Monday, 21 October 2013

Taicha lagna..

आमच्या ताईचं लग्न झालं, तेव्हा मी तिसरीतुन चौथीत गेले होते. ‘आमची ताई’ असं म्हणण्याचं कारण म्हणजे, तिला सगळे, म्हणजे अगदी माझ्या आजी पासून आमच्या घरा समोरच्या दुकानदारा पर्यंत सगळे, अजून सुद्धा ताईच म्हणतात. तिच्या लग्नाची गम्मतच झाली. एक्स्प्रेस डिलिवरी म्हणतात ना, तसं तिचं एक्स्प्रेस लग्न झालं.

लग्न होई पर्यंत माझं सगळं ताईनी केललं आहे. आईपेक्षा जास्त मी ताई आणि सुगंधा कडेच असायची. सुगंधा म्हणजे माझी मधली बहीण. तिला सगळे म्हणजे सगळे, सुगंधाच म्हणतात. मी, अगदी बारा वर्षांनी लहान असून सुद्धा, सुगंधाच म्हणते. तर, तेव्हा सुगंधाकडे, मी ताईचं ऐकायचं नसेल, तेव्हा जायची, नाहीतर बहुतेक नेहमी ताईकडेच असायची. 


 ताई माझं सगळं अतिशय प्रेमाने करायची. माझं सगळं आवरणे, मला शाळेत पोहचवणे, शाळेतून आणणे, भरवणे ,वगैरे सगळं. सुगंधा बाहेर निघाली कि मात्र मी ताईला सोडून लगेच तिच्या बरोबर निघायची. आमच्या घरी बहुतेक बाहेरची कामं सुगंधा करत असे आणि घरची,ताई. माझी आई तेव्हा स्वतः शिकणे, शाळेत शिकवणे, घरी क्लास घेणे वगैरे, अशी बरीच कामं करत असल्यामुळे, घरातली थोडी फार कामं व मला बघण्याचं मोठं काम माझ्या दोघी बहिणी करत असत. दोघीनाही मी भरपूर त्रास देत असे. फार राग आला कि ताई मला म्हण्याची "तू म्हणजे नाss, एक गोष्ट ऐकशील तर शप्पथ!" आणि मग रागावून तोंडातल्या तोंडात पुटपुटत राहायची.

ताईला घरी सगळे हळूबाई म्हणायचे. ती स्वभावाने अतिशय शांत होती व सगळी कामं तेवढ्याच शांतपणे करायची. आमच्या आईला हिचं लग्न झाल्यावर कसं होईल ह्याची चिंता वाटायची. माझी आई म्हणजे कामाचा झपाटा व ताई त्याच्या विरुद्ध.

तर हि ताई जेव्हा B.A. झाली तेव्हा आमची आई तिला म्हणाली कि M.A. ला Admission घ्यायची असेल तर खुशाल घे, पण मग फर्स्ट क्लास मिळवावा लागेल अभ्यास करून. त्यावर तिने मला M.A. करायचं नाही असं सांगून टाकलन.त्याच सुमारास माझ्या आईला तिच्या माई मावशीचं पत्र आलं. ही माई मावशी राहायची पुण्याला, पत्रात तिने माझ्या पाहण्यात एक चांगला मुलगा आहे, मुलीचं लग्न करत्येयस का? असं विचारलं होतं. आमच्या घरात ताईच्या लग्नाबद्दल तसा काही विचार कोणी केला नव्हता, पण बघायला काय हरकत आहे? असे म्हणून आई स्थळाची चौकशी करून आली.

लगेचच्याच आठवड्यात ताईला पहायचा कार्यक्रम ठरला. आई ताईला घेऊन पुण्याला गेली. माई मावशीच्या घरी मंडळी ताईला पाहायला आली. ताईला मुलगा आवडला आणि ही मितभाषी, तोंडात पुटपुटणारी, शांत मुलगी इतकी ग्रेट, की, सर्व मंडळींच्या समोर फाडकन म्हणाली, मला मुलगा पसंत आहे. तुमच्याकडून काय आहे ते बघा. आईला व मुलाकडच्याना काय बोलावे कळेना. मग अश्याच थोड्या इकड तिकडच्या गप्पा मारून मंडळी गेली.

आई व ताई परत आल्या. गमतीची गोष्ट अशी कि मुलाला पण आमची ताई जाम आवडली होती. हे आम्हाला नंतर कळलं, पण असं झालं होतं खरं. चौथ्या दिवशी आमच्या घरी मुलगी पसंत असल्याचं व पुढील बोलणी करण्याकरता यावं असं मुलाकडच्याचं पत्र आलं. त्यावेळी फारशी फोन करायची पद्धत नव्हती. सगळी कामं बहुतेक पत्रांनी व्हायची. तर, पत्र आलं. ताईनी आपला होकार आधीच सांगितला होता.

हे सगळं होई पर्यंत तात्या एकदाही आई बरोबर पुण्याला गेले नव्हते. त्याना प्रवास करायला अजिबात आवडायचं नाही. पत्र आल्यावर आई त्यांना म्हणली "आता बोलणी करायची वेळ आली, आता तरी चला पुण्याला नाहीतर लोकांना वाटेल ह्या बाईने नवऱ्याला सोडलं वगैरे आहे कि काय? ह्यावर ते नेहमी प्रमाणे "तू हो पुढे, मी आलोच" असं म्हणाले. आम्हाला सगळ्यांना त्यांचा आविर्भाव पाहून हसायलाच आलं.

मग आमच्या घरातली मोठी माणसं बैठकी साठी पुण्याला गेली, आम्ही मुली पण बरोबर गेलो होतो. बैठक मुलाच्या घरी होती नेहमी सारखी. म्हणतात ना उठून यायची वेळ आली तर, मुलीकडच्याना सोपं, म्हणून. आम्ही मुली माई मावशीच्या घरीच थांबलो होतो. मुलाकडची मंडळी इतकी चांगली कि बैठक पंधरा मिनिटात संपली, काही देणं नाही, काही घेणं नाही, कुणाचेही मानपान नाहीत, मुलाचा पोशाख मुलाकडचे करणार, मुलीचा पोशाख मुलीकडचे करणार व लग्न करून देणार असं ठरलं. साखरपुडा आठवड्याने करायचा असेही निश्चित झाले.

आमच्या ताईच्या सासूबाईंनी पेढ्याचा सोनेरी कागदात बांधलेला पुडा, आणून ठेवला होता. त्या हळद कुंकू व तो पुडा घेऊन लगेच माई मावशीच्या घरी आल्या. ताईला औक्षण करून पेढ्याचा पुडा दिला. साखरपुडा ठरला हे ही सांगितलं. मग ताई, आमचे मेव्हणे व एकदोन मोठी माणसं जाऊन साखरपुड्या करता झक्कपैकी लाल पिवळी साडी घेऊन आले. अंगठीचं माप देण्या घेण्याचाही कार्यक्रम उरकला व आम्ही मुंबईला परत आलो.

ताई व आमचे मेव्हणे केव्हाच आकाशात उडायला लागले होते. आठवड्याने साखरपुडाही झाला. साखरपुड्याच्या दिवशी एक गम्मतच झाली. कोणीतरी टेप रेकॉर्डर वर 'दाटून कंठ येतो' हे अष्टविनायक सिनेमातलं गाणं लावलं होतं, तर मला, माझ्या आईला, काकूला थोडं रडायला आलं. ही मजेची गोष्ट नाही… मजेची गोष्ट ही कि आम्हाला रडायला आलेलं पाहून ताईच्या सासूबाईना पण रडायला यायला लागलं. त्यांचं रडणं पाहून गम्मत वाटली, पण त्यांच्या चांगल्या स्वभावाचीही तिथेच खात्री पटली.

ताईचं लग्न झाल्यावर एकदा आम्ही पुण्याचे गणपती पाहायला गेलो होतो, रात्री गणपती पाहायला भयंकर गर्दी होती, मी खूप कंटाळले, तशी त्या मला म्हणल्या, "आपण जाऊया का घरी? या लोकांना जाऊदेत". मी पण घरी जाणे बरे असा विचार करून त्यांच्या बरोबर घरी परत गेले . दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस, जेव्हा गर्दी नसते तेव्हा त्या मला बरोबर घेऊन गेल्या व सगळे गणपती दाखवून घेऊन आल्या. इतक्या चांगल्या स्वभावाच्या त्या आहेत.थोडसं विषयांतर झालं पण मला हा किस्सा सांगितल्याशिवाय राहावंवलं नाही म्हणून सांगितलं. असो.

तर,हा सगळा कारभार, म्हणजे स्थळ सुचवल्या पासून साखरपुड्या पर्यंत, हे सगळं तीन आठवड्यात झालं. ह्यानंतर मात्र एक समस्या उभी राहिली, गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे ताई व नवरा मुलगा दोघेही घरात मोठे असल्यामुळे ज्येष्ठ महिन्यात लग्नाचा मुहूर्त धरणे शक्य नव्हते. हे ऐकून ताई व जिजाजी दोघेही भलतेच हिरमुसले, पण बाकी मंडळी म्हणली "बरंss झालं, लग्नाच्या तयारीला थोडा वेळ मिळाला.मग लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली, साड्या, दागिने,ह्यांची खरेदी कार्यालय पाहणे वगैरे सगळं घाईघाईत सुरु होतं.

मधल्या काळात एक दोन वेळा जिजाजी आमच्या घरी आले. माझे जिजाजी स्वभावाने राजा माणूस. माझं त्यांनी स्वतःच्या मुलीचं जसं एखादा माणूस करेल इतक्या प्रेमाने केलेलं आहे. एकदा ते लग्नाच्या आधी आमच्याकडे आले तेव्हा एक मोठी गम्मत झाली. ते बहुदा शनिवारी संध्याकाळी यायचे व त्यांचा शनिवारी उपवास असयचा. तर त्यांना फराळा साठी खिचडी करायची तयारी आईनी केली. तिने भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचं कुट, मीठ, साखर सर्व काही मिसळून ठेवलं व शाळेत काहीतरी काम असल्याने ताईला “खिचडी ची तयारी ठेवल्येय परतून दे त्यांना”, असं सांगून शाळेत गेली. आमच्या ताईने, काय सांगितलं ते नीट ऐकलं नव्हतं, तिला वाटलं “खिचडी करून ठेवल्येय” असं आई म्हणाली. तिने जिजाजी आल्यावर तो कच्चा साबुदाणा त्यांना खिचडी म्हणून दिला, खरं तर तिलाही तो बघून, अशी कशी खिचडी? असं वाटलं, पण ताईनी डिटेल्स चा विचार फारसा कधी केलेला आम्ही पहिलाच नाही. जिजाजी बिचारे नवीनच आमच्या घरी आलेले, व होणाऱ्या बायकोच्या अतिशय प्रेमात पडलेले, त्यांना बोलायला अवघड वाटले, त्या बिचार्यांनी तो कच्चा साबुदाणा तसाच कसातरी खाल्ला. संध्याकाळी आई घरी आल्यावर सगळा उलगडा झाला. आई ताईला खूप ओरडली व जीजाजीना म्हणाली "अहो तुम्ही तरी काय? सांगायचं नाही का तिला? ", जिजाजी आपले गप्प. आमच्या सगळ्यांचं तर हसून हसून पोट दुखायची पाळी आली.

मग आला लग्नाचा दिवस. मुलाकडची मंडळी एस. टी. ची बस बुक करून पुण्याहून आली. पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा अजिबात पाऊस पडला नाही. सर्व कामाच्या मंडळींनी त्यांचे नियोजित काम चोखपणे बजावले. मुलाकडच्यानी कुठेही अडवून धरले नाही. तात्यांनी कोणच्या तरी मुलुंड च्या दुकानातून स्पेशल पेढे आणले होते. त्या पेढ्यांची आठवण नंतर सुद्धा कितीतरी वर्ष लोक काढायचे. ताईनी आमच्या फार जड होतो म्हणून शालू घेतला नव्हता, झक्कपैकी एक कांजीवरम साडी घेतली होती. ताईच्या सासरी फार पूर्वीपासून चालत आलेले भरपूर दागिने होते, ते सगळे दागिने ताईच्या लग्नात तिच्या अंगावर घातलेले होते. एक नथ तेवढी तिला घालता आली नव्हती. ती नथ घालण्याकरता आमच्या ताईने दहा बारा दिवस आधी नाक सुद्धा टोचून घेतलं होतं. पण तिथे एक हिंगुरडं झालं होतं, त्यामुळे नथ कॅन्सल झाली. सौ गोडबोले ह्यांनी अतिशय सुरेख स्वयंपाक केला. सर्व मंडळी जिलबीचं भरपूर कौतुक करत होती . ह्या गोडबोले बाई स्वतः पंगत सुरु व्हायच्या वेळेस जिलब्या करायला बसायच्या व सगळ्या पंगती होई पर्यंत सगळ्यांना गरम जिलब्या वाढायच्या. सगळं लग्न झकासपणे पार पडलं. संध्याकाळी सासरी जायच्या वेळेस, आमच्या सगळ्यांशी, रडणार नाही अशी पैज लावून, आम्ही सगळे रडत असताना हसत ताई सासरी गेली. बिचारे जिजाजी व त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

ही ताई एवढी बिनधास्त कि पुण्याला पोहोचल्यावर तिने लग्नाच्या दिवशी सर्व मंडळींकरता मुगातांदुळाची खिचडी केलीन. सासरच्या मंडळींवर आश्चर्याने तोंडात बोटं घालयाची वेळ आली होती.
पुढे अनेक वर्ष तिचा सुखाचा संसार चालू आहे. आता ती आजी झाली आहे, व उद्या तिचा वाढदिवस आहे म्हणून हि तिच्या लग्नाची सुंदर आठवण तिला माझ्याकडून स्पेशल भेट.

No comments:

Post a Comment