्येय".
मी तेव्हा पुस्तक बंद केलं, पण कादंबरी वाचन कोणी नसताना, जमेल तसं सुरु झालं. काही दिवस मग हे लपून छपुन वाचणं सुरु होतं.

एक दिवस वाचनालयात माझ्या हाती सुहास शिरवळकरांचं 'सनसनाटी 'हे पुस्तक लागलं, आणि थोडसं वाचल्यावर मला इतकं इन्टरेसटींग वाटलं, कि मी वाचण्याकरता घरात कोणी नसण्याची वाट पाहू शकले नाही. सगळ्यांना, "मला हे पुस्तक आवडलंय आणी मला वाचायचंय, मी आभ्यास करेन नंतर",असं ठाम पणे सांगून वाचन सुरु ठेवलं आणि दिवसाढवळ्या, बिनदिक्कतपणे सगळ्यांच्या समोर आयुष्यातली पहिली कादंबरी वाचली.

मग हाती आलेल्या सगळ्या पुस्तकांचं वाचन सुरु झालं. पोटापाण्यापूरता अभ्यासही सुरु होता, नाहीतर माझी काही खैर नव्हती.

असंच मग पुढे 'रॉबिन कूक' ह्याचं 'कोमा' हे पुस्तक हाती लागलं, मला फार आधीपासून डॉक्टर व्हायचं होतं, हे पुस्तक वाचल्यावर, त्याच्या प्रभावामुळे अगदी निश्चितच केलं आणि घरी सगळ्यांना सांगितलं कि “मला डॉक्टर व्हायचय”.
घरी सांगितल्यावर, "जी पुस्तकं आत्ता वाचण्यात वेळ फुकट घालावत्येस, तीच वाचत राहिलीस तर फार तर नर्स होऊ शकशील". ती बदलून तेवढीच अभ्यासाची वाचलीस तर होशील डॉक्टर". “तू करत्येयस तेवढा आभ्यास डॉक्टर व्हायला पुरेसा नाही”. असं तात्या म्हणाले.

पण मी पुस्तकं न बदलता त्यांनी सांगितलेली अभ्यासाची पुस्तकं वाचनात add केली आणि झाले डॉक्टर !
आज ह्या वाचनाच्या वेडाचा जेव्हा मागे वळून विचार करते तेव्हा जाणवतं, कि मला वाचनाची आवड जर नसती,तर आज मी कोणीतरी वेगळीच असते.

वाचन हे कुतूहल उत्पन्न करणारं व शमवणारं असं दोन्ही असतं. वाचताना काही प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण मिळवत असतो, तेव्हाच नवीन प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होत असतात. मग त्याची उत्तरं आपण शोधायला लागतो आणि आणखीन नवीन प्रश्नांना जन्म देतो, ह्या शोधाच्या वाटेवरच मग आपल्या ज्ञानाचा साठा वाढत जातो, काही गोष्टी सुरुवातीला कळल्या नाहीत, तरी हळू हळू आपण शिकतोच!
'Knowledge is power' हे तर आपल्याला माहीतच आहे.

माझ्या मनात वाचनाची आवड निर्माण केल्याबद्दल त्या देवाचे आभार, आणि आताच्या पिढीतल्या मुलांच्या मनी त्याने हि आवड उत्पन्न करावी अशी त्याच्या चरणी मनापासून प्रार्थना.....

No comments:

Post a Comment