Monday, 21 October 2013

Mitali


आज गोकुळाष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस लहानपणापासून आपण ह्या श्रीकृष्णाच्या अगणीत कथा ऐकल्या आहेत.
पूर्वीच्या काळी देऊळात नृत्याद्वारे काही लोक श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायचे. ह्या लोकांना, "कथा कहे सो कथक" ह्या उक्ती प्रमाणे कथक असं म्हंटल जायचं. पुढे त्या नृत्यप्रकारालाच कथक हे नाव पडलं. हल्ली आपण ह्या नृत्य प्रकाराला कथ्थक म्हणतो. भारतात असलेल्या आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथ्थक नृत्यप्रकार हा एक. 
आज मी तुम्हाला हे कथ्थक नृत्य करणाऱ्या एक उदोयोन्मुख नृत्यांगनेची ओळख करून देणार आहे. तिचं नाव मिताली. मितालीचं वय आहे पंधरा वर्षाचं. ह्यातली गेली बारा वर्ष ती पंडिता डॉ. सौ मंजिरी देव ह्यांच्याकडे कथ्थक नृत्याचा अभ्यास करते आहे. ह्यावर्षी मिताली कथ्थक नृत्यातील 'विशारद' म्हणजे पदवी परीक्षेला बसणार आहे.
मिताली ने वय वर्ष तीन पासून ह्या नृत्याप्रकाराचा आभ्यास सुरु केला. ती नऊ वर्षाची असताना तिच्या कुटुंबाला वडिलांच्या नोकरी मुळे परदेशी स्थायिक व्हावे लागले. ह्यानंतर नृत्याचा अभ्यास सुरु ठेवणे अत्यंत कठीण होते. 
वर्षभर शिकण्याचा अभ्यास भारतात जाऊन २ महिन्यात शिकणे, परत येउन गुरु समोर नसताना त्याचा रियाज करणे, ठराविक वेळातच शिकवल्या जाणाऱ्या कथ्थकच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्या करता शाळा बुडवणे, मग शाळेचा आभ्यास भरून काढण्याकरता अत्यंत कष्ट करणे अश्या अनेकविविध समस्यांवर मात करून, ती नेटाने नृत्य शिकत राहिली.मिताली ने पंडित बिरजू महाराज, सौ अर्चना जोगळेकर, श्री वैभव जोशी, श्री मुकुंदराज देव, ह्यांचकडूनही कथ्थक चे धडे घेतले आहेत. 
अनेक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन मिताली ने अनेक बक्षिसं मिळवली आहेत, त्यातील एक विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे, “All India Dance and Music Competition” ह्या स्वरसाधना समिती ने आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेत मिळवलेले पारितोषिक. ह्या स्पर्धेत भाग घेण्याकरता भारताच्या विविध प्रांतातून स्पर्धक येतात.
Indian Medical Association, Indian Register of Shipping, आणि अश्या इतर अनेक ठिकाणी तिच्या नृत्याचे कार्यक्रम तिने केले आहेत . परदेशातही ती सातत्याने नृत्यसाधना करून अनेक ठिकाणी तासाभराचे सोलो परफ़ोर्मन्स गेली सहा वर्ष करते आहे. 
अत्यंत गुणी अशी हि मुलगी अभ्यासातही अजिबात मागे नाही. गेल्यावर्षी दहावीच्या IGCSE ह्या Cambridge University च्या परीक्षेतही तिने नेत्रदीपक यश मिळवले. स्वभावाने अत्यंत नम्र, परिश्रमाना न घाबरणारी, अशी मिताली.
मितालीला पुढे मेडीकल सायन्स किंवा लाइफ सायन्स ह्या विषयांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे. हे करताना नृत्यसाधनाही करत राहण्याचा तिचा विचार आहे. मितालीला स्वयंपाकाची विशेष आवड नाहीं, परंतु पोळी, बटाट्याची भाजी व वरणभात एवढे पदार्थ तिला शिजवता येतात. तिला पाळीव प्राणी खूप आवडतात.
ह्या मितालीचं पूर्ण नाव मिताली साधन मुखर्जी. गेले काही दिवस माझ्या लेखनात आपण आदित्यच्या नावाशी परिचित आहात. तो माझा धाकटा मुलगा. मिताली, ही माझी अत्यंत लाडकी ज्येष्ठ कन्या. तिचं नाव सुरुवातीला न सांगण्याचं कारण म्हणजे, माझी मुलगी, ह्याहूनही वेगळी ओळख तिने स्वतःसाठी निर्माण केली आहे. तिचा मला अत्यंत अभिमान आहे. 
आपले आशीर्वाद व सदिच्छा ह्या माझ्या दोनही लाभाव्यात ही आज गोकुळाष्टमीच्या दिवशी देवाशी प्रार्थना..............

http://youtu.be/ZUXPKYHW8D4



Kathak- Raas Rachat Braj Mein... by Mitali www.youtube.com
Raas Nritya performed by Mitali in SIFAS festival 2010. Song by pandit Birju Maharaj.

·   

 

No comments:

Post a Comment